मध्य प्रदेश: आसिफ आणि साक्षीने प्रेमविवाह केला, बदल्यात प्रशासनाकडून आसिफचं घर जमीनदोस्त

फोटो स्रोत, TAPAS MALLICK/BBC
- Author, नेयाज फारुकी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 6 मिनिटे
आसिफ आणि साक्षीचं एकमेकांवर प्रेम होतं. समाज आपलं प्रेम कधीही स्वीकारणार नाही हे त्यांना माहीतचं असावं. मात्र याच दरम्यान प्रशासनाने आसिफचं घर जमीनदोस्त केलंय.
8 एप्रिल रोजी मध्यप्रदेश प्रशासनाने आसिफचे घर बेकायदेशीर असल्याचं म्हणत पाडलं.
स्थानिक प्रशासनाने याप्रकरणी बीबीसीशी बोलण्यास नकार दिलाय.
मात्र, मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ट्वीट करून म्हटलं होतं की, "विद्यार्थिनीच्या अपहरणातील आरोपी आसिफ खानचं दुकान आणि घर पाडण्यात आलं आहे. मागील दोन दिवसांपासून आरोपी आसिफ खानच्या दुकानांसह त्याच्या बेकायदेशीर घरावर कारवाई करण्यात आली आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मध्यप्रदेश प्रशासनाकडून कोणतीही न्यायिक प्रक्रिया पार न पाडता मुस्लिमांची घरं पाडल्याची अनेक प्रकरणं अलीकडच्या काही महिन्यांत समोर आली आहेत.
पण आसिफ आणि साक्षीचं प्रकरणही तितकंच गंभीर आहे कारण हिंदुत्ववादी संघटनांनी मुस्लिम तरुणांच्या हिंदू मुलींवरील प्रेमाची व्याख्या 'लव्ह जिहाद' अशी केलीय.
ज्या ठिकाणी आसिफचं घर होतं तिथं आता फक्त आणि फक्त आता विटांचा ढीग आहे.
मुलीला परत पाठवून दे, आम्ही पोलिसांत तक्रार करणार नाही.
3 एप्रिलच्या सकाळी या सर्व प्रकरणाला सुरुवात झाली. आसिफच्या फोनवर वेगवेगळ्या नंबरवरून कॉल येत होते. रमजानमुळे तो त्या दिवशी उशिरा झोपला आणि फोन कॉल्सला उत्तर देता आलं नाही.
शेवटी त्याने कॉल उचलला तेव्हा त्याला कळलं की साक्षीच त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. नातेवाईकाच्या घरातून पळून गेल्यानंतर साक्षी दूरच्या शहरात त्याची वाट पाहत होती. ती अनोळखी लोकांकडून फोन घेऊन त्याला कॉल करत होती.
आसिफ लगोलग साक्षीला घेऊन कुठल्यातरी अज्ञात ठिकाणी गेला.

फोटो स्रोत, TAPAS MALLICK/BBC
साक्षी आणि आसिफ हे दोघेही मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यातील एकाच गावाचे रहिवासी आहेत. साक्षीच्या घरच्यांना तिच्या आणि आसिफच्या नात्याबद्दल आधीच माहिती होती. धर्म वेगळा असल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना हे संबंध स्वीकारणार नाहीत, अशी भीती त्यांना होती.
आणि अखेर त्यांची भीती खरी ठरली.
साक्षी घरातून गायब झाल्यावर काही तासांतच ही बातमी संपूर्ण भागात पसरली. गावात हिंदुत्ववादी संघटनांचे लोक जमले, त्यांनी संपाची घोषणा करून रस्ता बंद केला. त्यांनी आसिफचं घर आणि दुकान फोडून साक्षीला परत आणण्याची मागणी केली.
तोपर्यंत आसिफ आणि साक्षी दुसऱ्या राज्यात गेले होते आणि दोघेही लग्नाच्या तयारीत होते. अशा परिस्थितीत आसिफचे वडील हलीम खान यांच्यावर त्या दोघांना ही परत आणण्यासाठी दबाव वाढत होता.
त्यांच्या म्हणण्यानुसार, "साक्षीच्या काकांनी त्यांना आधी फोन केला. ते म्हणाला, 'मुलांनो लवकर शोधा, आम्ही तक्रार करणार नाही."
हलीम सांगतात, "मी त्यांना विचारलं की मन्नू भाई आम्ही काय करावं सांगा, मी साक्षीशी बोललोय पण ती परत यायला काही तयार नाही."
'मला छळलं तर मी आत्महत्या करेन'
हलीम खान यांना पोलीस स्टेशन मध्ये बोलावलं असता ते पोलिसांसमोरच आसिफ आणि साक्षीशी फोनवर बोलले. हलीम खान सांगतात की, "सर्व कर्मचारी फोनवरचं संभाषण ऐकत होते. मी आसिफला सांगितलं की तू खूप चुकीचं काम करतोयस. तुझ्या जीवाला धोका आहे. आम्ही पोलीस स्टेशनमध्येच आहोत."
ते सांगतात की, "आसिफ म्हणाला की साक्षी जे सांगेल तेच मी करीन," त्यानंतर हलीम खान साक्षीशी बोलले. "मी म्हणालो मुली तू परत का येत नाहीस. इथं वातावरण बिघडतंय, लोक दंगली घडवतील. हट्ट करू नकोस. पण तिने स्पष्टपणे सांगितलं की ती येणार नाही."
ते म्हणाले, "ते दोघेही शिक्षित आणि प्रौढ आहेत. एसएचओनेही साक्षीला समजावून सांगितलं, पण तिचा आणखी छळ झाला तर ती आत्महत्या करेल असं सांगत मुलीने त्यांना नकार दिला."

फोटो स्रोत, TAPAS MALLICK/BBC
बीबीसीशी बोलताना साक्षीने स्टेशन प्रभारींशी बोलणं झाल्यावर दुजोरा दिला. ती म्हणते, "मी स्वतः म्हणाले की मला यायचं नाही, मी खूप त्रासले आहे, पण त्यांनी माझं ऐकून त्याकडे दुर्लक्ष केलं."
ती म्हणते, "ते मला तिथे (पोलीस स्टेशन) येण्यास सांगत होते. आम्ही तिथं कसं जाणार, आमचा जीव धोक्यात होता. समाजातील लोकांनी आम्हाला सोडलं नसतं. मला त्याला (आसिफ) तिथं घेऊन जायचं नव्हतं. मी त्यांना तिथं जाऊ नका असं सांगितलं."
आसिफ आणि साक्षीने नकार दिल्यानंतर हलीम खान यांना ताब्यात घेण्यात आलं. त्यादरम्यान गावात निदर्शने झाली होती. आसिफच्या कुटुंबीयांनी भीतीपोटी नातेवाईकांकडे आश्रय घेतला. 7 एप्रिलला पोलिसांनी त्यांच दुकान आणि दुसऱ्या दिवशी त्यांच घर जमीनदोस्त केलं.
लोकेशनवरून पकडलं जाण्याच्या भीतीने त्यांनी मोबाईल फेकून दिला होता. त्यामुळे त्यांच्या घर आणि दुकानांची तोडफोड झाल्याची बातमी त्यांना मिळू शकली नाही, असं आसिफ आणि साक्षी सांगतात. त्यांनी कोणाजवळतरी फोन मागितल्यावर त्यांनी ही बातमी पाहिली आणि त्यांना हा प्रकार कळला.
'माझं सर्वांत मोठं सामर्थ्य माझं प्रेम आहे'
साक्षी आणि आसिफच्या म्हणण्यानुसार, ते रोजच ठावठिकाणा बदलत होते. एके दिवशी ट्रेनमधून त्यांनी एक व्हिडिओ केला. यात साक्षी म्हणाली की ती आसिफसोबत स्वतःच्या इच्छेने आली आहे.
व्हिडीओमध्ये साक्षीने म्हटलयं की, "मी माझ्या मर्जीने आसिफशी लग्न केलयं आणि माझे कुटुंबीय त्याच्यावर खोटे आरोप करत आहेत. आसिफच्या कुटुंबावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे."
"आसिफच्या कुटुंबीयांना आणखी त्रास दिल्यास ती आत्महत्या करेल," असं साक्षीने सांगितलं.

फोटो स्रोत, TAPAS MALLICK/BBC
साक्षीने हा व्हीडिओ शेअर केल्यावर ती खूप घाबरली होती. ती म्हणते, "आम्हाला माहीत होतं की पोलीस फोर्स आमच्यामागावर आहे. समाजतले लोक आमच्या मागे लागलेत."
साक्षीच्या कुटुंबीयांनी आसिफविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत होते.
तिचा भाऊ सांगतो, "मी पंधरा दिवस पोलिसांसोबत त्या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही मोबाईल लोकेशनच्या आधारे त्यांचा पाठलाग करत होतो. काही ठिकाणांहून तर ते आम्ही येण्याच्या काही मिनिटांपूर्वी निघून गेले होते."
आसिफ सांगतो, "माझा मुद्दा सिद्ध करण्यासाठी मला कोणत्याही पुराव्याची गरज नाही, माझी सर्वांत मोठी ताकद माझ्या प्रेमात आहे."
गुगलच्या मदतीने त्यांनी घरापासून पाचशे किलोमीटर अंतरावर असलेल्या एका हिंदू मंदिरात जाऊन हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केलं. साक्षी म्हणते, "ते नवरात्रीचे दिवस होते. तो एक शुभ दिवस होता. त्यामुळे आम्ही लग्न करण्याचा विचार केला."
'देवाचीचं कृपा म्हणून मी तिथून निघू शकले'
साक्षीचा भाऊ आणि आई गावातील लोकांबरोबर बोलण्यास कचरतात. त्यांना मुस्लिमांमध्ये नातं जोडायचं नव्हतं असं ही ते सांगतात. ते दोघं एकाच गावातील असल्याने दोन्ही कुटुंबांची चांगली ओळख आहे. पण आता ते एकमेकांच्या वस्तीत ही जायचं टाळतात.
साक्षी सांगते की, "ते दोघेही एकाच शाळेत शिकायचे आणि त्यांच्या प्रेमाची सुरुवात दहा वर्षांपूर्वी शाळेतूनचं झाली. जेव्हा घरचे लोक साक्षीसाठी स्थळ शोधू लागले, तेव्हा तिने आसिफला घरी बोलावलं जेणेकरून सर्वांसमोर त्यांच्या लग्नाबद्दल बोलता येईल."

फोटो स्रोत, TAPAS MALLICK/BBC
साक्षी म्हणते की, "माझं आई आणि भावासोबत बोलणं झालं होतं. मी त्यांना सांगितलं की मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे. आई म्हणाली की आसिफ दुसऱ्या धर्माचा आहे त्यामुळे त्यांचं लग्न होऊ शकत नाही. माझ्या भावाने ही धमकी दिली होती की, असं झालं तर हिंदू-मुस्लिम दंगली होतील."
साक्षी सांगते, "त्या दिवसापासून मी घरात कैद झाले. माझं शिक्षण ही बंद केलं होतं. मी देवासमोर रडायचे. माझी आई, एक आई असूनही माझी अवस्था समजू शकली नाही."
आसिफ म्हणतो की, "साक्षीने मला सांगितलं की जर आपलं लग्न झालं नाही तर मी आत्महत्या करेन. तिला काही झालं असतं तर मी अडकलो असतो. मग तिथं मी फक्त मुस्लिम असतो. प्रकरण सर्वांच्या संमतीने मिटावं म्हणून मी माझ्या परीने प्रयत्न केले."
साक्षीची आई आणि भाऊ कोणत्याही किमतीत लग्नासाठी तयार नव्हते. साक्षी आणि आसिफही मागे हटणाऱ्यातले नव्हते.
साक्षीला रोखण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला. तिच्यावर तंत्रमंत्राचे 'उपाय' केले. अखेर तिला आसिफपासून दूर नेण्यासाठी नातेवाईकाच्या घरी पाठवण्यात आलं.
वीस दिवसांनी संधी मिळताच ती तिथून निसटली. ती म्हणते, "देवाचा आशीर्वादचं होता म्हणून मी तिथून सुटू शकले. देवाच्या मनात ही हेच असावं."

फोटो स्रोत, TAPAS MALLICK/BBC
सध्या आसिफ आणि साक्षीने एका सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतलाय. मध्यप्रदेशाबाहेरील न्यायालयाने या दोघांना सुरक्षा पुरवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
दुसरीकडे, हलीम खानही यांनीही गाव सोडलं आहे. त्यांनी आपल्या पत्नीच्या माहेरी आश्रय घेतला आहे. त्यांचा एक मुलगा त्याच्या गरोदर पत्नीसह तिच्या माहेरी आहे तर दुसरा मुलगा नातेवाईकांच्या घरी आहे.
बाहेरच्या लोकांनी वातावरण बिघडवलं
हलीम खान यांच्या म्हणण्यानुसार, 1992 मध्ये पंचायतीने त्यांना सर्वांच्या संमतीने घर दिलं होतं.
ते सांगतात की, "चार दिवसांनंतर जेव्हा माझी पोलीस कोठडीतून सुटका झाली तेव्हा मी शेजाऱ्यांना विचारलं की त्यांनी प्रशासनाला त्यांचं घर पाडण्यापासून का रोखलं नाही."
तेव्हा ते सांगतात की, "शेजाऱ्यांनी सांगितलं की सर्वत्र पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता आणि कोणालाही घराबाहेर पडू दिलं जातं नव्हतं."
त्यांच्या शेजाऱ्यांनी ऑन रेकॉर्ड बोलणं टाळलं. कारण त्यांना भीती आहे की ते प्रशासन आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या निशाण्यावरही येऊ शकतात.
मात्र नाव न छापण्याच्या अटीवर ते सांगतात की, कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
हलीम खान अभिमानाने सांगतात की ते गावातील प्रतिष्ठित व्यक्तींपैकी एक आहेत. स्थानिक राजकारणातही ते सक्रिय आहेत. ते सांगतात की, कोणत्याही गावात वाद, तणाव निर्माण झाला की ते सोडवायला प्रशासन आम्हाला बोलवायचं.
बाहेरच्या काही लोकांनी इथल्या लोकांना फुस लावून गावातील वातावरण बिघडवलं. पण आता इथं त्यांचं ऐकून घेणार कोणीच नसल्याचं हलीम खान यांच्या म्हणणं आहे.
बीबीसीची टीम जेव्हा त्यांना भेटली तेव्हा त्यांनी रात्रीच्या जेवणासाठी आम्हाला गावातल्या ढाब्यावर बोलावलं. तिथं गेल्यावर थोडा वेळ विचित्र शांतता पसरली. आपुलकीने वागणारे ढाब्याचे मालकही हलीम खान यांचं घर विनाकारण पाडण्यात आल्याचं आम्हाला सांगत होते.
पण जेवण झाल्यानंतर हलीम खान एकांतात नेऊन स्मितहास्य करत सांगतात की, घर पडण्याची मागणी करणाऱ्या लोकांमध्ये ढाब्याचा मालकही होते.
हॉटेलचे मालक आमचं संभाषण दुरुनचं मात्र काळजीपूर्वक ऐकत होते. हलीम खान निघून गेल्यावर काही वेळातच माफी मागण्याच्या अंदाजात ते म्हणाले, "काय करता, समाजाचं ऐकावं लागतं. लोकांनी मला पकडून तिथं बसवलं."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























