राहुल द्रविड यांना कोरोना; आशिया चषकासाठी प्रयाण लांबणीवर

फोटो स्रोत, Gareth Copley
भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोना झाल्याचं वृत्त आहे. पीटीआयने यासंदर्भात बातमी दिली आहे. भारतीय संघ आशिया चषकासाठी दुबईला रवाना होण्यापूर्वी कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यातून द्रविड यांना कोरोना संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं .
बीसीसीआयचं वैद्यकीय पथक द्रविड यांच्या प्रकृतीकडे लक्ष ठेऊन आहे. कोरोना संसर्गामुळे द्रविड संघाबरोबर दुबईला रवाना होऊ शकले नाहीत. पारस म्हांब्रे यांच्याकडे हंगामी कार्यभार सोपवण्यात आला आहे.
प्रमुख खेळाडूंविना भारतीय संघ तीन एकदिवसीय सामन्यांसाठी झिम्बाब्वेत होता. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख आणि माजी खेळाडू व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्याकडे प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
द्रविड कोरोनातून बरे झाल्यास ते आशिया चषकासाठी रवाना होतील. पण तसं न झाल्यास लक्ष्मण यांच्याकडेच पुन्हा जबाबदारी सोपवली जाऊ शकते. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल. द्रविडव्यतिरिक्त संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ दुबईला रवाना झाले आहेत.
भारतीय संघ 28 ऑगस्टला पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे.
द्रविडच्या साधेपणाची झलक
इंडियन प्रीमियर लीगची धामधूम सुरू असतानाच, टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड सध्या मैदानाबाहेरील त्याचा वेळ विविध कार्यक्रम आणि स्वत:साठी खर्च करताना दिसतोय. अशाच एका प्रसंगी राहुल द्रविडनं सगळ्यांना आचंबित केलं आणि त्याच्यामधील नम्र, साधेपणाचं दर्शनही दिलं.
झालं असं की, बंगळुरूमध्ये माजी क्रिकेटर गुंडाप्पा विश्वनाथ यांच्या 'Wrist Assured' या पुस्तकाचं प्रकाशन होतं. या प्रकाशन प्रसंगी स्वत: गुंडाप्पा विश्वानाथ होतेच. सोबत प्रसिद्ध लेखक रामचंद्र गुहा हेसुद्धा होते.

फोटो स्रोत, Bookworm Bookstore, Blr
थोड्या वेळानं राहुल द्रविड तिथं आला आणि त्यानं पुढे बसलेल्या रामचंद्र गुहांना नमस्कार करून शेवटच्या रांगेत रिकाम्या असलेल्या खुर्चीवर जाऊन बसला. त्यानं मास्क परिधान केल्यानं तिथं कुणालाही तो 'राहुल द्रविड' असल्याचे कळले नाही. अगदी राहुल द्रविडच्या पुढे बसलेल्या महिलेलाही ते कळलं नाही.
नंतर गुंडाप्पा विश्वनाथ यांनी जेव्हा राहुल द्रविडला नमस्कार केला, तेव्हा सगळ्यांना याबाबत माहिती पडलं आणि सगळेजण आवाक् झाले.
@vinayakashy या ट्विटर हँडलवरून राहुल द्रविडच्या नम्रपणाचा आणि साधेपणाचा किस्सा ट्विटरवर थ्रेडच्या रूपात शेअर केला आहे. आता ट्विटरसह सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राहुल द्रविडबाबतचा हा प्रसंग शेअर केला जातोय. अनेक माध्यमांनीही दखल घेत राहुल द्रविडचं कौतुक केलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
नव्वदीच्या शेवटी आणि 2000 ते 2011 दरम्यान भारतीय क्रिकेट संघ सामन्यादरम्यान कधीही अडचणीत आला, तेव्हा राहुल द्रविड खेळतो आहे, यामुळे दर्शकांना थोडा धीर असायचा.
भारताकडे तेव्हा कितीतरी उत्तम फलंदाज होते, पण राहुल द्रविडवर तमाम क्रिकेट रसिकांचा एक वेगळाच विश्वास होता. राहुल संघाला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढणार किंवा तो सामनाच जिंकवून देणार, असं त्यांना नेहमी वाटायचं.
दोन्ही प्रकारात 10,000 रन्स
राहुल द्रविडने एकूण 164 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 13,288 रन केले आहेत, तर 344 एकदिवसीय सामन्यांमध्ये 10,889 रन केले आहेत. दोन्ही आंतरराष्ट्रीय प्रकारांमध्ये 10,000 पेक्षा अधिक रन करणाऱ्या काही निवडक खेळाडूंच्या क्लबमध्ये त्याचा समावेश होतो.
द्रविडच्या नावावर आणखी एक अनोखा विक्रम आहे. कसोटी सामन्यांमध्ये यष्टीरक्षणाव्यतिरिक्त सर्वाधिक कॅच घेण्याचा जागतिक विक्रम द्रविडचा आहे. निवृत्तीसमयी त्याने 164 टेस्ट सामन्यांमध्ये 210 कॅचेस यष्टीरक्षणाव्यतिरिक्त घेतल्या आहेत.
तसंच द्रविड हा चार डावात सलग शतक ठोकणारा एकमेव खेळाडू आहे. पण हे राहुलचे निवडक विक्रम आहेत.

फोटो स्रोत, IAN KINGTON
आपल्या 'डिफेन्स टेकनिक'साठी ओळखल्या जाणाऱ्या राहुलला 'द वॉल' म्हटलं जातं. आणि आज त्याच्या 45व्या वाढदिवशी जाणून घेऊया, पत्रकारांनी आणि खेळाडूंनी यात्च्या आठवणींना बीबीसी तामिळशी बोलताना उजाळा दिला.
द्रविडमध्ये झालेला बदल
राहुल द्रविडच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार विजय लोकापल्ली सांगतात, "त्याच्या सुरुवातीच्या दिवसात त्याला 'डिफेन्सिव' फलंदाज म्हटलं जायचं. नंतर राहुलनं त्याच्या बॅटिंगच्या शैलीत काही बदल केले. त्यामुळे त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये जास्त रन काढता आले."
ते पुढे म्हणाले, "मी जेव्हा राहुल द्रविडचा विचार करतो तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर स्वत:च्या विक्रमापेक्षाही संघाचा विचार करणारा एक नि:स्वार्थी खेळाडू येतो. लक्षात घ्या, त्यांनी संघासाठी यष्टीरक्षण केलं आणि गरजेनुसार अगदी कोणत्याही क्रमांकावर तो बॅटिंग करायला आला आहे."

फोटो स्रोत, AFP
त्यानं क्रिकेटसाठी जे योगदान दिलं किंवा जे काही मिळवलं, त्या तुलनेत म्हणावा तितका आदर-सन्मान त्याला मिळाला नाही, असं लोकपल्लींना वाटतं.
"त्याला निरोपाचा सामना पण योग्य रीत्या मिळाला नाही. 2007च्या वर्ल्ड कपमधल्या पराभवानंतर कर्णधार द्रविडवर खूप टीका झाली. संघाच्या पराभवासाठी एकट्या कर्णधाराला दोष देणं योग्य नाही. हा सांघिक पराभव होता," असंही मत त्यांनी नोंदवलं.
मैदानाबाहेरचा राहुल कसा आहे?
राहुल द्रविड हा अतिशय सभ्य क्रिकेटपटू आहे. त्याला अनेकदा 'क्रिकेटचा खरा जेंटलमन'ही संबोधलं गेलं आहे. मैदानावरचा शांत, कधी न रागावणारा द्रविड अनेकांसाठी आदर्श आहे. पण मैदानाबाहेरचा राहुल कसा आहे?
वेंकटेश प्रसाद द्रविडबरोबर अनेक वर्ष कर्नाटक आणि भारतीय संघात खेळले आहेत. ते सांगतात, "मी भेटलेल्या क्रिकेटपटुंपैकी राहुल अतिशय प्रामाणिक क्रिकेटपटू आहे. मला हे लॉर्ड्सला खेळलेल्या पहिल्या कसोटीतच लक्षात आलं होतं. साधारणत: तो अतिशय शांत असायचा. क्रिकेट सोडलं तर पुस्तकं हेच त्याचे साथीदार होते."
रोलर कोस्टर राईडची भीती
"आधी त्याला कन्नड बोलणं फार काही जमायचं नाही. पण नंतर त्यानं बरीच सुधारणा केली," प्रसाद म्हणाले.
प्रसाद हसत हसत द्रविडविषयी एक प्रसंग सांगतात, "एकदा आम्ही परदेशात एका मालिकेसाठी गेलो होतो तेव्हा राहुल रोलर कोस्टर राईडला खूप घाबरला होता. मी त्याला सांगितलं की, अशी कल्पना कर की ही राईड म्हणजे अॅलन डोनाल्डचा एक फास्ट बॉल आहे. मी त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला."

फोटो स्रोत, Getty Images
द्रविडबरोबर कर्नाटक आणि टीम इंडिया संघांमध्ये खेळलेले सुजीथ सोमसुंदर सांगतात, "राहुल सतत बॅटिंगचं वेगवेगळं तंत्र, किंवा एखाद्या बॉलरचा सामना कसा करावा, हाच विचार करायचा. 15 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील, अशा दोन्ही स्पर्धांच्या वेळी मी त्याला भेटलो होतो. तेव्हा पासून राहुलमध्ये तसुभरही बदल झालेला नाही. सगळ्यांना मदत करण्यात तो कायम आघाडीवर असायचा."
राहुल द्रविडची सर्वोत्तम खेळी
तामिळनाडूकडून खेळणारे विजय शंकर सांगतात, "ते माझे लहानपणापासूनच प्रेरणास्थान आहेत. मी त्यांची 2003-04 मधली अॅडिलेडमधली खेळी कितीतरी वेळा बघितली आहे. माझ्यामते ती त्याची सर्वोत्तम खेळी होती."
तो सुपरस्टार आहे?
भारतीय तसंच कर्नाटक क्रिकेटवर लिहिणारे वेदाम जयशंकर सांगतात, "खेळावर त्याची प्रचंड निष्ठा आहे. खेळाशिवाय आणखी त्याला कशाची आवड असेल तर ती पुस्तकांची."

फोटो स्रोत, Getty Images
ते पुढे सांगतात, "नुकतंच एक विज्ञान प्रदर्शन भरलं होतं. राहुल त्या प्रदर्शनाला गेला होता. त्याच्या मुलाबरोबर तो रांगेत उभा होता आणि आपला नंबर येण्याची वाट बघत होता. मला फार आश्चर्य वाटलं. हा खरा राहुल आहे, कायम साधेपणा अंगी असलेला."
"लोक त्याला 'सुपरस्टार' म्हणतात. पण त्याने कधीच स्वत:ला 'सुपरस्टार' मानलं नाही."
मुलतानचा डाव घोषित
"कर्णधार असताना द्रविड योग्य निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध होता. पण (2004 साली पाकिस्तानच्या) मुलतान कसोटीमध्ये जेव्हा सचिन 194 धावांवर खेळत होता, त्याच वेळी द्रविडनं डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण संघाचं हित लक्षात घेत त्यानं हा निर्णय घेतला होता," वेदाम जयशंकर यांचं म्हणणं आहे.
द्रविडनं या निर्णयाचं अनेकदा स्पष्टीकरण दिल्याची आठवणसुद्धा वेदाम यांनी केली.
तरुणांसाठी आदर्श
सचिन तेंडुलकर, रिकी पाँटिंग, युनुस खान यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ क्रिकेटपटूंनी द्रविडची स्तुती केली आहे.
त्याच बरोबर अजिंक्य रहाणे, संजू सॅमसन, करुण नायर, विजय शंकर अशा अनेक तरुणांना द्रविडनं प्रशिक्षण दिलं, आणि या खेळाडूंनी त्याच्याकडून अनेक टिप्स घेतल्या.
द्रविडनं अनेकदा टीकाही पचवली तर कधी त्या टीकेला सडेतोड उत्तरसुद्धा दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सुरुवातीला द्रविड हा एकदिवसीय सामन्यांसाठी योग्य खेळाडू समजला जात नव्हता. तो रन रेट वाढवू शकत नाही, म्हणून तो फक्त टेस्ट मॅचसाठी योग्य आहे, अशी त्याच्यावर कायम टीका होत होती.
पण राहुलनं एकदिवसीय सामन्यात 10,000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. इतकंच काय तर तो अतिफास्ट समजल्या जाणाऱ्या T20 सामन्यांमध्येही खेळला आणि टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत.
द्रविडनं मानद डॉक्टरेट नाकारली
2017 साली बंगळुरू विद्यापीठानं देऊ केलेली मानद डॉक्टरेट द्रविडनं नाकारली. "मी क्रिकेटमध्ये रिसर्च केल्यावरच ती घेईन," असं त्यानं स्पष्टपणे सांगितलं होतं.
बंगळुरूमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना तो म्हणाला, "अपयशाबद्दल बोलण्यासाठी मी पूर्णपणे पात्र आहे. मी 604 मॅचेसमध्ये खेळलो आहे. पण त्यापैकी 410 सामन्यात मी 50हून जास्त धावा करू शकलो नाही."
क्रिकेटचे बारकावे, उत्तम बचावतंत्र, कर्णधारपद, बॅटिगची आकर्षक शैली, नि:स्वार्थी भावना, या शब्दांशिवाय राहुल द्रविडची ओळख अपूर्ण आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























