मुलीला वाचवण्यासाठी अख्ख्या गावाने एका रात्रीत सोडली घरं...

कुलधारा, राजस्थान, पाणी, पर्यावरण. निसर्ग
फोटो कॅप्शन, कुलधारा गावचं दृश्य
    • Author, शकील अख्तर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

राजस्थानमध्ये पसरलेल्या वाळवंटात जैसलमेर नावाचं एक शहर आहे. इथल्या वाळवंटात वाळूच्या भल्या मोठ्या टेकड्या आहेत. हे वाळवंट जैसलमेरपासून शेकडो मैलांपर्यंत पसरलंय.

जैसलमेरपासून अगदी थोड्याचं अंतरावर 'कुलधरा' नावाचं एक सुंदर गाव होतं. मात्र हे गाव गेल्या 200 वर्षांपासून ओसाड पडलंय.

सुमारे 200 वर्षांपूर्वीची ही गोष्ट. या गावात राहणारे लोक रातोरात गाव सोडून दुसरीकडे कुठेतरी गेले. त्यानंतर ते या गावात कधी परतलेच नाहीत.

कुलधरा गाव आता पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे. स्थानिक मान्यतेनुसार, दोनशे वर्षांपूर्वी जैसलमेर हे संस्थान होतं. कुलधरा गाव हे त्या संस्थानातील सर्वांत सुंदर गाव होतं. सर्वाधिक महसूल याचं गावातून यायचा.

या गावात सणउत्सव साजरे केले जायचे. पारंपारिक नृत्य आणि संगीत महोत्सव भरायचे.

कुलधारा, राजस्थान, पाणी, पर्यावरण. निसर्ग
फोटो कॅप्शन, कुलधरा

या गावात पालीवाल ब्राह्मण वास्तव्याला होते. या गावातल्या एका मुलीचं लग्न ठरलं होतं. असं म्हणतात ती मुलगी दिसायला अतिशय देखणी होती.

जैसलमेर संस्थानाचा दिवाण, सालिम सिंग याने जेव्हा त्या मुलीला पाहिलं त्या क्षणाला तो तिच्या सौंदर्यावर मोहित झाला. आणि त्याने तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरला.

स्थानिक कथांनुसार, सालिम सिंग अतिशय अत्याचारी क्रूर माणूस होता. त्याने क्रूरतेच्या परिसीमा गाठल्या होत्या, त्याच्या या कथा सर्वदूर पसरल्या होत्या. त्याचा एवढा दरारा असतानाही कुलधराच्या लोकांनी सालिम सिंगसोबत त्या मुलीचं लग्न लावून द्यायला नकार दिला.

सालिम सिंगने त्याच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी गावकऱ्यांना काही दिवसांचा अवधी दिला. पण गावकऱ्यांना हे माहीत होतं की, सालिम सिंगचं म्हणणं आपण ऐकलं नाही तर तो गावात नरसंहार घडवेल.

या कथेनुसार, कुलधराच्या लोकांनी गावच्या मंदिराजवळ असलेल्या पारावर पंचायत बसवली. त्या पंचायतीमध्ये असं ठरलं की आपल्या मुलीची आणि आपल्या गावाची इभ्रत वाचवण्यासाठी गाव कायमचं सोडून जायचं.

कुलधारा, राजस्थान, पाणी, पर्यावरण. निसर्ग
फोटो कॅप्शन, कुलधरा

त्या रात्रीच्या भयाण शांततेत कुलधराच्या लोकांनी आपापली घरं, गुरंढोरं, बोजाबिस्तरा आवरून गावं कायमचं सोडलं, ते पुन्हा गावाकडे परतलेच नाहीत.

जैसलमेरमध्ये सालिम सिंगची हवेली आजही आहे, पण ती पाहायला कोणी जात नाही.

जैसलमेरजवळ असलेल्या कुलधरा गावात एका ओळीत बांधलेली दगडी घरं आता भग्नावस्थेकडे चालली आहेत. पण हे अवशेष पाहिले तर त्यावरून या गावाची तत्कालीन समृद्धी दिसून येते.

तिथल्या काही घरांमध्ये आजही चुली, बसण्याची जागा आणि घागरी दिसतात, त्यामुळे हल्ली हल्लीच गाव सोडलं असावं असा भास होतो. इथल्या घरांच्या भिंतींमध्ये दुःखाची छटा दिसेल. हे गाव मोकळ्या जागेत वसल्याने शांतता आहे. वार्‍याचा घोंगावण्याने वातावरण आणखीनच उदास वाटतं.

इथले स्थानिक लोक त्यांच्या वडीलधाऱ्यांकडून ऐकलेल्या गोष्टी सांगतात. असं म्हणतात की, रात्रीच्या शांततेत कुलधराच्या भग्नावशेषातून कोणाच्या तरी पावलांचा आवाज येतो.

कुलधराच्या लोकांचे आत्मे आजही इथं भटकत असतात, अशी धारणा स्थानिक लोकांमध्ये प्रचलित आहे.

कुलधारा, राजस्थान, पाणी, पर्यावरण. निसर्ग
फोटो कॅप्शन, कुलधरा

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राजस्थान सरकारने या गावातली काही घरं पूर्वीप्रमाणेच तयार केली. गावात घडलेल्या गोष्टींचा साक्षीदार असलेलं ते मंदिर आजही आहे त्या ठिकाणी उभं आहे.

दरवर्षी हजारो पर्यटक हे गाव पाहण्यासाठी येतात. इथल्या स्थानिक लोकांमध्ये या गावाबद्दल आदराची भावना आहे.

या भागात आणखी एक मान्यता प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की, कुलधराचे लोक जेव्हा गाव सोडून जात होते, तेव्हा त्यांनी हे गाव पुन्हा कधीच वसणार नाही असा शाप दिला होता.

कुलधराच्या लोकांनी हे गाव सोडून आज दोनशे वर्ष सरली पण आजही जैसलमेरच्या वाळवंटात हे गाव उजाडच राहिलंय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)