उमा भारती अचानक दुकानात घुसल्या आणि दगडफेक केली...#5मोठ्याबातम्या

उमा भारती

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. उमा भारती अचानक दुकानात घुसल्या आणि दगडफेक केली...

मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी राज्यात दारूबंदी मोहीम सुरू केली आहे. उमा भारती यांनी रविवारी (13 मार्च) अचानक दारूच्या दुकानात घुसून तोडफोड केली आहे.

त्यांनी दगडफेक करून दारूच्या बाटल्या फोडल्या. दरम्यान, उमा भारती यांचे समर्थकही तेथे घोषणाबाजी करताना दिसले. भोपाळमधील भेल भागातील आझाद नगरमध्ये ही तोडफोड करण्यात आली आहे.

लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

उमा भारती यांनी स्वतः हा व्हीडिओही ट्वीट केला आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

'या भागात कामगारांच्या वस्त्या आहेत, जवळच मंदिरे आहेत, लहान मुलांसाठी शाळा आहेत. प्रशासनाने प्रत्येक वेळी बंदीचे आश्वासन दिले होते, पण अनेक वर्षांपासून ते केले जात नाही. आज मी प्रशासनाला आठवडाभरात दुकान व परिसर बंद करण्याचा इशारा दिला आहे,' असं उमा भारती यांनी म्हटलं होतं.

उमा भारती यांनी 15 जानेवारी 2022 पर्यंत दारू बंदी होईल अन्यथा रस्त्यावर उतरू, असं म्हटलं होतं. ही तारीख उलटून गेल्यानंतरही दारूबंदी दूरच, पण अवघ्या दोन दिवसांनी शिवराज सिंह चौहान सरकारने मंत्रिमंडळाने 2022-23 या वर्षासाठी नवीन मद्य धोरणाला मंजुरी दिली होती.

2. सोलापूर-पुणे हायवेवर वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला अपघात, 8 जणांचा मृत्यू

वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला झालेल्या भीषण अपघातात 8 वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तीसहून अधिक वारकरी जखमी झाले आहेत.

अपघातातील सर्व वारकरी हे तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील रहिवाशी आहेत. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडीनजिक भरधाव वेगात असलेल्या एका मालवाहू ट्रकने वारकऱ्यांच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.

महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

3. सभागृहात पेनड्राइव्ह दाखवणे शूरपणाचं नाही- प्रकाश आंबेडकर

"आपण देवेंद्र फडणवीस यांना फार शूर राजकारणी समजत होतो. परंतु, सभागृहात पेनड्राइव्ह दाखवणे हे शूरपणाचं नाही," असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.

'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे म्हटलं आहे.

प्रकाश आंबेडकर

फोटो स्रोत, Facebook

प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं, "देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहापेक्षा हा पेनड्राइव्ह आणि त्यासंदर्भातील आरोप बाहेर जनतेसमोर केले असते तर त्याला महत्व राहिले असते. त्या पेनड्राइव्हमध्ये काय 'गुलकंद' आहे? तेही फडणवीसांनी स्पष्ट केले पाहिजे आणि ते जनतेसमोर आले पाहिजे."

"देवेंद्र फडणवीस यांना मी फार शूर आणि लढाऊ राजकारणी समजत होतो. ते तलवार म्यानातून काढूत लढत बसतील. मात्र, सभागृहात पेन ड्राइव्ह दाखवणे शूरपणा नाही. सभागृहातील आरोपांतून फारसं साध्य होणार नाही. सभापती फार तर त्यांचे आरोप फेटाळून लावतील. फडणवीसांनी जे बोलावं ते स्पष्ट बोलावं. त्यातून दुसरा कोणताही वास येऊ नये," असा टोलाही आंबेडकरांनी लगावला आहे.

4. मला कोणाचा हिरमोड करायचा नाहीये, पण...- अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात खराडीत ऑक्सिजन पार्कचे भूमिपूजन करण्यात आलं. भूमिपूजनानंतर अजित पवारांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून अजित पवार यांना यावेळी क्रेननं हार घालण्यात आला. त्यानंतर बोलताना अजित पवार यांनी म्हटलं, "हार घालण्याचा प्रकार मी आता बघितला, असा मी हार आयुष्यात कधीच घातला नाही. बारामतीत एवढ्या मतांनी निवडणून आलो तेव्हाही असा हार घातला नाही.

अजित पवार

फोटो स्रोत, Getty Images

मात्र याच पैशानं ज्याला गरज आहे त्याला मदत करा, कुणाला वह्या पुस्तकांना पैसे लागत असतील त्याला मदत करा. मला कुणाचा हिरमोड करायचा नाहीय."

कोरोनामुळे आम्हाला सर्वांना नियम लावावे लागले. पटत नव्हतं, पण नियम लावावे लागलेत. आरोग्यतल्या उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न केला. वेळ आली तर दंडही आकाराला. आमचा नाईलाज होता, असंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं.

टीव्ही9 मराठीनं ही बातमी दिली आहे.

4. 'फडणवीसांना हात लावाल तर महाविकास आघाडी जाळून टाकू', भाजप आमदाराचा इशारा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुंबई सायबर पोलिसांनी पोलीस बदली घोटाळा प्रकरणी गुप्तवार्ता विभागातील अहवाल बाहेर आल्याप्रकरणी नोटीस बजावली असून त्यांची रविवारी (13 मार्च) चौकशीही करण्यात आली.

देवेंद्र फडणवीस यांना सायबर पोलिसांनी पाठवलेल्या नोटीस पाठवल्यामुळे भाजप नेते आक्रमक पवित्र्यात दिसले. भाजपकडून राज्यभरात नोटीशींची होळी करण्यात आली.

भाजप कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केलं. बुलडाण्यातही भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. भाजपने खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर नोटीसची होळी केली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीदेखील केली.

यावेळी प्रतिक्रिया देताना आकाश फुंडकर प्रचंड आक्रमक झाले. "देवेंद्र फडणवीस यांना हात लावला तर नोटीसप्रमाणे महाविकास आघाडीला जाळल्याशिवाय राहणार नाही", असा इशारा आकाश फुंडकर यांनी दिला.

न्यूज18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)