नवाब मलिकांची अटक, दाऊदशी संबंधांचा आरोप BMC निवडणुकीत शिवसेनेची डोकेदुखी ठरतील?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, हर्षल अकुडे
- Role, बीबीसी मराठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांना बुधवारी (23 फेब्रुवारी) अंमलबजावणी संचलनालयाने (ED) अटक केली. कोर्टानं त्यांना 3 मार्चपर्यंत ED कोठडी सुनावली आहे.
यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय विश्वात मोठी खळबळ माजली आहे. या प्रकरणावर राजकीय नेत्यांकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
राज्य-केंद्रांतील सत्ताधारी विरोधकांचे याप्रकरणावरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
एका मंत्र्याला अटक होणं ही राजकारणात महत्त्वाची घटना मानली जाते. अशा प्रकारच्या कारवाईचे पडसाद राज्याच्या भविष्यातील राजकारणावर उमटू शकतात.
विशेष म्हणजे, राज्यातील मुंबई-पुणे या मोठ्या महापालिकांसह जवळपास पंधराहून जास्त महापालिकांच्या निवडणुकाही तोंडावर आहेत.
अशा स्थितीत मलिकांवरील कारवाईवर शिवसेनेची काय भूमिका असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मलिक यांच्या अटकेनंतर शिवसेनेच्या मुंबई-महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होईल, याचा आढावा बीबीसीने घेतला आहे.
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण शिवसेनेसाठी संवेदनशील
मुंबईतली 1992 सालची दंगल, नंतर 1993 सालचा बॉम्बस्फोट या घडामोडींनंतर राज्याचं राजकारण मोठ्या प्रमाणात बदलल्याचं पाहायला मिळालं होतं.
या संपूर्ण घटनाक्रमादरम्यान शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेची बरीच चर्चा झाली होती. त्यामुळे शिवसेनेच्या दृष्टीकोनातून हे प्रकरण संवेदनशील असल्याचं मानलं जातं.
नेमक्या याच मुद्द्यावर भाजपने शिवसेनेला संभ्रमात टाकण्याचं काम केलं आहे, असं मत तज्ज्ञांनी याबाबत व्यक्त केलं.

फोटो स्रोत, Ani
पत्रकार चैतन्य मारपकवार यांच्याशी बीबीसीने याबाबत चर्चा केली. मारपकवार हे टाईम्स ऑफ इंडियासाठी शिवसेनाविषयक घडामोडींचं वार्तांकन करतात.
ते म्हणाले, "शिवसेनेचं मुंबईतलं राजकारण मराठी माणसाशी संबंधित आहे. तर मराठी माणसासाठी मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण हा संवेदनशील विषय आहे. शिवाय, त्या काळात घडलेल्या घडामोडी, घटनाक्रम पाहिल्यास शिवसेनेसाठीही हा विषय अतिशय संवेदनशील असा आहे. या प्रकरणात भाजपने हाच मुद्दा शिवसेनेकडून अलगद हायजॅक केला आहे."
हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची पुन्हा कोंडी
हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात खडाजंगी होत असल्याचं यापूर्वी अनेकवेळा दिसून आलं आहे. आपलं हिंदुत्व कशा पद्धतीने योग्य आहे, याबाबतचे दावे शिवसेनेकडून नेहमी केले जातात.
तर शिवसेना ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे त्यांनी हिंदुत्वाला तिलांजली दिली, अशी टीका भाजपकडून केली जाते.

फोटो स्रोत, other
"आता या प्रकरणातून हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची कोंडी करण्यात भाजप पुन्हा यशस्वी होत असल्याचं दिसून येतं," असं ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांना वाटतं.
त्या म्हणतात, "भाजप हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न सातत्याने करतो. म्हणजेच कोअर हिंदुत्त्वाचे विषय मानले जाणारे विषय घेऊन भाजपने आपली वाटचाल सुरू केली आहे.
महाविकास आघाडी नसती तर त्या मुद्द्यावर शिवसेनेचं राजकारण सुरू राहिलं असतं. पण महाविकास आघाडीत असल्यामुळे ते या मुद्द्यावर भाष्य करू शकत नाहीत."
"नेमकं हेच हेरून महाविकास आघाडी आणि शिवसेना यांच्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, सध्यातरी ते यामध्ये यशस्वी होत असल्याचं दिसून येत आहे.
कारण आज जितक्या आक्रमकपणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून वक्तव्यं आली, त्या तुलनेत शिवसेनेकडून याबाबत कोणतीही वक्तव्यं आली नाहीत," असं नानिवडेकर म्हणाल्या.
याविषयी मारपकवार सांगतात, "काही दिवसांपूर्वी एका मैदानाला टिपू सुलतानाचं नाव दिल्याचा मुद्दा भाजपने मोठा केला होता. यामध्ये नेमकी काय भूमिका घ्यावी, हे शिवसेनेला लवकर लक्षात आलं नाही. अखेर झाशीच्या राणीचं नाव देऊ, असं म्हणत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला होता."
शिवसेनेचे वरीष्ठ चार मंत्री याबाबत मौन बाळगून होते. कोणत्याही विषयांवर प्रतिक्रिया देणाऱ्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही याप्रकरणी बोलणं टाळलं, याकडे मारपकवार यांनी लक्ष वेधलं.
सरकार पाडण्यासाठीचे प्रयत्न तीव्र
"भाजपने सरकार पाडण्यासाठीचे प्रयत्न तीव्र केले आहेत. त्यामुळे शिवसेनेला त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी तयार राहावं लागेल," असं मृणालिनी नानिवडेकर यांनी म्हटलं.

फोटो स्रोत, Getty Images
त्यांच्या मते, "भाजपकडून सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू असताना शिवसेनेसमोर मोठं आव्हान निर्माण होत आहे. त्यांना यंदाच्या निवडणुकीत योग्य डावपेच करत भाजपला प्रत्युत्तर द्यावं लागेल."
लोकमतचे सहायक संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान म्हणतात, "उत्तर प्रदेशच्या निवडणुकांपाठोपाठ राज्यातील महापालिका निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वीच महाविकास आघाडी सरकारच्या मुसक्या आवळायच्या, या सरकारमधील नवाब मलिक, अनिल परब किंवा संजय राऊत या आक्रमक नेत्याना कोणत्या ना कोणत्या प्रकरणात जखडून ठेवायचं, अशी रणनिती भाजपने आखलेली दिसून येते."
"याचा दुसरा एक अर्थ असा असू शकतो की भाजपला उत्तर प्रदेशात अपेक्षित असलेलं यश मिळणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं आहे. म्हणूनच त्यांनी महाराष्ट्राकडे आपलं लक्ष्य केंद्रीत केलेलं असू शकतं.
महाराष्ट्रात एक मोठं राजकीय ऑपरेशन करण्याचा विचार त्यांनी केला आहे. त्याचीच सुरुवात आजपासून झाली असण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकरणातील घडामोडी पाहिल्या तर यामधून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष अधिक मजबूतपणे एकत्र येण्याची शक्यता आहे.
कारण, महाविकास आघाडीच्या मुळावरच घाव घालण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याने त्यांची आक्रमक भूमिका पाहता, तिन्ही पक्षांना याबद्दलचं काहीतरी धोरण ठरवावं लागणार आहे," असं ते म्हणतात.
शिवसेनेला संयमी भूमिका घ्यावी लागणार
"या प्रकरणातून महाविकास आघाडीत हिंदू-मुस्लीम विभाजन करण्याचा प्रयत्न दिसत आहे आणि त्याचा परिणाम महापालिका निवडणुकीत दिसू शकतो," असं मारपकवार म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
या निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती नैसर्गिक असल्याचं दिसून येत होतं. कारण राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत साईड प्लेअर आहे. त्यांच्या जागा इथं 20-25 च्या घरात असतात. त्यांच्या त्यापेक्षा जास्त अपेक्षाही नसते. त्यामुळे शिवसेना 200 ठिकाणी उभी राहिली तर बाकीच्या 80-90 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अशी ही युती होऊ शकते.
पुण्यात हे कॉम्बिनेशन उलटं आहे. तिथं शिवसेना लहान पक्ष असल्यामुळे ते सहायक भूमिकेत जाऊ शकतात. पण नवाब मलिकांच्या अटकेनंतर काय होतं, हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण नवाब मलिक मुंबईचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आहेत. मुंबईचा पक्षाचा चेहरा तेच आहेत. त्यांचा तिथं प्रभावही आहेत.
"या पार्श्वभूमीवर शिवसेनेला संयमी भूमिका घ्यावी लागणार आहे. कारण दाऊद, बॉम्बस्फोट हा शिवसेनेच्या मतदारावर लक्ष्य करणारा विषय आहे," असं मार्पकवार यांना वाटतं.
संदीप प्रधान यांच्या मते, "नव्वदच्या दशकात भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी राजकारणाच्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित करत शरद पवार यांना लक्ष्य केलं होतं. त्यावेळी त्यांनी दाऊदशी आणि गुन्हेगारांशी पवारांचे संबंध असल्याचे आरोप केले होते.
त्याच दरम्यान उल्हासनगरच्या पप्पू कलानी यांच्या संबंधांबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. त्याच पप्पू कलानी यांच्या मुलासोबत भाजपने सत्ता स्थापन केली होती. तुरुंगात असलेल्या पप्पू कलानी यांना बाहेर काढू, असं आश्वासन भाजपने ओमी कलानी यांना दिलं होतं."
"पुढे भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांसोबत सत्ताही स्थापन केली. आता त्याच राष्ट्रवादी काँग्रेसविरुद्ध भाजपने राळ उठवली आहे. या सगळ्या गोष्टी पाहता राजकीय पक्ष केवळ सत्तेसाठी निवडणुका लढतात. त्यासाठी वाट्टेल त्या पातळीवर जाण्याची त्यांची तयारी असते, असा संदेश लोकांमध्ये जातो.
अशा स्थितीत निवडणुकांवर काय परिणाम होईल, हे आताच सांगणं कठीण आहे. त्यामुळे जनतेच्या मनात काय आहे, हे मतपेटीतून समोर येईल," असं प्रधान यांना वाटतं.

हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























