चेतन कुमारला हिजाब प्रकरणी वादग्रस्त ट्वीटमुळे अटक, याआधी का आला होता चर्चेत?

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

कर्नाटकमधील हिजाब वादाप्रकरणी कन्नड अभिनेता चेतन कुमारला अटक करण्यात आली आहे.

कर्नाटकातील शाळांमध्ये मुस्लिम मुलींना हिजाब घालण्यास मनाई करण्याविरोधातील याचिकेवर सुनावणी करणाऱ्या एका न्यायाधीशांविरोधात चेतन यांनी ट्वीट केलं होतं. या ट्वीटमुळेच त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

जस्टिस कृष्णा दीक्षित यांच्यावर टीका करणारं ट्वीट केल्यानंतर चेतन कुमार यांना बंगळुरुमधून अटक करण्यात आलीये.

भूतकाळात वादग्रस्त टिप्पणी करणारे न्यायाधीश अशा प्रकरणाची सुनावणी करत आहेत, ही आश्चर्याची गोष्ट आहे, अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलं होतं.

2020 साली जस्टिस कृष्णा दीक्षित यांनी बलात्काराचा आरोप करणाऱ्या एका महिलेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. चेतन कुमार यांनी याच टिप्पणीचा उल्लेख केला होता. टीका झाल्यानंतर दीक्षित यांनी हा शेरा ऑर्डरमधून डिलीट केला होता.

लोकांची नाराजी

चेतन कुमार यांच्या अटकेनंतर काही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे, तसंच पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

कुमार हे फुलब्राइट स्कॉलर आहेत. ते एक दलित अधिकार कार्यकर्तेही आहेत.

चेतन यांना त्यांच्या सामाजिक कामामुळे तसंच विचारांमुळे नेहमीच टीका सहन करावी लागते, असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे.

चेतन कुमार यांनी 16 फेब्रुवारीला ट्वीट करत या बलात्कार खटल्याचा उल्लेख केला होता.

या खटल्यादरम्यानच जस्टिस दीक्षित यांनी महिलेच्या वक्तव्यांवर 'विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे,' असं म्हणत आरोपीला जामीन मंजूर केला होता.

चेतन कुमार यांनी याच विधानांचा स्क्रीनशॉट शेअर करत ट्वीट केलं होतं की, जस्टिस कृष्णा दीक्षित यांनी बलात्कार प्रकरणी असं विधान केलं होतं. आता हेच न्यायाधीश सरकारी शाळांमध्ये हिजाब घातला जावा की नाही हे ठरवत आहेत..

कारवाईवर टीका

चेतन कुमार यांच्या अटकेनंतर काही लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे, तसंच पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

कुमार हे फुलब्राइट स्कॉलर आहेत. ते एक दलित अधिकार कार्यकर्तेही आहेत.

चेतन यांना त्यांच्या सामाजिक कामामुळे तसंच विचारांमुळे नेहमीच टीका सहन करावी लागते, असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे.

चेतन कुमार यांनी 16 फेब्रुवारीला ट्वीट करत या बलात्कार खटल्याचा उल्लेख केला होता. या खटल्यादरम्यानच जस्टिस दीक्षित यांनी महिलेच्या वक्तव्यांवर 'विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे,' असं म्हणत आरोपीला जामीन मंजूर केला होता.

चेतन कुमार यांनी याच विधानांचा स्क्रीनशॉट शेअर करत ट्वीट केलं होतं की, जस्टिस कृष्णा दीक्षित यांनी बलात्कार प्रकरणी असं विधान केलं होतं. आता हेच न्यायाधीश सरकारी शाळांमध्ये हिजाब घातला जावा की नाही हे ठरवत आहेत..

ANI या वृत्तसंस्थेनुसार बंगळुरू पोलिसांनी चेतन कुमार यांच्यावर 'एखाद्या विशिष्ट समुदायाला गुन्ह्यासाठी प्रवृत्त करण्याचा' आणि 'शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक अपमान' करण्याचा आरोप ठेवला आहे.

'द न्यूज मिनट' वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार चेतन कुमार यांची पत्नी मेघा यांनी फेसबुक लाइव्ह करून चेतन यांच्या अटकेबद्दल काहीच माहिती दिली गेली नसल्याचं म्हटलं होतं.

ज्येष्ठ पत्रकार दिलीप मंडल यांनीही चेतन कुमार यांना त्यांनी मांडलेल्या मतांसाठी शिक्षा का दिली जातीये असा प्रश्न उपस्थित केला आहे.

मंडल यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, जस्टिस दीक्षित यांच्या वक्तव्याचा विरोध करून त्यांनी काय चूक केलं? त्यांना अटक का करण्यात आलीये?

भारतात न्यायपालिकेवर केलेल्या टीकेसाठी तुरुंगवासही होऊ शकतो. 2021 मध्ये सीबीआयने सोशल मीडियावर न्यायाधीश आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरोधात अपमानास्पद पोस्ट केल्याबद्दल पाच जणांना अटक केली होती.

ब्राह्मणवादाविरोधातलं 'ते' वक्तव्य चर्चेत

चेतन कुमार यांची गेल्या वर्षी जून महिन्यात बंगळुरू पोलिसांनी चौकशी केली होती. चेतन कुमार यांनी ब्राह्मणवादाविषयी केलेल्या वक्तव्याशी संबंधित हे प्रकरण होतं.

चेतन कुमार यांना चेतन अहिंसा या नावानं ओळखलं जातं. सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर ते चर्चेत आले होते.

चेतन यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या व्हीडिओत म्हटलं होतं की, "हजारो वर्षांपासून ब्राह्मणवादानं बसवेश्वर आणि बुद्धाच्या विचारांना संपवण्याचं काम केलं आहे. 2500 वर्षांपूर्वी बुद्धानं ब्राह्मणवादविरोधात लढाई लढली. बुद्ध विष्णूचा अवतार नाहीये आणि असं म्हणणं खोटं बोलणं आहे. मूर्खपणा आहे.

यानंतर त्यांनी एक ट्वीट केलं, "ब्राह्मणवाद स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाच्या भावनेचा स्वीकार करत नाही. आपण ब्राह्मणवादाला मूळापासून उखडायला हवं. सगळेच जण एका समान पद्धतीनं जन्म घेतात, त्यामुळे केवळ ब्राह्मण सर्वोच्च आहेत आणि इतर सगळे अस्पृश्य आहेत, असं म्हणणं निव्वळ मूर्खपणा आहे. हा एक खूप मोठा विश्वासघात आहे."

कन्नड अभिनेते उपेंद्र यांनी कोरोना काळात आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना मदत करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाविषयी बोलताना चेतन यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती.

या कार्यक्रमात फक्त पुरोहितांना बोलावण्यात आलं होतं, असं चेतन यांचं म्हणणं होतं. यामुळे मग त्यांनी उपेंद्र यांच्यावर टीका केली.

दुसरीकडे उपेंद्र यांचं म्हणणं होतं की, आपण नुसतंच जातींविषयी बोलत राहिलो तर जात तशीच टिकून राहील. चेतन यांच्या मते, ब्राह्मणवाद हे असमानतेमागचं मूळ कारण आहे.

या दोन्ही अभिनेत्यांच्या वादानंतर सोशल मीडियावर याविषयी चर्चा सुरू झाली आणि मग त्यांचे समर्थकही आपआपसात भिडले.

या व्हीडिओनंतर चेतन यांच्याविरोधात ब्राह्मण डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष आणि आणखी एका संस्थेनं तक्रार दाखल केली.

एका सामाजिक कार्यकर्तीने परराष्ट्र क्षेत्रीय नोंदणी कार्यालयात तक्रार दाखल करत म्हटलं होतं की, चेतन यांना अमेरिकेला परत पाठवण्यात यावं, कारण ते 'ओवरसीज सिटिझन ऑफ इंडिया' कार्डधारक आहेत आणि त्यांनी नियमांचं उल्लंघन केलं आहे.

चेतन कुमार कोण आहेत?

37 वर्षीय चेतन कुमार यांचा जन्म अमेरिकेत झाला आहे आणि त्यांचे आई-वडील डॉक्टर आहेत.

'आ दिनागलु' चित्रपटाचे दिग्दर्शक के.एम. चैतन्य यांनी बीबीसीला सांगितलं होतं, की चेतन येल युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतल्यानंतर भारतात आले तेव्हा चित्रपटासाठी ते नवीन चेहरा होते.

2007मध्ये आलेला हा चित्रपट एक कल्ट चित्रपट समजला जातो.

याशिवाय चेतन यांनी इतर चित्रपटांत काम केलं आहे, पण ते विशेष असं प्रदर्शन करू शकले नाहीत. पण, 2013मध्ये आलेला त्यांचा 'मायना' हा चित्रपट चांगला चालला होता, त्यांचचं खूप कौतुक झालं होतं.

महेश बाबू दिग्दर्शक असलेला चेतन यांचा 'अथीरथा' हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. याच्यामागे चेतन यांचे राजकीय विचार कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं.

एकीकडे एक कार्यकर्ते म्हणून चेतन यांची ओळख तयार होत आहे, तर दुसरीकडे चित्रपटांतील त्यांचा सहभाग कमीकमी होत आहे.

दिग्दर्शक आणि पटकथा लेखक मंजुनाथ रेड्डी ऊर्फ मंसोरे सांगतात, "चेतन हे एक समर्पित अभिनेते असले तरी यशस्वी नाहीयेत. ते अजूनही 'आ दिनागलु' या चित्रपटासाठीच ओळखले जातात. सध्या ते सामाजिक कार्यकर्ता म्हणून पुढे येत आहेत. ज्या अभिनेत्यासाठी सामाजिक प्रश्न जास्त महत्त्वाचे असतात, अशा अभिनेत्याच्या रुपात ते समोर येत आहेत."

इतर सामाजिक मुद्दे

चेतन कुमार आदिवासी लोकांना जंगलातून हटवल्याप्रकरणी कोडगू जिल्ह्यात निदर्शनला बसले. स्थलांतरितांना पर्यायी जागा द्या, या मागणीला त्यांनी पाठिंबा दिला.

श्रुती हरिहरन या अभिनेत्रीनं आतापर्यंत वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटात काम केलं आहे. त्यांनी Me Too मोहिमेदरम्यान चित्रपट जगतातील सुप्रसिद्ध अभिनेते अर्जुन सरजा यांच्याविरोधात 'गैरव्यवहार' केल्याचा आरोप केला होता.

त्यावेळी चेतन यांनी 'फिल्म इंडस्ट्री फॉर राइट्स अँड इक्वेलिटी' (एफआयआरआय) नावानं एका मंचाची स्थापना केली होती. हा मंच चित्रपट उद्योगातील लोकांच्या आर्थिक आणि शारीरिक शोषणाच्या प्रकरणांवर काम करतो.

तेव्हापासूनच चित्रपट उद्योगातील लोकांनी चेतन यांना गांभीर्यानं घेणं बंद केलं, असं मंसोरे सांगतात.

श्रुती हरिहरन यांनी म्हटलं होतं की, "आपण जे काही करत आहोत त्यामुळे आपल्याला किती प्रसिद्धी मिळेल, याची चिंता नसलेली वक्ती म्हणजे चेतन होय. चित्रपट उद्योगात जी माणसं आपल्या अधिकारांपासून वंचित आहेत, त्यांना मदत करायचं काम ते करत आहेत. ते फक्त नाही, तर करूनही दाखवतात."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)