भारतात सध्या लष्करभरती का बंद आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
चौदा लाख कर्मचारी, वेगवेगळ्या रेजिमेंट्स, पॅराट्रूपर्स, इंजिनियर्स आणि डॉक्टर्स... भारतीय लष्कर जगातल्या सगळ्यात मोठ्या सेनांपैकी एक आहे. रोजगार निर्मितीच्या बाबतीतही ते जगात आघाडीच्या संस्थांमध्ये आहे.
दरवर्षी भारतीय लष्करातून साठ हजारजण निवृत्ती स्वीकारतात आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी शंभरएक ठिकाणी सैन्यभरतीचं आयोजन होतं.
पण गेल्या दोन वर्षांत ही भरतीप्रकिया थांबलीय. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकार थ्री ईयर टूर ऑफ ड्युटी म्हणजे तीन वर्षांच्या लष्करसेवेचा विचार करत असल्याचं वृत्त सूत्रांच्या हवाल्यानं प्रसारित झालं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
पण हे असं पाऊल उचलण्याचा विचार पुढे का आला? लष्कर भरतीची प्रक्रिया का थांबली असावी? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केलाय.
लष्करातली नोकरी अभिमानाची आणि आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असल्यानं मोठ्या प्रमाणात भारतीय तरूण सैन्यात जायला उत्सुकही असतात.
पण दोन वर्ष भरती थांबल्यानं त्यांना चिंता वाटतेय, कारण 21 वर्षांची वयोमर्यादा पार झाली, तर त्यांची भरतीची संधी हुकण्याची शक्यताय. दिल्लीत अशा तरुणांनी काही दिवसांपूर्वी निदर्शनही केली.

फोटो स्रोत, Getty Images
कोव्हिडच्या साथीमुळे लष्करभरती थांबल्याचं अधिकारी सांगतात, पण काही तज्ज्ञांच्या मते सरकार मुळातच सैनिकांची संख्या कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामागेही काही कारणं आहेत.
अवाढव्य खर्च
मूळात एवढ्या मोठ्या लष्कराचा खर्चही मोठा आहे. लष्करावरील खर्चाच्या बाबतीत भारतीय लष्कर अमेरिका आणि चीननंतर दुसऱ्या स्थानावर आहे. मोदी सरकारनं देशांतर्गत शस्त्रास्त्रनिर्मितीवर भर दिला असला, तरी आजही भारत हा शस्त्रास्रांच्या बाबती जगातला दुसरा सर्वांत मोठा आयातदार आहे.
पगार आणि पेन्शनचा वाढता बोजा
भारतातलं डिफेन्स बजेट, म्हणजे सैन्यदलांचा एकूण खर्च आहे साधारण 70 अब्ज अमेरिकन डॉलर्सएवढं. म्हणजे तब्बल 5312 अब्ज रुपये. यातला साठ टक्के हा सैनिकांचे पगार आणि निवृत्तीवेतनावर खर्च होतो. त्यामुळे लष्कराचं आधुनिकीकरण आणि नव्या शस्त्रास्रांसाठी कमी पैसा उरतो.
याउलट "चीनमध्ये डिफेन्स बजेटपैकी बजेट एक तृतियांशपेक्षाही कमी पैसा प्रत्यक्ष सैनिकांवर खर्च होतो", याकडे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातले सुरक्षाविषयक अभ्यासाचे प्राध्यापक लक्ष्मण कुमार बेहरा लक्ष वेधतात. त्यांच्यामते, "चीनला थोपवायचं असेल, तर भारताला लष्करचं तंत्रज्ञानावर आधारीत आधुनिकीकरण करायला हवं, त्यासाठी सैनिकांची संख्या कमी करण्याची गरज पडू शकते."
आधुनिकीकरणाची संधी
सध्या भारतीय लष्करात एक लाख जागा कमी आहेत. पण ही सुधारणांची संधी आहे, असं निवृत्त अधिकारी लेफ्टनंट जनरल एच एस पनांग सांगतात. त्यांच्या मते "21व्या शतकात अशा चपळ सैनिकांची गरज आहे, ज्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाची साथ मिळेल. भारताकडे अवाढव्य सैन्य आहे, जिथे दर्जाची कमी संख्येनं भरून काढली जाते. पण एक विकसनशील देश असल्यानं भारताला संरक्षणावरचा खर्च भरमसाठ वाढवता येणार नाही."

फोटो स्रोत, Getty Images
स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही सुधारणांकडे कल आहे. याआधी त्यांनी भारतीय सैन्याला केवळ मानवी पराक्रम नाही तर तंत्रज्ञानाची गरज असल्याचं बोलून दाखवलं होतं. "भारताला वेगानं युद्ध जिंकण्याची तयारी ठेवायला हवी, कारण कधी युद्ध लांबलं, तर ते परवडणार नाही."
सैनिकांची संख्या कमी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे का?
गेल्या दोन वर्षांत भारत-चीन सीमेवर तणावाच्या परिस्थिती निर्माण झाल्या होता. पाकिस्तान आणि चीन अशा दोन सीमा सुरक्षित ठेवणं हे भारतासमोरचं आव्हान आहे. त्यात काश्मिरमध्येही जवळपास पाच लाख सैनिक तैनात आहेत. जाणकारांच्या मते अशात सैन्यभरती थांबवणं, हे धोक्याचं ठरू शकतं असं
सैन्यावरचा खर्च कमी करण्यासाठी आता सरकार पूर्णवेळ नियुक्तीऐवजी टूर ऑफ ड्युटी म्हणजे अल्पकाळासाठी, तीन वर्षांसाठी सैन्यातील सेवेच्या पर्यायाचा विचार करत असल्याचीही चर्चा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
प्रशिक्षित सैन्यापेक्षा असे तात्पुरते सैनिक लष्कराची ताकद कमी करू शकतात, असं काही तज्ज्ञांचं मत आहे. दिल्लीच्या सेंटर फॉर पॉलिसी रीसर्चचे सीनियर फेलो सुशांत सिंग यांना वेगळीच चिंता वाटते. "वयाच्या विशीतच तरुणांना सैन्य सोडावं लागेल, अशा देशात जिथे आधीच बेरोजगारी ही मोठी समस्या आहे. शस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण घेतलेले एवढे सगळे लोक नोकरी शोधत असतील तर काय होईल?"
याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत खाली जरूर नोंदवा. याविषयीचं सविस्तर वृत्त पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























