संजय राऊतांसारखं छगन भुजबळांनीही शक्ती प्रदर्शन केलं होतं तेव्हा...

फोटो स्रोत, @ChhaganCBhujbal
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
9 फेब्रुवारी 2016चा तो दिवसच उजाडला होता छगन भुजबळांच्या बातमीने. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरण गाजत होतं.
छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांना ईडीने अटक केली होती. त्यावेळी छगन भुजबळ अमेरिकेत होते. 9 फेब्रुवारीला भुजबळ अमेरिकेहून मुंबईत परतणार होते.
"ईडीच्या कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेस कुठेही आंदोलन करणार नाही. पक्षाचं कोणीही असलं तरी कायदेशीर प्रक्रियेला सहकार्य करेल," असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं होतं.
पण तरीही छगन भुजबळांनी ओबीसीचा मुद्दा पुढे करत मुंबई विमानतळावर मोठं शक्तीप्रदर्शन केलं.
नाशिक आणि राज्यातल्या इतर भागातून समता परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मुंबईत पोहोचले होते. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हजारो कार्यकर्ते जमले होते.
भुजबळांचं विमान उतरलं. ते बाहेर येईपर्यंत तत्कालीन भाजप सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुरू होती. छगन भुजबळ विमानतळाच्या बाहेर आले.
तेव्हा कार्यकर्त्यांनी आणि काही स्थानिक नेत्यांनी त्यांना उचलून घेतलं. त्यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले होते,
"ही कारवाई सूडबुद्धीने सुरू आहे. आम्ही कोणालाही न घाबरता, कायदेशीर कारवाईला सामोरं जाणार आहोत. कार्यकर्त्यांनी शांतता राखावी."
छगन भुजबळ यांनी हे आवर्जून सांगितले होते की, हे शक्ती प्रदर्शन नाही. ही कार्यकर्त्यांची- ओबीसी समाजाची आक्रमकता आहे. आपण काहीही चुकीचं केलेलं नाही.
...आणि भुजबळांना अटक झाली
हे सर्व कव्हर करत असताना पत्रकारांमध्ये सुरू असलेल्या चर्चेतही भुजबळांना अटक होऊ शकत नाही असा सूर होता.
तेव्हा एका वरिष्ठ पत्रकाराने म्हटलं होतं, "इतक्या मोठ्या नेत्याला जेलमध्ये टाकणं काही सोपं नाही. ओबीसी नेते आहेत ते... सगळे कार्यकर्ते रस्त्यावर येतील आणि सरकारला कार्यकर्त्यांना नियंत्रणात ठेवणं कठीण होऊन बसेल. निवडणुकीत फटका बसेल तो वेगळा..."

फोटो स्रोत, @ChhaganCBhujbal
त्यानंतर महिन्याभरात 14 मार्च 2016 साली छगन भुजबळांना ईडीने अटक केली. तेव्हा घोषणा देणारे कार्यकर्ते शांत झाले होते. जवळपास सव्वा दोन वर्षं छगन भुजबळ हे जेलमध्ये होते.
ते जेलमधून बाहेर आल्यानंतर त्यांची अवस्था कशी होती हे वेगळं सांगायला नको.
संजय राऊतांचं जंगी स्वागत
तब्बल सहा वर्षांनंतर 7 एप्रिल 2022 चा दिवसही सारखा वाटत होता. संध्याकाळी चारच्या सुमारास शिवसेना नेते संजय राऊत हे दिल्लीहून मुंबईत परतणार होते. बुधवारी (6 एप्रिलला) संजय राऊत यांची काही संपत्ती ईडीने जप्त केली.
त्यानंतर गुरुवारी ते एअरपोर्टपासून भांडुपच्या घरापर्यंत 'रॅली' काढणार असल्याचं सांगितलं गेलं. दुपारी तीनच्या सुमारास मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर पोहोचल्यानंतर शिवसैनिकांची गर्दी दिसू लागली.
शेकडो शिवसैनिक बसेस, गाड्या भरून आले होते. झेंडूच्या फुलांनी सजवलेली एक गाडीही होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याविरुद्ध घोषणाबाजी सुरू होती.
कोणी कोल्ड्रिंक पित होतं, कोणी नाश्ता करत होतं. कोणी माध्यमांच्या कॅमेर्यासमोर भगवे झेंडे फडकवत होतं. पार्कींगमधून कार्यकर्त्यांना एअरपोर्टच्या (arrivals) गेटजवळ बोलवलं. कार्यकर्त्यांची गर्दी वाढली होती.

फोटो स्रोत, BBC/Shardulkadam
संजय राऊतांचं विमान उतरलं होतं. कुठल्याही क्षणी ते बाहेर येणार होते. काही महिला हातात फुलांच्या पाकळ्या घेऊन तयार होत्या. आमदार सुनील राऊत, सुनील प्रभू, संजय दिना पाटील, शिवसेनेचे नगरसेवक पांडुरंग सकपाळ असे काही नेते उपस्थित होते. सुरक्षा आणि स्वागताच्या व्यवस्थेकडे सुनील राऊत जातीने लक्ष देत होते.
कार्यकर्ते घोषणांसाठी राऊतांची आतुरतेने वाट पाहत होते. माध्यम प्रतिनिधींनी वेगवेगळ्या ठिकाणी 'व्हिज्युअल्ससाठी' जागा पकडून ठेवली होती. तुतारीचा आवाज आला. दुपारी 4.45 च्या सुमारास संजय राऊत बाहेर आले.
आम्हाला जेलमध्ये टाकायचं आहे तर टाका पण...
त्यांच्या स्वागतासाठी आणलेला भला मोठा गुलाबाच्या फुलांचा हार त्यांना घालण्यात आला. कार्यकर्त्यांची संख्या हजारोंच्या घरात गेली होती. सुरक्षा रक्षक आणि पोलीसांना कार्यकर्त्यांना नियंत्रणात ठेवायला कठीण जात होतं. माध्यम प्रतिनिधींचे कॅमेरे बाईट मिळवण्यासाठी संजय राऊतांचा पाठलाग करत होते.
शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत होत्या. कार्यकर्त्यांची ओढाताण, ढकलाढकलीमध्ये संजय राऊत पुन्हा विमानतळाच्या आत गेले. मग विमानतळाच्या खालच्या मजल्यावर म्हणजे P4 ला येऊन त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
हे शक्तीप्रदर्शन कशासाठी? या प्रश्नावर राऊत उत्तर देऊ लागले.
"हे शक्तीप्रदर्शन नाही तर कार्यकर्त्यांची आक्रमकता आहे. जर अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही. ही आमची शिवसेना आहे. तुम्हाला आम्हाला जेलमध्ये टाकायचं आहे? टाका जेलमध्ये... आम्ही जेलमध्ये जायला तयार आहोत. पण एक लक्षात ठेवा हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. पुढची 25 वर्षं तुम्ही सत्तेत येणार नाही."

फोटो स्रोत, @sanjayraut.official
संजय राऊत यांच्या बोलण्यात आक्रमकता होती. पण तरीही त्यांच्या चेहर्यावरची चिंता लपत नव्हती.
इतकं बोलून संजय राऊत गाडीत बसून निघाले. झेंडूच्या फुलांनी सजवलेली गाडी त्यांच्या गाडीमागून जाऊ लागली. मुख्यमंत्र्यांना भेटायला ते वर्षावर जायला निघाले.
एअरपोर्टच्या बाहेर हे सगळं पाहत असलेल्या लोकांमधल्या एका बाईंनी विचारलं, 'ये सब स्वागत किस लिये है? इलेक्शन जित के आये क्या?' मी हसून नकारार्थी मान डोलावून पुढे निघालो. पण कायद्याची लढाई राजकीय ताकदीने लढता येते का? हा प्रश्न कायम राहीला.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























