Rajya Sabha: निवडणुकीची महाराष्ट्रात मतमोजणी सुरुच झाली नाही कारण...

राज्यसभा

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 7 मिनिटे

राज्यसभा निवडणुकीचं मतदान संपून दोन तास उलटले. संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मतमोजणी सुरू होणं अपेक्षित होतं. मात्र, अद्याप मतमोजणीला सुरुवातच झाली नाहीय.

भाजपने काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मतदानाबाबत लेखी तक्रार केली आहे. त्याचा अहवाल दिल्लीच्या निरीक्षकांनी मागवला आहे. त्याची वाट पाहिली जात आहे. हा अहवाल येईपर्यंत मतमोजणीची प्रक्रिया स्थगित करण्यात आलीय.

दिल्लीतून केंद्रीय निवडणूक आयोगाने व्हीडिओ मागवला आहे.

निवडणूक आयोगाकडून जोपर्यंत निर्णय येत नाही, तोपर्यंत मतमोजणी सुरू केली जाणार नाही.

दुसरीकडे, महाविकास आघाडीने सुधीर मुनगंटीवर आणि रवी राणा यांच्यावर आक्षेप घेतला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. राऊतांनी ट्वीट करून म्हटलंय की, "राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडीचा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला!! आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!!"

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

राज्यसभेच्या 6 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान झालं.

'नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मत देता येणार नाही'

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांनी सुधारित याचिका दाखल केली होती. मात्र, हायकोर्टानं मलिकांची मागणी फेटाळली आहे.

नवाब मलिक यांच्यासोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही राज्यसभा निवडणुकीत मतदान करता येणार नाहीय.

आज (10 जून) सकाळीच हायकोर्टानं मलिकांना मतदानासाठी नकार दिला होता. मात्र, या याचिकेतील जामिनाचा मुद्दा बाजूला काढून केवळ मतदानाची मागणी केली. मात्र, ती मागणीही हायकोर्टानं नाकरली.राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिला आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी तुरुंगात असलेल्या नवाब मलिकांनी सुधारित याचिका दाखल केली होती. मात्र, हायकोर्टानं मलिकांची मागणी फेटाळली आहे. 285 आमदारांचं मतदान केलं असून आता 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान

राज्यसभेच्या 6 जागांसाठी विधानभवनात मतदान सुरू झालं आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी दुपारी 2 वाजेपर्यंत 281 आमदारांनी मतदान केले आहे.

भाजपच्या एजंटने यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांच्या मतावर आक्षेप घेतला. दोघांनी मतपत्रिका पोलिंग एजंटच्या हातात दिली म्हणून आक्षेप घेण्यात आला. निवडणूक अधिकाऱ्यांनी चर्चा केली नाही तर निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाद मागू असं अळवणी म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा विधानभवनात पोहोचले आहेत. मात्र ते विधान परिषदेचे आमदार असल्याने त्यांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही.

पण ऐनवेळी कॉंग्रेसने त्यांची पहिल्या पसंतीची 44 मतं ही त्यांच्याच उमेदवाराला देण्याचं घोषित केल्यामुळे आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे.

लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक सध्या गंभीररित्या आजारी आहेत. त्यांना व्हीलचेअरवरून विधानभवनात आणण्यात आलं आहे. दरम्यान नवाब मलिकांना मतदान करण्यासाठी आजही कोर्टाने परवानगी दिलेली नाही

महाराष्ट्रातून एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. त्यात भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडिक यांनी अर्ज भरले आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार मैदानात आहेत.

राज्यसभेच्या 6 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी आज सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजेपासून मतमोजणी होणार आहे

"आज 7 वाजता चित्र स्पष्ट होईल, महाविकास आघाडीचे ४ उमेदवार निवडून येतील. भाजपचेसुद्धा 2 उमेदवार निवडून येतील. चूरस वगैरे काही नाही. आम्हाला 169 आमदारांचा पाठिंबा आहे. आजच्या निवडणुकीत तुम्हीला हे आकडे स्पष्ट दिसतील," असं शिवसेना उमेदवार संजय राऊत यांनी म्हटलंय.

प्रफुल्ल पटेलांसाठी राष्ट्रवादीनं कोटा वाढवल्याचा बातम्या विरोधीपक्षांकडून पेरल्या जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अजिबात नाराज नाहीत. माझी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे, असं राऊत पुढे म्हणाले आहेत.

राजकीय पक्षांची जोरदार फिल्डिंग

राज्यसभेच्या 6 जागांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या आमदारांचा मुक्काम मुंबईच्या मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये आहे. मतदान होईपर्यंत त्यांना तिथून न हलण्याचा आदेश देण्यात आला आहे. आमदारांना अशा प्रकारे हॉटेल्समध्ये थांबवण्याचा किती खर्च येते याबाबात तुम्ही इथं याबाबात तुम्ही इथं अधिक वाचू शकता.

त्यातच औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी भाजपला हरवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान करणार असल्याचं ट्वीट करून जाहीर केलं आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना एमआयएमची 2 मतं शिवसेनेच्या संजय पवार यांना दिली जातील असं खासदार एम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे.

आदित्य ठाकरे

राज्यसभा निवडणुकीत जरी ही बाब शिवसेनेसाठी दिलासा दायक ठरणार असली तरी येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेसाठी ही बाबत अडचणीची ठरण्याची शक्यता आहे.

दरम्यान एमआयएमच्या लोकांची आमच्याशी अधिकृत चर्चा झाली नसल्याचं शिवसेनेचे नेते सचिन आहिर यांनी सांगितलं आहे. त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा केली असावी असं आहिर म्हणाले आहेत.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

एमआयएमनं कुणाला पाठिंबा द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. महाविकास आघाडीकडे आकडे आहेत. आमचा विजय निश्चित आहे, असं काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होणार, आम्ही फटाके तयार ठेवलेत असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

शिवसेनेला 12 अपक्षांचं समर्थन

  • शंकरराव गडाख
  • राजेंद्र पाटील येड्रावकर
  • मंजुषा गावित
  • गिता जैन
  • शिष जयस्वाल
  • किशोर जोरगेवार
  • चंद्रकांत पाटील
  • विनोद अगरवाल, गोंदिया
  • बच्चू कडू
  • राजकुमार पटेल
  • नरेंद्र बोंडेकर
  • विनोद निकोले, माकप

महाविकास आघाडीच्या अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना कोर्टाने मतदान करण्यास मनाई केली आहे. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायलायात धाव घेतली आहे. त्यावर आज तातडीची सुनावणी होणार आहे.

त्यामुळे मतांचा कोटा 42 वरून 41 वर येणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

महाविकास आघाडी

फोटो स्रोत, BBC Sport

फोटो कॅप्शन, महाविकास आघाडी

तर मी सांगितलं तसंच मतदान केलं तर भाजपचे उमेदवार निवडून येतील, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

फडणवीस यांना दोन तीन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती त्यामुळे ते या निवडणुकीला उपस्थित राहतील की नाही अशी शंका निर्माण झाली होती. आता मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ते निवडणुकीत सक्रिय सहभाग घेतला आहे.

देशभरात एकूण 16 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या 15 राज्यातल्या 57 जागां पैकी 41 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर उर्वरीत 16 जागांसाठी हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये या 16 जागा आहेत.

त्यातील 6 जागा महाराष्ट्रात आहेत तर राजस्थान 4 कर्नाटक 4 आणि हरियाणातल्या 2 जागांसाठी निवडणूक होत आहे.

ही निवडणूक प्रकिया कशी पार पडते यावर एक नजर टाकूया

लोकसभा आणि राज्यसभा ही संसदेची दोन सभागृहं. लोकसभेतील प्रतिनिधी लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले असतात. राज्यसभेतील सदस्य, राज्यसभेचं स्वरूप आणि इतर बाबींवर एक नजर टाकूया.

राज्यसभेचं स्वरूप

राज्यसभेला अप्पर हाऊस म्हणजेच वरिष्ठ सभागृह किंवा काऊन्सिल ऑफ स्टेट्स असंही संबोधलं जातं. स्वातंत्र्यानंतर पहिल्या निवडणुकीनंतर लोकसभेबरोबरच आणखी एक सभागृह असावं अशी कल्पना समोर आली. वरिष्ठ सभागृह असं संबोधण्यात येत असलं तरी राज्यसभेच्या तुलनेत लोकसभेचे अधिकार थोडे जास्त आहेत.

राज्यसभेत जास्तीत जास्त 250 जागा असू शकतात. यापैकी 12 सदस्य राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित केले जातात. तर 236 सदस्य देशातील सर्व राज्यांतून आणि 2 सदस्य केंद्रशासित प्रदेशांतून निवडले जातात.

सध्या राज्यसभेची सदस्य संख्या 245 इतकी आहे. यापैकी 233 सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात. तर 12 सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात.

राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले उमेदवार प्रामुख्याने कला, विज्ञान, सामाजिक कार्य अशा क्षेत्रांशी निगडित असतात. अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना राष्ट्रपतींनीच राज्यसभेकरिता नामनिर्देशित केलं होतं, हे आपल्याला आठवत असेल.

राज्यसभा हे स्थायी सभागृह

राज्यसभा स्थायी सभागृह आहे. हे कधीच भंग होत नाही. भारताचे उपराष्ट्रपती या सदनाचे सभापती असतात. इथल्या सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येतो. त्यांच्या जागी नवे उमेदवार राज्यसभेवर निवडून जातात.

संभाजीराजे

फोटो स्रोत, Facebook/Sambhajiraje

राज्यसभेच्या कार्यकाळाचा इतिहासही रंजक आहे. जेव्हा पहिल्यांदा निवडणुका झाल्या तेव्हा सहा वर्षांनी सगळेच निवृत्त झाले तर एक तृतीयांश सदस्य कसे निवृत्त होतील असा पेच उभा राहिला. तेव्हा लकी ड्रॉ काढण्यात आला. काही सदस्यांना 2 वर्षं, काहींना 4 वर्षं तर काहींना सहा वर्षं असा कार्यकाळ देण्यात आला.

त्यामुळे पहिल्या निवडणुकीनंतर ज्या सदस्यांचा कार्यकाळ संपला त्यांच्या जागी निवडणुका होऊ लागल्या आणि ही प्रक्रिया सुकर झाली.

राज्यसभा सदस्य होण्यासाठी पात्रता

भारतीय संविधानातील कलम 84 नुसार राज्यसभा सदस्यत्वासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.

संबंधित उमेदवार देशाचा नागरिक असावा ही पहिली अट आहे. त्याने वयाची 30 वर्षं पूर्ण केलेली असावीत. तसंच संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटी त्याने पूर्ण केल्या पाहिजेत.

कोणत्या राज्यात किती जागा?

राज्यसभेत कोणत्या राज्यातून किती जागा निवडून जातील हे त्या राज्याच्या लोकसंख्येवरून ठरवलं जातं.

राज्यसभेच्या सदस्यांची निवड विधानसभेत निवडून गेलेल्या आमदारांकडून केली जाते. प्रत्येक राज्यातील विधानसभा आमदारांची संख्या तिथल्या लोकसंख्येवर आधारित असते.

संजय राऊत

फोटो स्रोत, Twitter

उदाहरणार्थ, महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा आहेत. उत्तर प्रदेशात त्या 31 आहेत. अरूणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड, मेघालय, गोवा, मिझोरम, सिक्कीम, त्रिपुरा यांसारख्या लहान राज्यांमध्ये प्रत्येकी एक जागा आहे.

पण राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया इतर निवडणुकांपेक्षा वेगळी असते.

राज्यसभेत पोहोचण्यासाठी किती मतं आवश्यक?

राज्यसभा निवडणूक विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला ठराविक मतं आवश्यक असतात. या मतांची संख्या जागेच्या संख्येवर अवलंबून असते. ही निवड प्रक्रिया आपण सोप्या पद्धतीने समजून घेऊ.

महाराष्ट्रात 288 विधानसभा आमदार आहेत तर राज्यसभेच्या एकूण 19 जागा आपल्या राज्यात आहेत.

पण एकाच वेळी सर्वच्या सर्व जागांवर राज्यसभेच्या निवडणुका होत नसतात. ठराविक कालावधीनंतर ठराविक जागांसाठी निवडणूक होते.

राज्यसभा निवडणुकीसाठीच्या जागांच्या संख्येत 1 ही संख्या मिसळून विधानसभेच्या जागांच्या संख्येला या संख्येने विभाजित केल्यानंतर विजयासाठी आवश्यक ती मतसंख्या आपल्याला मिळते.

समजा यंदा राज्यातील 6 जागांवर निवडणूक होणार आहे.

म्हणजे 6 + 1 = 7 ही संख्या निवडणुकीसाठी गृहीत धरावी.

त्यामुळे विधानसभेच्या जागा 288 / 7 = 42

म्हणजेच या निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवाराला 42 मतांची आवश्यकता असेल.

एकल संक्रमणीय पद्धत

राज्यसभा निवडणूक प्रक्रियेची माहिती भारतीय राज्यघटनेचा कलम 8 मध्ये आहे. या प्रक्रियेला Proportional representation by single transferable vote असं म्हणतात. सर्व पक्षांना समान प्रतिनिधित्व मिळावं हा यामागचा उद्देश आहे.

एकल हस्तांतरणीय याचा अर्थ असा की विधानसभेच्या प्रत्येक आमदाराचं मत एक गृहित धरलं जातं. तरीही आमदारांना मतपत्रिकेवर पसंतीक्रम द्यावा लागतो. हा पसंतीक्रम दिला नाही तरी चालतो. तरी पहिली पसंती कोण हे मात्र नमूद करावंच लागतं. त्यामुळे प्रथम प्राधान्य असलेला उमेदवार त्या राज्यात जितके मतं गरजेचे असतील ते मिळाले की विजयी होतो.

एखाद्या उमेदवाराकडे गरजेइतके मतं नसतील आणि विजयी झालेल्या उमेदवाराकडे अतिरिक्त मतं असतील तर ते या उमेदवाराकडे जातात.

महाराष्ट्रात बहुतांशी ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. आता संभाजीराजेंचं काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

राज्यात निवडणुका जिंकल्या की राज्यसभेत सत्ताधारी पक्षाचं वजन आपसूकच वाढतं. त्यामुळे शेवटी कोणताही खासदार निवडून येणं आणि तो आणणं ही कायमच एक कसरत असते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)