You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नारायण राणे- उद्धव ठाकरेंनी मला कॉल केला, याबद्दल बोलू नका म्हणाले #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा
1.मुख्यमंत्र्यांनी मला कॉल केला, याबद्दल बोलू नका म्हणाले- राणे
"सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियनची हत्या झाल्यानंतर मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा दोन वेळा फोन आला होता. तेव्हा ते म्हणाले होते की, या प्रकरणात एका मंत्र्याची गाडी होती असं बोलू नका, तुम्हालाही मुलं आहे. मात्र माझ्या स्टेटमेंटमधून हे वाक्य वगळलं आहे. त्यामुळे आजही ही कारवाई राजकीय हेतूनं केली," असा आरोप नारायण राणेंनी केला आहे.
दिशा सालियन मृत्यूप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांची मालवणी पोलिसांनी 9 तास चौकशी केली. पोलीस स्टेशनच्या बाहेर राणे समर्थकांनी गोंधळ सुरू केला. पोलिसांनी यावेळी बळाचा वापर केला.
'सकाळ'ने ही बातमी दिली.
राणे म्हणाले, "आम्ही पत्रकार परिषदेत बोललो होतो की, तिने आत्महत्या केली नसून, तिची हत्या आहे. तिच्या खऱ्या आरोपींना शिक्षा व्हावी. मात्र महापौर पेडणेकर तिच्या आईवडिलांकडे गेल्या. त्यानंतर त्यांनी दिशाच्या आई वडिलांना तक्रार द्यालया प्रवृत्त केलं.
दिशाची आई म्हणते राणे पिता पुत्रांमुळे आपली बदनामी होतेय. ही खोटी तक्रार पोलीसांनी घेतली आणि आम्हाला नोटीस दिली. आमची 9 तास चौकशी झाली. आम्ही सांगत होतो की, मी केंद्रीय मंत्री आहे, नितेश राणे आमदार आहे मात्र तरी पोलीस सोडत नव्हते. त्यानंतर आम्ही अमित शहांना फोन केला. त्यानंतर आमचा जबाब नोंदवल्यानंतर पोलिसांनी आम्हाला सोडलं."
2.पेट्रोलची टाकी भरून घ्या, मोदी सरकारची इलेक्शन ऑफर संपणार आहे- राहुल गांधी
'पेट्रोलच्या टाक्या लवकर भरून घ्या, मोदी सरकारची निवडणूक ऑफर संपणार आहे", असा हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
"भाजपचे लोक धर्म आणि खोट्या गोष्टींच्या आधारे मतं मागत आहेत. शिवाय भाजपचे लोक संपूर्ण देशात हिंदू धर्मावर बोलत आहेत. हिंदू धर्माचा खरा अर्थ सत्य असा आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
परंतु, भाजपचे लोक खोट्या गोष्टींच्या आधारे मतं मागत आहेत. पंतप्रधान मोदी हे खोट्या गोष्टींचे संरक्षण करत आहेत. भाजपमधील लोक आपापली खूर्ची वाचवण्यासाठी खोट्या गोष्टींचा आधार घेत आहेत", असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
3.मेट्रो उद्घाटनापेक्षा युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांचा प्रश्न महत्त्वाचा- पवार
"सध्या युक्रेनमधील भारतीय विदयार्थी देशात सुरक्षितपणे आणणे महत्त्वाचे आहे. तिकडे लक्ष देण्याऐवजी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्धवट काम पूर्ण झालेल्या मेट्रोचे उदघाटन करण्यासाठी येत आहेत. मेट्रोपेक्षा विद्यार्थी सुरक्षा अधिक महत्वाची आहे", असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
पवार म्हणाले की, "खडकवासला, वरसगाव, पानशेत अशी मोठमोठी धरणे पुण्याच्या वरच्या भागात असताना नदीचे पात्र कमी करणे, हे भविष्यातील मोठ्या दुर्घटनेचे द्योतक ठरू शकते."
"अतिवृष्टी किंवा ढगफुटीसारख्या घटना पुण्यात घडल्यास उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणा-या नदीसुधार प्रकल्पाचे भविष्य काय ठरू शकते"? असा सवाल पवार यांनी केला.
'पुढारी'ने ही बातमी दिली आहे.
4. मुंबईत वाहन टो करणे थांबवणार-पोलीस आयुक्त
"प्रिय मुंबईकरांनो, आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे. सर्वांत आधी आम्ही वाहने उचलून नेणे थांबवित आहोत. आपण सर्वांनी जर नियमांचे पालन केले तर प्रायोगिक तत्त्वावरील हा प्रयोग नियमित करण्यात येईल. तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की सांगा", असे ट्वीट करत मुंबईचे नवे पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबईकरांना भेट दिली आहे.
'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.
हा एक प्रयोग असून तो तात्पुरत्या स्वरुपात राबवला जाणार आहे. त्यानुसार आता वाहतूक पोलिस वाहने उचलणे थांबवणार आहेत.
मात्र, ही सूट देत असताना मुंबईकरांनी ट्रॅफिकच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे आयुक्त संजय पांडे यांनी अधोरेखित केले आहे. याचा अर्थ जर मुंबईकरांनी शिस्त आणि वाहतुकीचे नियम पाळले नाहीत, तर वाहन टो करणे सुरू होऊ शकते.
5.स्वदेशी बनावटीच्या स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीची यशस्वी चाचणी
दोन ट्रेन समोरासमोर आल्या तरी आता त्यांच्यामध्ये टक्कर होणार नाही. स्वदेशी बनावटीच्या स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली 'कवच'ची चाचणी घेण्यात आली आहे. ही चाचणी यशस्वी झाली आहे.
'एनडीटीव्ही'ने ही बातमी दिली आहे.
सिकंदराबादमध्ये एकाच रुळावर दोन गाड्या समोरासमोर पूर्ण वेगाने आणून स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली प्रतिकूल परिस्थितीत गाड्यांची टक्कर थांबवू शकते का? याची यशस्वी चाचणी करण्यात आली. रेल्वे मंत्रालयाने या चाचणीचा व्हिडीओ त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे.
स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली 'कवच' हे रिसर्च डिझाईन आणि स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन (RDSO) ने भारतीय उद्योगाच्या सहकार्याने विकसित केले आहे. हे तंत्र इतकं अचूक आहे की, भरधाव वेगाने धावणाऱ्या दोन गाड्या समोरासमोर आल्या तरी त्यांची टक्कर होणार नाही.
रेड सिग्नल ओलांडताच ट्रेनला आपोआप ब्रेक लागेल. यावेळी मागूनही एखादी ट्रेन येत असेल तर ती ट्रेनही आपोआप थांबेल. ट्रेन मर्यादेपेक्षा जास्त वेगाने धावत असेल तरीही दुसरी ट्रेन समोर आल्यानंतर आपोआप ब्रेक लावला जाईल, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेने दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)