CUET परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, UGC ने 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या परीक्षेचं स्वरुप काय आहे?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
देशभरातील सर्व केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा म्हणजेच कॉमन युनीव्हर्सिटी एन्ट्रान्स टेस्ट (CUET) येत्या 15 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने CUET परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. कॉमन युनीव्हर्सिटी एन्ट्रान्स टेस्ट (CUET) या विशेष प्रवेश परीक्षेमार्फत यापुढे केंद्रीय विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया पार पडेल अशी घोषणा मार्च 2022 रोजी UGC ने केली होती.
ही परीक्षा दोन भागांमध्ये घेतली जाणार आहे. 15 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान ही परीक्षा होणार आहे.
पहिल्या फेजमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पत्र आज म्हणजेच 12 जुलै रोजी दिले जातील. तसंच दुसऱ्या फेजमध्ये परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना 31 जुलै रोजी प्रवेश पत्र मिळतील अशी माहिती विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
देशाची केंद्रीय प्रवेश परीक्षा घेणारी आस्थापना नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA) ही परीक्षा दरवर्षी घेणार आहे.
महत्त्वाचं म्हणजे पदवी प्रवेशासाठी पहिल्यांदाच अशाप्रकारे स्वतंत्र प्रवेश परीक्षेचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा कशी आणि कधी होणार? कोणते विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र असतील? बारावी बोर्डाच्या परीक्षांची यात काय भूमिका असेल? शिक्षणतज्ज्ञांचं याबाबत काय मत आहे? असे अनेक प्रश्न सध्या विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहेत. अशाच दहा महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.
1. UGC ने काय नेमका काय निर्णय घेतला आहे?
विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देशातील सर्व 45 केंद्रीय विद्यापीठांसाठी एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे केंद्रीय विद्यापीठात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीचे प्रवेश बारावीच्या गुणांच्या आधारे नव्हे तर कॉमन युनिव्हर्सिटी एन्ट्रान्स टेस्टच्या (CUET) गुणांच्या आधारे होणार आहेत.
वैद्यकीय आणि इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी ज्याप्रमाणे केंद्रीय स्तरावर स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली जाते त्याच प्रमाणे केंद्रीय विद्यापीठांमध्ये पदवी, पदव्युत्तर प्रवेशासाठी CUET ही प्रवेश परीक्षा होणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
2022-23 म्हणजेच या शैक्षणिक वर्षापासून ही परीक्षा होणार असून नॅशनल टेस्टिंग एजंसी (NTA) ही परीक्षा घेणार आहे. NTA मार्फत गुणवत्ता यादी (Merit List) जाहीर होईल आणि त्यानुसारच प्रवेश प्रक्रिया पार पडेल.
NCERT च्या बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित या प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम असणार आहे असंही युजीसीने स्पष्ट केलं आहे.
2. केंद्रीय विद्यापीठ म्हणजे काय आणि कोणते विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र असतील?
बारावीची परीक्षा पास झालेले सर्व विद्यार्थी या प्रवेश परीक्षेसाठी पात्र असतील. या परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना देशातील कोणत्याही केंद्रीय विद्यापीठात प्रवेश घेता येणार आहे.
देशात एकूण 45 केंद्रीय विद्यापीठ आहेत. यापैकी महाराष्ट्रात एक आहे.
दिल्ली विद्यापीठ (DU) , जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), जामिया-मिलिया इस्लामिया विद्यापीठ, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, उत्तर प्रदेशातील अलीगढ मुस्लीम युनीव्हर्सिटी, बनारस हिंदू विद्यापीठ ही काही नामांकित आणि प्रसिद्ध केंद्रीय विद्यापीठं आहेत ज्यामध्ये प्रवेशासाठी देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा असते.
केंद्रीय विद्यापीठ हे संसदेच्या कायद्यानुसार मान्यता मिळालेली विद्यापीठ असतात. तर राज्य विद्यापीठ हे राज्यातील विधिमंडळ कायद्यानुसार स्थापन होतात. केंद्रीय विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाची रचना ही इतर विद्यापीठांप्रमाणेच असते. पण तुलनेने केंद्रीय विद्यापीठांना अनुदान अधिक मिळतं असंही जाणकार सांगतात.
विद्यापीठांना गुणवत्तेनुसार नामांकन देणारी संस्था नॅक केंद्रीय विद्यापीठांचे सुद्धा नामांकन समान मूल्यांकन पद्धतीनुसारच करते.
3. UGC ने असा निर्णय का घेतला?
देशातील विविध शिक्षण मंडळांच्या विद्यार्थ्यांना या प्रवेश परीक्षेमुळे समान संधी उपलब्ध होईल असं विद्यापीठ अनुदान आयोगाचं म्हणणं आहे.
"बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी विविध शिक्षण मंडळं वेगवेगळी मूल्यांकन पद्धती वापरतात. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत एकसमानता असावी यासाठी ही प्रवेश परीक्षा घेतली जात आहे. विशेषत: उत्तर पूर्व आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी. CUET मुळे पालकांवरील आर्थिक बोजा कमी होईल असंही अपेक्षित आहे कारण विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आता केवळ एकच परीक्षा द्यवी लागेल." असं विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष एम जगदीश कुमार यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
राज्यातील विद्यापीठ, खासगी विद्यापीठ, अभिमत विद्यापीठ त्यांना आवश्यक वाटल्यास CUET या परीक्षेचे गुण ग्राह्य धरू शकतात असंही ते म्हणाले.
पदव्युत्तर प्रेवशासाठी अशी प्रवेश परीक्षा घेणारी अनेक विद्यापीठ आहेत. तर काही विद्यापीठ स्वतंत्र प्रवेश परीक्षा सुद्धा घेतात.
4. बारावी बोर्डाच्या परीक्षेचे गुण ग्राह्य धरणार का?
महत्त्वाचं म्हणजे या प्रवेश प्रक्रियेसाठी बारावीचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. केवळ परीक्षेची पात्रता म्हणून बारावी परीक्षेत पास होणं अनिवार्य आहे. त्यामुळे केंद्रीय विद्यापीठातील प्रवेश यापुढे फक्त आणि फक्त CUET या परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसारच होतील.
17 मार्चला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत CUET परीक्षेसाठी बारावीची परीक्षा पास करणं ही पात्रता असेल याबाबत चर्चा झाल्याचे समजते. 25 मार्च रोजी होणाऱ्या एक्झीक्यूटीव्ह काऊंसील समितीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.
5. CUET परीक्षेचं स्वरूप कसं असेल?
ही परीक्षा तीन विभागांमध्ये घेण्यात येईल. सेक्शन 1A, सेक्शन 1B(ऑप्शनल), जनरल टेस्ट आणि डोमेन स्पेसिफिक विषय परीक्षेची रचना असेल.
13 भाषांमध्ये विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील. यात इंग्रजी, हिंदी, मराठी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, ओडिया, पंजाबी, तमीळ, तेलगू आणि उर्दू या भाषांचा समावेश आहे.
सेक्शन 1A अंतर्गत भाषा विषयाची परीक्षा होईल.
सेक्शन 1B हा पर्यायी (ऑप्शनल) असणार आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना आणखी एक भाषा निवडण्याची मुभा आहे. यात फ्रेंच, अरेबिक, जर्मन अशा भाषांचाही समावेश आहे. सेक्शन 1A साठी निवडलेली भाषा सेक्शन 1B साठी निवडता येणार नाही.
दुसरा भाग म्हणजेन डोमेन स्पेसेफिक विषय- एक विद्यार्थी जास्तीत जास्त 6 डोमेन निवडू शकतात. यामध्ये विद्यार्थ्याला ज्या डोमेनमध्ये पदवीचं शिक्षण घ्यायचं आहे अशा विषयांचा समावेश असणार आहे.
आणि तिसऱ्या भागात विद्यार्थ्यांची जनरल टेस्ट होईल.

फोटो स्रोत, Getty Images
ही परीक्षा दोन दोन शिफ्ट्समध्ये होणार आहे. पहिल्या शिफ्टमध्ये विद्यार्थी एक भाषा विषय, दोन डोमेन स्पेसिफिक पेपर्स आणि जनरल टेस्ट देऊ शकतात. दुसऱ्या शिफ्टमध्ये उर्वरित 4 डोमेन स्पेसेफिक विषय आणि सेक्शन 1B (ऑप्शनल) अशी परीक्षा होईल.
CUET परीक्षेत मल्टिपल चॉईस प्रश्नपत्रिका असणार आहे. तसंच चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्कींग सिस्टम असेल.
6. ही परीक्षा कधी होईल?
एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून प्रवेश परीक्षेची प्रक्रिया सुरू होईल. विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे अर्ज उपलब्ध होतील.
जुलै महिन्याच्या साधारण पहिल्या आठवड्यात ही प्रवेश परीक्षा घेतली जाईल.
7. शैक्षणिक आरक्षणावर याचा परिणाम होणार का?
केंद्रीय विद्यापीठातील शैक्षणिक आरक्षणाला यामुळे धक्का बसणार नाही असंही विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केलं आहे. परंतु सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश CUET या प्रवेश परीक्षेअंतर्गतच होतील असंही एम जगदीश कुमार यांनी सांगितलं.
"CUET गुणांच्या आधारे विद्यापीठ जनरल आणि आरक्षित प्रवेशाच्या जागांसाठी प्रवेश देऊ शकतात. आताच्या आरक्षणाच्या धोरणेवर त्याचा परिणाम होणार नाही." असं त्यांनी एनडिटीव्ही या वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केलं.
8. महाराष्ट्रात किती केंद्रीय विद्यापीठ आहेत?
महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालय हे एकमेव केंद्रीय विद्यापीठ आहे.
विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या या महाविद्यालयात साधारण एकूण 1500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मास कॉम, एमएसडब्लू, एमएड, बीएजड, ट्रायबल स्टडी, नॉन वॉयलंस स्टडिज अशा एकूण बारा अभ्यासक्रमांचं शिक्षण विद्यापीठात दिलं जातं.
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी, बी. एस. मिरगे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "यापूर्वी पदवीचे प्रवेश आम्ही बारावीच्या गुणवत्ता यादीनुसार देत होते. पण आता विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन नियमानुसार प्रवेश परीक्षा होईल आणि मग प्रवेश दिले जातील. UGC च्या निर्णयानुसारच प्रवेश प्रक्रिया पार पडते. त्यामुळे नियम आम्हाला बंधनकारक आहेत."
9. विद्यार्थ्यांचं म्हणणं काय?
विद्यापीठ अनुदान आयोगाने ऐन प्रवेशाच्या तोंडावर असा अचानक निर्णय जाहीर केल्याने काही विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. मुंबईत चेंबूर येथे राहणारा आणि जय हिंद महाविद्यालयातून HSC बोर्डाची परीक्षा देणाऱ्या मानस पवारने या निर्णयावर टीका केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
मानसला दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेण्याची इच्छा आहे. पण UGC ने अचानक प्रवेश परीक्षा घेण्याची घोषणा केल्याने तो संधी गमावेल अशी भीती त्याला आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना मानस पवार म्हणाला, "मला दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेण्याची इच्छा आहे. मी आर्ट्स शाखेतून बारावीची परीक्षा देत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने असा अचानक निर्णय कसा घेतला? ऐनवेळी स्वतंत्र प्रवेश परीक्षेची तयारी आम्ही कशी करणार? HSC बोर्डाचा अभ्यासक्रम हा NCERT पेक्षा वेगळा आहे. आम्ही HSC बोर्डाचे विद्यार्थी ऐनवेळी वेगळ्या अभ्यासक्रमाची तयारी कशी करणार हा प्रश्न आहे. NCERT अभ्यासक्रमावर ही परीक्षा असल्याने CBSE विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा सोयीची आहे. पण आमच्यावर हा एकप्रकारे अन्याय आहे असं मला वाटतं."
विद्यापीठ अनुदान आयोगाने अचानक निर्णय जाहीर करण्याऐवजी दोन किंवा किमान एक वर्ष तरी आधी असा निर्णय जाहीर केला असता तर आम्ही वर्षभर तयारी केली असती असंही मानस सांगतो.
केंद्रीय विद्यापीठात प्रवेशासाठी आता बारावीचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामुळेही विद्यार्थ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
"प्रत्येक फिल्डमध्ये प्रवेशासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली जात आहे. आता विद्यापीठ अनुदान आयोगानेही म्हटलं की या परीक्षेसाठी बारावीचे गुण ग्राह्य धरणार नाही. मग बारावीची परीक्षा कशासाठी घेतली जाते? असा आम्हा विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय. बारावीच्या गुणांचं महत्त्व शैक्षणिक आस्थापनाच कमी करणार असतील तर आम्ही दोन वर्षे बारावीच्या परीक्षांसाठी तयारी का करायची?" असाही प्रश्न त्याने उपस्थित केला.
तर काही विद्यार्थी या निर्णयाचं स्वागतही करत आहेत. प्रवेश परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन एकसमान स्तरावर होईल हे स्वागतार्ह आहे असंही काही विद्यार्थ्यांना वाटतं.
ठाणे जिल्ह्यात शिकणारी ऊर्जा व्ही. या विद्यार्थिनीने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "वेगवेगळ्या बोर्डाच्या परीक्षांची काठीण्य पातळी वेगळी असते. तसंच आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या शाखांच्या विद्यार्थ्यांची आव्हानं सुद्धा वेगळी असतात. काहींसाठी बोर्डाची परीक्षा सोपी असते तर काहींसाठी कठीण असते. प्रवेश परीक्षेमुळे एकाच पातळीवर एकसमान प्रेवश होतील."
NCERT अभ्यासक्रमामुळे परीक्षेची तयारी करण्यासाठी तीन महिनेच मिळतील हे सुद्धा खरं आहे. पण विद्यार्थी बाकी प्रवेश परीक्षांचा अभ्यास करतातच, त्यामुळे या प्रवेश परीक्षेकडेही त्याचदृष्टीने पहायला हवं असंही ऊर्जा म्हणाली.
10. शिक्षणतज्ज्ञांचं म्हणणं काय?
उच्च शिक्षण आणि शालेय शिक्षणातील तज्ज्ञांच्या याबाबत संमिश्र प्रतिक्रिया आहेत. शिक्षणतज्ज्ञ अचला जोशी यांनी या निर्णयावर तीव्र टीका केली आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "कॉमन एन्ट्रान्स टेस्ट घेण्यासाठी देशभरात शिक्षण पद्धती कॉमन किंवा एकसमान आहे. ती सध्यातरी नाहीय. मग अशा कॉमन परीक्षेला काय अर्थ आहे. कोणताही निर्णय असा अचानक लागू करायला नको. त्याचा सखोल विचार होणं आवश्यक आहे. परीक्षेचा मापदंड समान हवा ही भूमिका असली तरी शिक्षणाचा मापदंड देशभरात सर्व विद्यार्थ्यांसाठी समान आहे का? याचाही विचार व्हायला हवा नाहीतर विद्यार्थ्यांवर अन्याय होता. त्यामुळे एकसमान परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळेल असं आता तरी म्हणता येणार नाही."
त्या पुढे सांगतात, "हा निर्णय बेजबाबदार आहे असं मला वाटतं. या परीक्षेची करेक्शन मेथड कशी असणार आहे, परीक्षक कसे असतील हे सुद्धा महत्त्वाचं आहे. प्रत्येक राज्यातली शिक्षण पद्धती वेगळी आहे. विद्यापीठातील प्रवेशासाठी कॉमन परीक्षा देशपातळीवर घेण्यासाठी प्रत्येक राज्यातील अभ्यासक्रम आणि शिक्षण पद्धती एकसमान आहे का याचा विचार व्हायला हवा. बारावीचे गुण ग्राह्यच धरणार नाहीत अशी भूमिकाही चुकीची आहे. बारावीचे गुण का नकोत हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे."
मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. राजन वेळूकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "काही केंद्रीय विद्यापीठांमध्ये स्पर्धा खूप जास्त आहे. त्यामुळे अर्जदार विद्यार्थ्यांना समान संधी देण्यासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घ्यायला हरकत नाही. विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश मिळणार असल्याने हा स्वागतार्ह निर्णय आहे."
प्रवेश परीक्षा घेणार असले तरी केंद्र शासनाच्या आरक्षणानुसार प्रवेश दिले जातील. त्या त्या आरक्षित वर्गात गुणवत्ताधारक विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल हे सुद्धा महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विद्यापीठांच्या अनेक परीक्षांना सामोरं जावं लागणार नाही असंही ते म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























