CNG होणार 7-8 रुपयांनी स्वस्त, रिक्षा-टॅक्सी चालकांना दिलासा #मोठ्याबातम्या

सीएनजी

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या पाच बातम्या

1. CNG 7-8 रुपयांनी स्वस्त होणार, रिक्षा-टॅक्सी चालकांना दिलासा

अर्थसंकल्पातील घोषणेनुसार 'सीएनजी'वरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) दहा टक्के कपात करण्याची अधिसूचना शनिवारी जारी करण्यात आली होती. त्याप्रमाणे 1 एप्रिलपासून हा वायू राज्यात प्रती किलो 7 ते 8 रुपयांनी स्वस्त होईल, ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

सध्या 'सीएनजी'वर 13.5 टक्के मूल्यवर्धित कर (व्हॅट) आकारण्यात येतो. त्यात 10 टक्के कपात करून तो तीन टक्के करण्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली होती. त्यानुसार वित्त विभागाने करात कपात करण्याची अधिसूचना जारी केली असून ती राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली.

नैसर्गिक वायूवर तीन टक्के मूल्यवर्धित कर आकारला जाईल, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. हा बदल येत्या शुक्रवारपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून अमलात येईल. या निर्णयामुळे सीएनजी स्वस्त होणार आहे. त्याचा फायदा रिक्षा, टॅक्सी, प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकांना तसेच त्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

2. 'कश्मीर फाइल्स सर्वांनी पाहावा म्हणजे कळेल काँग्रेसच्या काळात काय झाले' - शाह

काँग्रेसच्या काळात काश्मीर खोऱ्यातील लोकांवर काय अत्याचार झाले हे समजण्यासाठी कश्मीर फाइल्स पाहा, असे वक्तव्य गृहमंत्री अमित शाह यांनी केले आहे.

@taran_adarsh

फोटो स्रोत, @taran_adarsh

ज्या लोकांनी आतापर्यंत काश्मीर फाइल्स पाहिला नाही त्यांनी हा चित्रपट जरूर पाहावा, म्हणजे त्यांना कळेल की काश्मीर कशा प्रकारे छळ आणि दहशतीच्या गर्तेत अडकला होता. पण जेव्हा नरेंद्रभाई दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले त्यांनी 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 हटवले. ते अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. ही बातमी एनडीटीव्हीने दिली आहे.

3. रिसॉर्ट तोडण्यासाठी हातोडा घेऊन निघालेल्या सोमय्यांना अनिल परबांचं खुलं आव्हान

"किरीट सोमय्या माझी प्रतिमा खराब करण्याचे काम करत आहेत म्हणून मी पुढच्या आठवड्यात कोर्टात जाणार आहे. रिसॉर्ट तोडायला किरीट सोमय्या कर्मचारी आहेत काय? हिंमत असेल तर तोडून दाखवा," अशा शब्दांत, दापोलीतील रिसॉर्ट तोडण्यासाठी निघालेल्या किरीट सोमय्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी थेट आव्हान दिलं आहे. ही बातमी लोकमत न्यूज 18 ने दिली आहे.

अनिल परब

फोटो स्रोत, Adv. Anil Parab/facebook

फोटो कॅप्शन, अनिल परब

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टबाबत किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती. त्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी थेट रिसॉर्ट तोडण्याचं म्हणत थेट दापोलीच्या दिशेने निघाले. प्रतिकात्मक हातोडा घेऊन सोमय्या निघाले होते. त्यांच्यासोबत शेकडोच्या संख्येत भाजपचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते. यावेळी राज्याचे परिवहन मंत्रीअनिल परब यांनी सोमय्यांना खुलं आव्हान दिलं.

परब म्हणाले, "हा रिसॉर्ट माझा नाहीये. ज्या चौकशा करायच्या होत्या त्या झालेल्या आहेत. मी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. किरीट सोमयया पालिकेचे नोकर आहेत का...? किरीट सोमय्या वातावरण खराब करत आहेत. जे रोजगार करणारे आहेत ते भयभीत झालेले आहेत. त्यांनी पोलिसांना तक्रार केली आहे. मी पुन्हा आता हायकोर्टात जाणार आहे कारण माझी प्रतिमा खराब करण्याचे काम सुरू आहे."

4. प्रकाश आंबेडकरांनी निवडणुकीत 1 हजार कोटी घेतले - शिवसेना आमदार संतोष बांगर यांचा आरोप

वेगवेगळ्या कारणांनी राज्याचं राजकारण तापलं असताना आता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांवर गंभीर आरोप केलेत, ही बातमी मुंबई तकने दिली आहे.

प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रकाश आंबेडकर

आंबेडकरांनी निवडणुकीत 1 हजार कोटी रुपये घेतल्याचं म्हटलं आहे. हिंगोलीत शिवसंपर्क अभियानादरम्यान, जवळा बाजार येथील आयोजित मेळाव्यात आमदार संतोष बांगर बोलत होते. यावेळी ते म्हणाले,"एमआयएम ही भाजपची बी टीम असून भाजपने त्यांना मत विभाजित करण्यासाठी पुढे केलं आहे. गेल्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचितचाही याचसाठी वापर करण्यात आला.

"आंबेडकरांचे हात मजबूत करण्यासाठी, बौद्ध समाजाची मतं मिळवण्यासाठी हा प्रकार घडला. आंबेडकर यांना मागच्यावेळी 1 हजार कोटी रुपये देण्यात आले. प्रचारासाठी मागच्या निवडणुकीत आंबेडकरांनी हेलिकॉप्टरने प्रवास करत सभा घेतल्या. हे हेलिकॉप्टर कुठल्या पैश्यातून आले, हे त्यांनी लोकांना सांगावं".

दरम्यान संतोष बांगर यांच्या वक्तव्याचे पडसाद लगेचच उमटायला सुरुवात झाली आहे. अकोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संतोष बांगर यांचा पुतळा जाळत त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. दुसरीकडे परभणीतही वंचितच्या कार्यकर्त्यांनी बांगर यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला.

5. हिजाबचा वाद शमतो न शमतो तोच आता मदरशांवरून पेटला वाद

कर्नाटकातील हिजाबचा वाद पूर्णपणे थांबलेला नसतानाच आता मदरशांवरून नवा वाद सुरू झालाय. कर्नाटकचे भाजप आमदार एमपी रेणुकाचार्य यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि शिक्षणमंत्र्यांना राज्यातील मदरसे बंद करण्याची विनंती केली आहे. मदरशांमध्ये देशविरोधी धडे दिले जातात, असा दावा त्यांनी केला आहे, सकाळने ही बातमी दिली आहे.

हिजाब

फोटो स्रोत, Getty Images

रेणुकाचार्य म्हणतात, "राज्यात मदरशांची काय गरज आहे? एकतर मदरशांवर बंदी घातली पाहिजे किंवा राज्यातील इतर शाळांमध्ये जे शिकवले जाते ते तिथे शिकवावे. अशा शाळा नाहीत का जिथे सर्व धर्माचे विद्यार्थी शिकतात."

हिजाबच्या वादावरून काही देशविरोधी संघटनांनी राज्यात बंदची हाक दिली आहे. हा इस्लामिक देश आहे का? हे आम्ही सहन करणार नाही. देशविरोधी संघटनांच्या कर्नाटक बंदचा काँग्रेस नेत्यांनी सभागृहात बचाव केला, असेही रेणुकाचार्य म्हणाले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)