शरद पवारच दाऊदचा माणूस असल्याचा मला संशय - निलेश राणे #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) शरद पवारच दाऊदचा माणूस असल्याचा मला संशय - निलेश राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केलीय. शरद पवारच दाऊदचा माणूस असल्याचा संशय निलेश राणेंनी व्यक्त केलाय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी प्रसिद्ध केलीय.

सिंधुदुर्गातील कुडाळमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत निलेश राणेंना पत्रकारांनी नवाब मलिकांच्या अटकेसंदर्भात प्रश्न विचारला.

त्यावेळी निलेश राणे म्हणाले, "अनिल देशमुख मराठा होते, त्यांचा घेतला राजीनामा. नवाब मलिकांसाठी वेगळा न्याय का? मला असा संशय येतो की पवारसाहेबच दाऊदचा माणूस आहे, असा संशय मला येतो. ज्यानं दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला, त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? अनिल परबांचा पटकन राजीनामा घेतलात, मग नवाब मलिक कोण आहे? कोण लागतो शरद पवारांचा?"

तसंच, "नवाब यांच्या प्रकृतीबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी जेवढी तत्परता दाखवली, तेवढीच काळजी अनिल देखमुखांच्या वेळी कुठे होती?" असा सवाल उपस्थित करत निलेश राणेंनी सुप्रिया सुळेंवरही टीका केली.

2) तुम्ही कितीही मळमळ केली, तरी मोदीच निवडून येणार - फडणवीस

गोव्यात भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून यशस्वीरित्या कामगिरी पार पाडल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात परतले. त्यावेळी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. त्यानंतर काल विधानभवन परिसरात भाजप आमदारांनी फडणवीसांच्या नावे घोषणाही दिल्या. त्यानंतर फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

पाचपैकी चार राज्यात मिळालेल्या विजयाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "सगळ्यांनाच आनंद झालाय असं नाहीय. काही लोकांना इतकी मळमळ आहे की ते म्हणतात अपरिचित देवदूतापेक्षा परिचित दैत्य बरा. इतकी मळमळ बरी नाही. तुम्ही कितीही मळमळ केली, तरी मोदीच निवडून येणार आहेत."

फडणवीस पुढे म्हणाले की, "लढाई अजून संपलेली नाही. खरी लढाई मुंबईत होईल. मुंबईला कुठल्या पक्षापासून मुक्त करायचं नाही, तर आम्हाला मुंबईला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त करायचं आहे."

"मुंबई महानगर पालिकेला भ्रष्टाचाऱ्यांच्या विळख्यातून बाहेर काढत नाही, तोपर्यंत दम घेता येणार नाही. मुंबईचा प्रचंड विजय आणि महाराष्ट्रात भाजपाचं पूर्ण बहुमताचं सरकार तयार करण्यासाठी आपण सज्ज राहावं," असंही फडणवीस म्हणाले.

3) नारायण राणे केंद्रातलं वजन वापरून दबाव टाकतात - मुंबई पोलीस

दिशा सॅलियन प्रकरणात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात तक्रारी करण्यात आल्या आहेत आणि हे प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं आहे.

मुंबईतील दिंडोशी सत्र न्यायालयानं राणे पिता-पुत्रांना 15 मार्चपर्यंत दिलासा दिलाय. मात्र, अटकपूर्व जामिनाला राज्य सरकारच्या वतीने जोरदार विरोध करण्यात आला. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

यावेळी मुंबई पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय की, "राणे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचं नाव घेत मुंबई पोलीस आणि तपासावर दबाव टाकत आहेत."

राणे पिता-पुत्रांनी मात्र हा गुन्हा राजकीय सूडबुद्धीने दाखल केल्याचा दावा केलाय.

या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या मंगळवारी (15 मार्च) होणार आहे.

4) अखिलेश यादव हरले नाहीत, त्यांना हरवलं गेलंय - ममता बॅनर्जी

"मला वाटतं, अखिलेश यादव यांचा ठरवून पराभव केला गेला. त्यांना आव्हान द्यायला हवं. ईव्हीएमची फॉरेन्सिक तपासणी व्हायला हवी," अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी उत्तर प्रदेशमधील निवडणुकीच्या निकालानंतर दिली. लोकमतनं ही बातमी दिली आहे.

ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, "हा लोकप्रिय जनादेश नाही, हा यंत्रणांचा जनादेश आहे. केंद्रीय एजन्सींचा वापर करून आणि हुकूमशाहीच्या माध्यमाने त्यांनी काही राज्ये जिंकली आहेत. ते आता आनंदात विचार करत असतील, की 2024 ही जिंकू. मात्र ते एवढे सोपे नसेल."

ममता बॅनर्जींनी उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाला पाठिंबा दिला होता. किंबहुना, वाराणसीत जाऊन त्यांनी समाजवादी पक्षाचा प्रचारही केला होता.

5) काँग्रेसचा नवीन अध्यक्ष नेमण्याची G-23 नेत्यांची मागणी

काँग्रेस पक्षाचा नवीन अध्यक्ष शक्य तितक्या लवकर नेमावा, अशी मागणी काँग्रेसमधील G-23 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यांनी केलीय. या G-23 नेत्यांनी काँग्रेसच्या सुधारणेसाठी मध्यंतरी पत्र पाठवत पक्षश्रेष्ठींकडे आपली भूमिका मांडली होती. इंडिया टुडेनं ही बातमी दिली आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. किंबहुना, पंजाबमधील सत्ताही काँग्रेसला राखता आली नाही.

काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलावण्यात यावी, अशीही मागणी या G-23 नेत्यांनी केलीय.

दुसरीकडे, काँग्रेस नेते कपिल सिब्बल आणि मनिष तिवारी यांनी काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी बैठकही घेतली आणि त्यात निवडणुकीतल्या काँग्रेसच्या स्थितीवर चर्चा केली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)