You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरेंनी नाव न घेता नरेंद्र मोदींना मारले 'हे' 3 टोमणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (25 मार्च) विधानसभेत भावनिक शब्दांत भाषण केले. गेले काही दिवस विरोधक राज्य सरकारवर आऱोप करत आहेत. त्यांना उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्या शैलीत उत्तर दिले. अनेकदा त्यांनी कविता, विनोद आणि टोमण्यांचा आधार घेतला.
त्यांनी विरोधी पक्षातील देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगुंटीवार यांच्यावर वारंवार टोमणे मारलेच पण आज या टोमण्यांच्या अस्त्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदीही वाचले नाहीत.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान, भाजपा, केंद्र सरकार यांच्यावरही टीका केली. अर्थात कोरोनात माननीय पंतप्रधानांनी सर्व राज्यांना चांगली मदत केली, असंही ते म्हणाले.
पहिला टोमणा - ज्यांना बाळासाहेबांनी वाचवलं...
उद्धव ठाकरे यांच्यावर सतत तुम्ही बाळासाहेबांना काय उत्तर देणार अशी टीका होते. त्याचा उल्लेख करुन ते म्हणाले, "बाबरी मशिदीच्यावेळेस बाळासाहेबांनी तुमच्यापैकी ज्यांना वाचवलं ते तरी त्यांना काय उत्तर देणार आहेत? ज्यावेळेला त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं तेव्हा बाळासाहेब त्यांच्यासोबत राहिले."
"रावणाची तोंड उडवली तरी पिक्चरमध्ये दिसत तसं नवीन तोंड येतं. मग नंतर कळतं रावणाचा जीव बेंबीत आहे. काहींना केंद्रात सरकार मिळालं तरी बेंबीत नाही तर मुंबईमध्ये असतो," असंही ते म्हणाले.
दुसरा टोमणा - हिंमत असेल तर...
नवाब मलिकांवर दाऊदवर कथित संबंधामुळे जे आरोप होत आहेत त्यावरही उद्धव ठाकरे यांनी टीका केली की, "केंद्रीय संस्था इतक्या पोकळ झाल्या का? नवाब मलिक मंत्री झाले, दाऊदचे हस्तक, सर्वत्र फिरतायत. ते आधी कसं दिसलं नाही? केंद्राच्या यंत्रणा काय फक्त टाळ्या वाजवा, दिवे लावा एवढंच करतंय? त्यांना या दिव्यात हे कसं दिसलं नाही?"
ते पुढे म्हणाले, "आधी रामाच्या नावाने मतं मागितली आता दाऊदच्या नावाने मतं मागणार का? गोपिनाथ मुंडे म्हणालेले, दाऊदला फरपटत आणू आता आपण त्याच्यामागे फरपटत जातोय. ओबामांनी कधी ओसामा बिन लादेनच्या नावाने मतं मागितली नाहीत. ओबामांनी पर्वा न करता पाकिस्तानात घुसून ओसामाला मारलं. याला म्हणतात हिंमत. तुम्हीही तसं घुसून दाऊदला मारुन दाखवा."
तिसरा टोमणा - माझे फोटो मोदींसोबतही आहेत...
"काश्मीरमध्ये तुम्ही मेहबुबा मुफ्तींसोबत तुम्ही होता. पण अफजल गुरुला फाशी देऊ नये असं मुफ्ती यांचं म्हणणं होतं. त्यांची मतं कशी होती हे तुम्हाला माहिती होती पण तरीही तुम्ही त्यांच्यासोबत सत्तेत होता. बुरहाण वाणीलाही मारल्यावर त्या त्याच्या घरी गेल्या होत्या. त्यांचे विचार काय बदलले होते का?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
तसंच, "मुदस्सर लांबीने देवेंद्र फडणवीसांना हार घातल्याची उद्धव ठाकरे यांनी आठवण केली. असे फोटो अनेक जणांसोबत असतात. माझे फोटो देवेंद्र फडणवीस, अमित शाह, नरेंद्र मोदी यांच्याबरोबरही आहेत," असा उल्लेखही त्यांनी केला.
'मी तुमच्यासोबत येतो, मला तुरुंगात
"उगीचच आमच्या कुटुंबाची बदनामी करू नका. तुम्हाला सत्ता पाहिजे असल्यास सांगा, मी तुमच्यासोबत येतो, मला तुरुंगात टाका," अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष भाजपवर टीका केली आहे.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष भाजपच्या कार्यपद्धतीवर जोरदार टोले लगावल्याचं दिसून आलं.
यावेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाबाबतही उल्लेख केला. ते म्हणाले, "प्रथा परंपरा आपण पाळल्या पाहिजेत. राज्याची एक वेगळी संस्कृती आहे. राज्यपालांच्या भाषणाच्या सुरुवातीला गोंधळ झाला, तो व्हायला नको होतो. राज्यपालपद हे संवैधानिक, हे विरोधी पक्षालाही चांगलंच माहिती आहे. राज्यपालांच्या भाषणाच्या सुरुवातीला गोंधळ झाला, तो व्हायला नको होता. राज्यपाल राष्ट्रगीतालाही थांबू शकले नाहीत. देशात असा अपमान कोणी केला नव्हता. राज्यपालांचं अभिभाषण ऐकलं असतं तर त्यांचं म्हणणं आपल्याला कळलं असतं.
ते पुढे म्हणाले, "कोरोना काळात राज्याची यंत्रणा जेव्हा सतर्क होती त्याचा मला अभिमान आहे. फक्त पर्यावरण पर्यावरण म्हणून तुम्ही टीका करत आहात. पण स्कॉटलॅंडचा पुरस्कार देशात फक्त महाराष्ट्राला मिळाला. त्याचाही अभिमान आहे. काही लोक आरशात बघितलं तरी भ्रष्टाचार झाला भ्रष्टाचार झाला म्हणायचं. कशात झाला भ्रष्टाचार? तर आरशाच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये झाला भ्रष्टाचार. पण तो झाला हे बघण्यासाठी तोंड तरी आरशात बघावं लागेल."
"शासन बेवड्यांचं आहे, असा आरोप झाला. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राला मद्यराष्ट्र तुम्ही म्हटलं. पण आपल्या इथे वाईन सरसकट किराणा दुकानात मिळत नाही. ज्यांच्याकडे तशी कपाटे आहे, तिथंच वाईन मिळते. शेजारच्या मध्य प्रदेशात जे काही सुरू आहे, ते पाहून त्याला मद्यप्रदेश तुम्ही म्हणणार का? देशात एक लाख लोकसंख्येच्या तुलनेत मद्यविक्रीची दुकाने सर्वात कमी महाराष्ट्रात आहेत," असं ठाकरे म्हणाले.
द्वेषाची काविळ कशी बरी होणार?
"म्युनिसिपालिटीची शाळा म्हणून हिणवलं जातं. पण मुंबई ही आठ भाषांमध्ये शिक्षण देणारी जगातली एकमेव महापालिका आहे. कोरोना बरा होतो, पण द्वेषाची कावीळ बरी कशी होणार? कोरोनात महापालिकेने चांगलं काम केलं. कोरोनात माननीय पंतप्रधानांनी सर्व राज्यांना चांगली मदत केली," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
"आपल्यासमोर कोणी मरत असेल तर टेंडर काढत बसणार का? पालिकेने शॅार्ट नोटीस काढून डेंटर काढली. सर्वात कमी बजेट असलेल्यांना काम दिलं. धारावी वाचवली याचं कौतुक कोणालाच नाही? पालिकेवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. पण भ्रष्टाचार कुठे झाला? महापालिकेने इतकं उत्तम काम केलं. एपिडेमिक अॅक्टमध्ये अशा पद्धतीने टीका करता येत नाही. तरीही कोव्हीड काळात भ्रष्टाचार केला म्हणतात याचं दुख: आहे," असंही ते म्हणाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)