टीना डाबी अडकणार विवाहबंधनात, महाराष्ट्रातून आलेल्या शुभेच्छांसाठी मानले खास आभार

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आयएएस अधिकारी आणि 2015 सालच्या युपीएससी टॉपर टीना डाबी पुन्हा एकदा विवाहबद्ध होत आहेत. इन्स्टाग्रामवरून त्यांनी ही घोषणा केली.

राजस्थानमधील आयएएस अधिकारी डॉ. प्रदीप गावंडे यांच्याशी टीना विवाह करत आहेत. डॉ. गावंडे महाराष्ट्राचे असून तेही डाबी यांच्याबरोबर राजस्थानात सनदी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

डॉ. प्रदीप गावंडे यांचा जन्म 9 डिसेंबर 1980 ला झाला असून ते सध्या राजस्थान सरकार मध्ये पुरातत्त्व विभागाचे संचालक आहेत. ते 2013 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. नागरी सेवेत येण्यापूर्वी त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं आहे.

टीना डाबी यांनी सर्वांचे हितचिंतकांचे आभार मानले आहेत. डॉ. गावंडे यांच्यासोबत त्यांनी फोटो टाकताना हे देखील म्हटले आहे की, 'सर्वांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्यामुळे मी भारावले आहे, खासकरून महाराष्ट्रातून आलेल्या शुभेच्छांमुळे.'

टीना यांनी ट्रोलर्सलाही सडेतोड उत्तर दिले आहे. तुमच्या ट्रोलिंगमुळे आमच्या आयुष्यात काही फरक पडेल असं तुम्हाला कसं वाटू शकतं हे देखील त्या म्हणाल्या आहेत.

टीना डाबी कोण आहेत?

टीना डाबी 2016 च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. सध्या त्या राजस्थानात कार्यरत आहेत. त्यांची निवड झाल्यावरही त्यांना या मुद्द्यावरून ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं.

नागरी सेवा म्हणजेच सिविल सर्व्हिसेसच्या परीक्षेत त्या भारतात पहिल्या आल्या होत्या. त्याच वर्षीच्या परीक्षेत दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या अतहर आमीर यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या. या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली.

पहिला क्रमांक आणि दुसरा क्रमांक मिळवलेल्या अधिकाऱ्यांचं लग्न ही तेव्हा दुर्मिळ घटना होती. त्यात तो आंतरधर्मीय विवाह होता. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एका सत्कार सोहळ्यात त्यांची भेट झाली होती. मग या भेटी वाढल्या. दोघांनाही राजस्थान केडर मिळालं होतं. त्यांच्या विवाहाला अनेक केंद्रीय मंत्र्यांनीही उपस्थिती नोंदवली होती.

हे नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाची चर्चा झाली तशीच घटस्फोटाचीही चर्चा तितक्याच तीव्रतेने झाली. आता त्या पुन्हा विवाहबद्ध होत आहेत. टिना डाबी यांची बहीणसुद्धा गेल्या वर्षी सिव्हिल सेवा परीक्षा उत्तीर्ण झाली होती.

टिना डाबी आणि गावंडे यांच्यात तब्बल 13 वर्षांचं अंतर आहे. त्यावरून नेटकऱ्यांनी पुन्हा एकदा टिना डाबी यांना ट्रोल केलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)