Delhi Mundka Fire : 'आगीत अडकलेल्या गर्लफ्रेंडने व्हीडिओ कॉल केला, पण मी तिला वाचवू शकलो नाही'

- Author, दिलनवाज पाशा
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
पश्चिम दिल्लीच्या संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या बाहेर लोकांची मोठी गर्दी आहे. इथं दाटीवाटीने उभ्या असलेल्या लोकांच्या डोळ्यात अश्रू आहेत आणि काही प्रश्न. याच गर्दीत एक व्यक्ती शांतपणे अश्रू ढाळत उभा होता. अपरिहार्यता, नाईलाज या भावना त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू शकत होत्या.
त्याने मला सांगितलं, "माझी गर्लफ्रेंड आगीत अडकली होती. तिने मला व्हीडिओ कॉलही केला होता. मी तिला धीर देत होतो. पण धूर वाढत गेला आणि नंतर कॉल कट झाला."
या तरुणाची गर्लफ्रेंड आता बेपत्ता आहे. याच प्रकारे संजय गांधी हॉस्पिटलच्या बाहेर उभ्या असलेल्या लोकांचे अनेक आप्तस्वकीय अजूनही बेपत्ता आहेत.
14 वर्षांची मोनी तिची बहीण पूजाला शोधण्यासाठी हॉस्पिटलला आली आहे. 19 वर्षीय पूजा त्याच सीसीटीव्ही कंपनीच्या ऑफिसमध्ये काम करते, जिथे आग लागली.
मोनी सांगते, "आगीची बातमी कळताच आम्ही धावत-पळत तिथे गेलो. माझी बहीण नेमकी कुठे आहे, काहीच माहीत नाही. संजय गांधी हॉस्पिटलमध्ये शोधा, असं प्रशासनाने आम्हाला सांगितलं.
बेपत्ता लोक आणि शोधणारे नातेवाईक
मोनाची बहीण पूजा घरात सर्वात मोठी होती. नोकरी करून ती आपल्या घराचा उदरनिर्वाह चालवायची.
मोठ्या बहिणीची आठवण सांगताना मोनी म्हणते, "ती सकाळी नऊ वाजता ऑफिसला गेली होती. ती डेटा एंट्रीचं काम करायची. तिच्याकडे फोन नव्हता. म्हणूनच ती आम्हाला फोन करू शकली नाही."

नौशाद आपल्या मामींना शोधण्यासाठी संजय गांधी हॉस्पिटलला पोहोचला होता. आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यापासून तो आसपासच्या रुग्णालयांच्या चकरा मारत आहे. पण अजूनपर्यंत त्याला आपल्या मामींबाबत कोणतीच माहिती मिळू शकलेली नाही.
तो सांगतो, "मी सफदरजंग हॉस्पिटलला गेलो. एम्स ट्रॉमा सेंटरला गेलो. राम मनोहर लोहिया हॉस्पिटललाही गेलो. पण मामींबद्दल काहीच कळलं नाही. इथं काही माहिती मिळते का पाहण्यासाठी आलो आहे."
पंकज त्याचा भाऊ प्रवीणचा शोध घेण्यासाठी हॉस्पिटलला आला होता. त्यानेही अनेक रुग्णालय पालथे घातले पण भावाविषयी कळू शकलं नाही.
तो सांगतो, "माझा भाऊ कंपनीत गेल्या आठ वर्षांपासून काम करत होता. तो ग्राफिक्स डिझायनर आहे. आम्हाला त्याच्याविषयी अजूनपर्यंत काहीच कळलेलं नाही."

पंकजला त्याच्या एका मित्राकडून या घटनेविषयी समजलं. तो पुढे सांगतो, "सगळे मृतदेह संजय गांधी रुग्णालयात आहेत, असं आम्हाला सांगण्यात आलं आहे. ओळख पटवण्यासाठी कदाचित DNA टेस्टसुद्धा करावी लागू शकते, असंही त्यांनी सांगितलं आहे."
40 वर्षीय मोनी यासुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या कंपनीत काम करायच्या. आग लागल्यापासून त्या बेपत्ता आहेत. त्यांच्या फोनची रिंग मात्र वाजते, पण त्याला प्रतिसाद नाही."
त्यांच्या आईच्या चेहऱ्यावर एक मोठं प्रश्नचिन्ह आहे.
त्या सांगतात, "आगीच्या प्रकारानंतर तिथल्या अनेक मुलींना जिन्यावरून आणि क्रेनने बाहेर काढण्यात आलं होतं. त्याचा आम्ही व्हीडिओ पाहिला आहे. त्यामध्ये आमच्या मुलीसारखी दिसणारी एक मुलगी दिसते. पण ती आता सापडत नाही."
दुर्घटनेत बळी पडलेले बहुतांश लोक संकट काळी आपल्या आप्तस्वकियांना संपर्क साधू शकले नाहीत. पण काहींनी याची माहिती तातडीने आपल्या घरी दिली.
'मी बहिणीला आगीत अडकलेलं पाहिलं, पण काहीच करू शकलो नाही'
नांगलोईची राहणाऱ्या आणि सीसीटीव्ही कंपनीत काम करणाऱ्या 21 वर्षीय मुस्कानने आग लागताच तिचा भाऊ इस्माईल याला कॉल केला होता. इस्माईल पंधरा मिनिटांत इमारतीखाली पोहोचला. पण तो बहिणीला वाचवू शकला नाही. आता मुस्कान बेपत्ता आहे.

इस्माईल सांगतो, "मी इथं पोहोचलो तेव्हा मुस्काम मला इमारतीत अडकलेली दिसली. मागच्या रस्त्याने बाहेर ये, असं मी तिला फोनवर सांगितलं होतं. पण त्यानंतर माझं तिच्याशी काहीच बोलणं होऊ शकलं नाही.
इस्माईल आणि त्याच्या नातेवाईकांना शक्य त्या ठिकाणी मुस्कानचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यामध्ये यश आलं नाही.
इमारतीची आग विझवण्यात आल्यानंतर ते बहिणीच्या शोधात आतमध्येही पोहोचले, त्याचाही काहीच उपयोग झाला नाही.
आगीत बळी पडलेल्या बहुतांश महिला
ज्या इमारतीत आग लागली, त्याठिकाणी बहुतांश महिला कर्मचारी नोकरीस होत्या.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा सरासरी पगार 12 ते 15 हजार दरम्यान होता.
आग विझवण्यात आल्यानंतर इमारतीबाहेर कित्येक महिलांच्या चपला अस्ताव्यस्त पडल्याचं पाहायला मिळालं.
आगीत बेपत्ता झालेल्या पूजाने तीन महिन्यांपूर्वीच कामास सुरुवात केली होती. तिला वडील नाहीत, ती स्वतःच सगळा घरखर्च चालवायची.

तिची आई रुग्णालयाबाहेर रडत उभी होती. तिच्या तोंडातून एकही शब्द फुटत नव्हता. तिच्याविना आमचं आता काय होणार, असा प्रश्न तिची बहीण मोनी विचारत होती.
तर मुस्कानचा भाऊ इस्माईल म्हणाला, "माझी बहीण एक आनंदी स्वभावाची मुलगी होती. ती तीन वर्षांपासून याठिकाणी काम करायची. तिची स्वप्नं खूप मोठी होती. ती सुखरुप असावी, ती आम्हाला लवकर सापडावी, अशीच आम्ही प्रार्थना करतो."
दिल्ली पोलिसांनी बेपत्ता लोकांसाठी एक नियंत्रण कक्ष उघडलं आहे. याठिकाणी आतापर्यंत 19 जणांबाबत चौकशीत करण्यात आली. त्यामध्ये चार पुरुष तर 15 महिला आहेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
बेपत्ता लोकांची माहिती घेण्यासाठी लोक रुग्णालयांच्या चकरा मारत आहेत. या घटनेत जखमी झालेल्या लोकांची नावे पोलिसांनी जाहीर केली. पण मृत व्यक्तींची ओळख अद्याप पटू शकलेली नाही.
या दुर्घटनेत बळी पडलेल्या व्यक्तींच्या मृतदेहांची राखरांगोळी झाली असून त्यांची ओळख पटवण्यासाठी DNA टेस्ट करण्याची आवश्यकता आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
बीबीसी प्रतिनिधी अभिनव गोयल यांनी संजय गांधी हॉस्पिटलबाहेर बसलेल्या सुनीता यांच्याशीही संवाद साधला. आपल्या मुलीच्या शोधात असलेल्या या माऊलीचे अश्रू थांबता थांबत नव्हते.त्या म्हणाल्या, "माझी मुलगी सोनम या कंपनीत काम करत होती. एका वर्षापासून ती याठिकाणी अँटिना लावण्याचं काम करायची. कालपासून तिचा आम्ही ठिकठिकाणी शोध घेत आहोत. पण ती कुठेच दिसत नाही. पोलीसपण आम्हाला काही सांगत नाहीत. पाच मजली बिल्डिंग आहे.""तिथे येण्या-जाण्यााठी फक्त एकच रस्ता आहे. पोलीस आम्हाता तिथेसुद्धा जाऊ देत नाहीत. कुणीच काही बोलायला तयार नाही."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























