देवेंद्र फडणवीस खरे हिंदुहृदयसम्राट-नितेश राणे #5मोठ्याबातम्या

देवेंद्र फडणवीस, नितेश राणे, बाळासाहेब ठाकरे,

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, देवेंद्र फडणवीस
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी प्रसिद्ध झालेल्या विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवरील पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा.

1. देवेंद्र फडणवीस खरे हिंदुहृदयसम्राट-नितेश राणे

"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना 'हिंदुहृदयसम्राट' म्हणून ओळखलं जातं, पण त्यांच्यानंतर जर कुणाला 'हिंदुहृदयसम्राट' पदवी द्यायची असेल तर ते देवेंद्र फडणवीस असतील, त्यांना ती पदवी द्यावी", असं वक्तव्य भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.

'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

भाजपकडून आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर अणुशक्तीनगर विधानसभा वॉर्डमध्ये कार्यकर्ते संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी नितेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

"दाऊदशी संबंध आल्यामुळे, नवाब मलिक यांचा राजीनामा आम्ही मागतोय. दाऊदला मदत करणाऱ्या नवबा मलिक यांचे कॅबिनेटपद अजूनही कायम आहे. त्यांना पाठीशी घालत आहात, तर मग मुलांना रस्त्यावर काय सुरक्षा द्याल? 'हिंदुहृदयसम्राट' ही पदवी बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर जर कुणाला द्यायची असेल तर ती देवेंद्र फडणवीस यांना द्यायला हवी, कारण त्यांच्या पत्रकार परिषदेनंतर हे दाऊद कनेक्शन समोर आले आहे", अशी इच्छा नितेश राणे यांनी बोलून दाखवली.

2.पॅलेस्टाईनमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्याचा मृत्यू

पॅलेस्टाइनमधील भारतीय दूतावासातील अधिकारी मुकुल आर्य यांचं निधन झालं. सध्या युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी मोहीम सुरू असताना ही घटना घडली आहे. त्यानंतर संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.

'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

पॅलेस्टाइनमधील रामल्ला येथे रविवारी (6 मार्च) ते दूतावासात होते. त्यानंतर भारतीय दूतावासात ते मृतावस्थेत आढळले होते. त्यांच्या मृत्यूसंदर्भातील अधिक माहिती अजून समोर आली नाही.

मुकुल आर्य यांनी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयातही कामं केलं होतं. ते 2008 सालच्या बॅचचे अधिकारी होते. त्यांनी काबूल आणि मॉस्कोमध्येही भारतीय दूतावासात काम केलं होतं. त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवेत भरती होण्याअगोदर दिल्ली विश्वविद्यापीठ आणि जवाहरलाल विद्यापीठात अर्थशास्त्राचा अभ्यास केला होता.

3.राज्यपालांना हटवायला एक फोन पुरेसा आहे- आव्हाड

"राज्यपालांना या ठिकाणाहून उचलायचे असेल तर एक फोन पुरेसा आहे", असं विधान गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड, भगतसिंह कोश्यारी

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, मंत्री जितेंद्र आव्हाड

"राज्यपालांवर मोदी काय बोलले मला माहीत नाही, मी पाहिलं नाही. परंतु त्या राज्यपालांना इथून उचलायला एक फोन बस झाला. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर खरंच प्रेम असेल, तसेच राज्यपालांनी केलेलं वक्तव्य चुकीचं वाटत असेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात असेल तर मोदींसाठी फोनवरून एक मिनिटाचं काम आहे. प्रेम असेल तर त्यांनी राज्यपालांना एका मिनिटात हटवावे", असं आव्हाड म्हणाले.

'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

4. महापालिकांना 1000 कोटी, राज्याकडून मदत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजनेच्या सूत्रात बदल करीत नागरी लोकसंख्येला प्राधान्य देतानाच तब्बल एक हजार कोटींची विशेष आर्थिक मदत देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे यातील निम्मा म्हणजेच ५१८ कोटींचा निधी केवळ मुंबई, ठाणे आणि पुण्याला देण्यात आला आहे.

'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

राज्यात महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपालिकांच्या निवडणुकांचे लवकरच बिगूल वाजणार आहे. वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्ह्यांशी तसेच आघाडीतील प्रमुख मंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर नियोजन विभागाने याबाबतचा आदेश जारी करण्यात येणार आहे.

मुंबई
फोटो कॅप्शन, मुंबई महापालिका मुख्यालय

निधी वाटपात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे पालकमंत्री असलेल्या मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी सर्वाधिक 199 कोटी, मुंबई शहर जिल्ह्यासाठी 65 कोटी, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यासाठी 143 कोटी, अर्थमंत्री अजित पवार हे पालकमंत्री असलेल्या पुण्यासाठी 111 कोटी असे 518 कोटी तीन शहरांना देण्यात आले आहेत.

5.ईडीपेक्षा शेतकऱ्याच्या खिशातल्या बिडीची किंमत जास्त-धनंजय मुंडे

"ईडीपेक्षा आमच्या शेतकऱ्याच्या खिशातल्या बिडीची किंमत जास्त आहे", असं सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

"भाजपाचा आणखीही अंगातला माज गेलेला नाही. होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं केलं तरी. भल्या भल्याच्या मागे इन्कम टॅक्स काय, सीबीआय काय… ईडीची तर इज्जत एवढी पण ठेवली नाही. एवढ्यावरही त्यांना वाटतं की, आम्ही कुणाला झुकवू शकतो, वाकवू शकतो, पुन्हा या महाराष्ट्रात सत्तेत येऊ शकतो. त्यांची खरी जर जिरवायची असेल, तर येणाऱ्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस हा नंबर एकचा पक्ष आहे हे आपण दाखवलं, तर भाजपावाले या महाराष्ट्राच्या मातीत कधीही अशा पद्धतीचा नाद करणार नाहीत", असं ते म्हणाले.

'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे.

खऱ्या लोकशाहीचं दर्शन, लोकशाही काय असते, लोक मानस काय असतो याचं दर्शन जर खरं कुणी घडवून दाखवलं असेल तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी घडवून दाखवलं असं मुंडे म्हणाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)