You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विद्यार्थ्यांनी भरलेली शाळेची बस 5 तास बेपत्ता, विश्वास नांगरे पाटलांनी सांगितले कारण #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. अपहरण किंवा अपघात नाही, ड्रायव्हरला रस्ता माहिती नसल्याने बस भरकटली- नांगरे पाटील
सांताक्रूझमधील पोदार स्कूलची विद्यार्थ्यांची पाच तास भरकटलेली बस सुरक्षित असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. या बसचा ड्रायव्हर नवीन असल्याने त्याला रस्ता माहिती नव्हता, त्यामुळे ही बस पोहोचायला उशीर लागल्याचं मुंबई पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगितलं.
मुंबईतील सांताक्रूझमध्ये पोद्दार स्कूलची विद्यार्थ्यांना ने-आण करणारी स्कूलबस दुपारी 12 वाजता शाळा सुटल्यानंतर, विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी ही बस निघाली. मात्र बस शाळेतून बाहेर जरी पडली असली तरी ती बस घरापर्यंत वेळेत पोहोचलीच नव्हती. तब्बल तीन तास वेळ झाल्यानंतर पालकांना त्यांच्या पाल्यांची चिंता वाटू लागली होती. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.
पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, "आज या शाळेचा पहिला दिवस होता, आणि त्या बसचा ड्रायव्हरही नवीन होता. त्या ड्रायव्हरने या मार्गाची रेकी केली नव्हती. त्यामुळे ही बस दोन तास उशिरा पोहोचली. मुलांना उशीर झाल्याने पालक चिंतेत होते आणि ते शाळेत पोहोचले. ही बस सुरक्षित आहे, सर्व विद्यार्थी सुरक्षित आहेत. ती बस उशीरा पोहोचली म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टवर शाळा कारवाई करेल. पण यामध्ये कोणत्याही प्रकारचा अपप्रचार करु नये."
"आता त्या शाळेच्या ड्रायव्हरला रस्ते माहिती नसल्याने दोन दिवस त्यांना त्याची माहिती देणार आहेत, या दोन दिवसात शाळेच्या बस बंद करण्यात येतील. ही घटना फक्त आणि फक्त ड्रायव्हरला रस्ते माहिती नसल्याने घडली आहे.
कुठल्याही प्रकारचे अपहरण किंवा अपघात झाल्याची घटना झाली नाही", असंही पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील म्हणाले.
2. छगन भुजबळ हेच शाहू महाराजांचे खरे वारसदार-संभाजी महाराज
छगन भुजबळ हेच शाहू महाराज यांच्या विचाराचे खरे वारसदार आहेत, असे गौरवोद्गार खासदार छत्रपती संभाजी छत्रपती यांनी काढले. भुजबळ ज्येष्ठे नेते असून ओबीसींचं नेतृत्व करत आहेत. 'टीव्ही9मराठी'ने ही बातमी दिली आहे.
"भुजबळ हे शाहू, फुले आणि आंबेडकरांचा विचार घेऊन समतेचा लढा लढत आहे. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांची लढाई सुरू आहे. मी नुसता वंशज छत्रपती घराण्याचा वशंज आहे. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या विचारावर माझी वाटचालही सुरू आहे. पण छगन भुजबळ हेच शाहू महाराज यांच्या विचाराचे खरे वारसदार आहेत", असं संभाजी छत्रपती म्हणाले.
खासदार संभाजी छत्रपती हे आज नाशिकमध्ये होते. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या घरी जावून त्यांची भेट घेतली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला.
3. गुढीपाडव्याच्या राज ठाकरे यांच्या भाषणानंतर मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा
राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याला झालेल्या भाषणानंतर पुण्यात मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशीदवरती भोंगे लावले तर समोर हनुमान चालीस लावा असे सांगितल्यानंतर अनेक ठिकाणी मनसेने हनुमान चालीसा लावला. पुण्यातील माजिद अमीन शेख वॉर्ड क्रमांक 84 शाखा अध्यक्ष असून त्यांनी राजीनामा दिला आहे. 'नवभारत टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
मागील काही दिवसापासून बेरोजगारी, महागाई, शिक्षण यासारखे विषय असताना हे मुद्दे सोडून जात धर्म या विषयावर भर दिला जात आहे. मी कोणाच्याही दबावाखाली न येता स्वच्छेने राजीनामा देत असल्याची माहिती माजीद अमीन शेख यांनी आपल्या पत्रात दिली आहे. माजिद शेख यांच्यानंतरर अनेक मनसे मुस्लिम कार्यकर्ते राजनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे
मुंबईतील मशिदी आणि मदरशांमध्ये देशविरोधी कृत्ये सुरू आहेत. घातपाती कारवायांची भयानक कटकारस्थाने कशी सुरू आहेत, याची माहिती तुम्हाला पोलिस देतील. आपल्याला घातपाती कारवायांसाठी पाकिस्तानची गरजच नाही. या मशिदी आणि मदरशांमध्येच घातपाती कारवाया करणारे दडले आहेत. याविषयी माहिती मिळाली तर तुम्हाला धडकी भरेल, असे राज ठाकरे म्हणाले.
4. राणा आयुब यांना परदेशी जायला परवानगी
पत्रकार राणा अय्युब यांना दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी परदेशी जाण्यास परवानगी दिली. अय्युब यांना विदेशी जाण्यास मनाई करून, त्यांच्याविरुद्ध 'लूक आऊट नोटीस' बजावल्याबद्दल अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) विचारणा केली आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
ही परवानगी देताना न्यायमूर्ती चंद्रधारी सिंग यांनी सांगितलं की, ही परवानगी सशर्त असून, सविस्तर आदेश नंतर देण्यात येईल. न्यायालयाने अयुब यांनी जातमुचलक्याची ठराविक रक्कम भरण्यास सांगितले असून, परदेशात कुठे चाललो असून, कुठे राहणार आहे व तेथील दूरध्वनी क्रमांकांची माहिती तपास संस्थांना देण्यासही सांगितले.
अयुब यांनी त्यांच्याविरुद्ध बजावलेली 'लूकआऊट नोटीस' रद्द करण्यासाठी दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांना परदेशी जाण्याची परवानगी दिली. या याचिकेला अंमलबजावणी संचालनालयाने विरोध करताना सांगितले, की राणा अय्युब यांच्यावर एक कोटीचा अफरातफरीचा गंभीर आरोप असून, त्या परदेशात गेल्यानंतर भारतात परतण्याची शक्यता नाही.
5. पुण्यात जवळपास शंभर तलवारी जप्त
पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिघी परिसरातील कुरिअर फर्मच्या कार्यालयातून तलवारी जप्त केल्या आहेत. 3.7 लाख रुपये किंमतीच्या 92 तलवारी, 2 कुकरी आणि 9 खंजीर जप्त केले आहेत. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सर्व शस्त्रसाठा औरंगाबादला पोहोचवण्यात येणार होता, मात्र पोलिसांनी सापळा रचत याठिकाणी मोठी कारवाई केली आहे. 'दैनिक भास्कर'ने ही बातमी दिली आहे.
औरंगाबादमध्ये कुरियर कंपनीकडून मागवण्यात आलेला शस्त्रांचा मोठा साठा जप्त गेल्या आठवड्यात जप्त करण्यात आला होता. त्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. बनावट नाव आणि पत्ता नोंदवून ऑनलाइन तलवारी खरेदी मागविणाऱ्यासह तिघांना क्रांती चौक पोलिसांनी रविवारी अटक करून आणखी 3 तलवारी जप्त केल्या आहेत.
धक्कादायक म्हणजे पोलिस चौकशीत या आरोपीने यापूर्वीही तलवारी खरेदी केल्याचे मान्य केले आहे. यातील एक तलवार त्याच्या घरात तर दोन तलवारी दोन जणांना विक्री केल्याचे सांगितले होते. यापूर्वी देखील दोन वेळा मोठ्या प्रमाणावर कुरियर कंपनी कडून आलेला शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. औरंगाबादेतच एवढ्या मोठ्या तलवारी का येतात हे तपासणे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. गेल्या आठवड्यात क्राईमब्रँच कडून तलवार मागवणारे 2 जण ताब्यात घेतले होते.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)