राज्यसभा निवडणूक 2022 : मी सांगतो तसं मतदान करा, भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील - देवेंद्र फडणवीस, #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा-

1. मी सांगतो तसं मतदान करा, भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील - देवेंद्र फडणवीस

"मी जसं सांगतोय, तुम्ही फक्त तसं मतदान करा, आपला तिसरा उमेदवार निवडून येईल," अशा सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांना केल्या आहेत. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.

आपलं मत बाद होणार नाही याची काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी आमदारांना केली आहे. शुक्रवारी होणाऱ्या राज्यभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी भाजप आमदारांची ताज प्रेसिडेन्सीमध्ये बैठक झाली. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी आमदारांना मार्गदर्शन केलं.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत होत आहे. शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक एकमेकांसमोर उभे असून दोन्ही पक्षांसाठी एक-एक मत महत्त्वाचं आहे.

2. उदयनराजेंची संजय राऊतांना जाहीर धमकी

'संजय राऊत यांना त्यांचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन' असं म्हणत भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जाहीर कार्यक्रमात संजय राऊत यांना धमकी दिली आहे. न्यूज 18 लोकमतने ही बातमी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमधला कार्यक्रम संपल्यानंतर संजय राऊतांनी छत्रपती घराण्याबाबत एक व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना भोसले यांनी हे वक्तव्य केलं आहे.

3. राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

राज ठाकरेंविरोधात सांगलीमधील शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे. राज ठाकरेंना 11 जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज ठाकरेंना करोनाची लागण झाली असल्याने बुधवारी झालेल्या सुनावणीला गैरहजर राहिले, असं लोकसत्ताने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.

2008 मध्ये रेल्वे भरती आंदोलनानंतर राज ठाकरेंना अटक झाली होती. त्यानंतर शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी गावात मनसे कार्यकर्त्यांनी बंद पुकारला आणि जबरदस्तीने दुकानं बंद पाडली.

विनापरवाना बंद पुकारल्यामुळे शिराळा पोलीस ठाण्यात राज ठाकरेंसह 10 मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

4. शिवसेनेने माझ्या वडिलाचं खच्चिकरण केलं - अतुल सावे

"माझे वडील अयोध्येला गेले होते आणि अयोध्येला जाऊन आल्यावर ते प्रखर हिंदुत्व मांडत होते. हे शिवसेनेतील नेत्यांना आवडलं नाही आणि म्हणून त्यांनी माझ्या वडिलांचं खच्चीकरण केलं. माझ्या वडिलांना लोकसभेचं तिकीटही दिलं नाही. मुख्यमंत्र्यांनी अर्धी स्टोरी सांगितली, पूर्ण का नाही सांगितली," अशी प्रतिक्रिया भाजप आमदार अतुल सावे यांनी दिली आहे.

टीव्ही-९ मराठीने हे वृत्त दिलं आहे.

औरंगाबादच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, "देवेंद्र फडणवीस म्हणाले की बाबरी पाडताना शिवसैनिक नव्हते. पण शिवसेनेचे मोरेश्वर सावे हे शिवसैनिकांसह अयोध्येत गेले होते. मोरेश्वर सावेंचे चिरंजीव अतुल सावे आता भाजप आहेत.

हिंदुत्वाच्याच मुद्द्यावर अतुल सावे आमदार झाले. मग त्याच आमदारांना सांगा, बाबा तू ज्याची पालखी वाहतोय त्या फडणवीसांना सांग तुझे वडील तिकडे गेले होते की नव्हते. म्हणजे खरं - खोट होऊन जाऊदेत. एकतर गेले नव्हते तर तसं सांगा माझे बाबा तिकडे गेले नव्हते, त्यांनी उगाच खोटं सांगितलं. जर गेले असतील तर फडणवीसांना सांगा तुम्ही कुठे होतात हे माहिती नाही. पण माझे बाबा तिकडे अयोध्येला गेले होते. तमाम शिवसैनिक त्यांच्यासोबत उपस्थित होते."

उद्धव ठाकरेंच्या औरंगाबादमधील भाषणातील 'या' वाक्यानंतर अनेक तरुण सभा सोडून निघाले... याबाबत इथं अधिक वाचू शकता.

5. पंकजा मुंडेंना उमेदवारी न दिल्याने समर्थकाचा आत्महत्येचा प्रयत्न

पंकजा मुंडे यांना विधान परिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी न दिल्याने पाथर्डीमध्ये त्यांच्या एका समर्थकाने आत्महत्येचा प्रयत्न केलाय. मुकुंद गर्जे असं या पंकजा मुंडे समर्थकाचं नाव आहे.

रोगर हे किटकनाशक औषध पिऊन आत्महत्या करण्याचा त्याने प्रयत्न केला. पंकजा मुंडे यांना सातत्याने भारतीय जनता पार्टीकडून डावलले जात असल्याचा आरोप या समर्थकाने केलाय.

मुकुंद गर्जेला उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, प्रकृतीला पुढील धोका पाहता अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

पंकजा मुंडे, चित्रा वाघ यांना विधान परिषदेचं तिकीट नाकारण्याची 'ही' कारणं? याबाबत तुम्ही इथं अधिक वाचू शकता

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)