You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तर प्रदेश निवडणूक : यूपीमध्ये 55, तर गोवा-उत्तराखंडच्या सर्व जागांवर आज मतदान
आज (14 फेब्रुवारी) उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यातलं मतदान होत आहे. त्यात 55 मतदारसंघात मतदान होत आहे. त्याशिवाय गोवा-उत्तराखंडच्या सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे.
उत्तर प्रदेश निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 9 जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे. त्यात सहारनपूर, बिजनौर, मुरादाबाद, सम्भल, रामपूर, अमरोहा, बदायूं, बरेली आणि शाहजहांपूरच्या 55 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात एकूण सात टप्प्यांत मतदान होणार आहे.
उत्तर प्रदेशात सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान चालेल.
2017 च्या निवडणुकीत या 55 जागांपैकी भाजपनं 38 जागा जिंकल्या होत्या. तर समाजवादी पार्टीला 15 जागा आणि काँग्रेसला दोन जागा मिळाल्या होत्या.
2017 ची निवडणूक समाजवादी पार्टीनं काँग्रेसच्या नेतृत्वात लढली होती, हेही लक्षात घ्यायला हवं. तर यावेळी सपा आणि आरएलडी यांची आघाडी आहे.
गोव्याची निवडणूक, तृणमूलही मैदानात
गोव्याचा विचार करता याठिकाणी सर्व 40 जागांवर आज मतदान होत आहे. एकूण 301 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. यावेळी गोव्याची निवडणूक अत्यंत रंजक असणार आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत गोव्यात 11 % मतदान झालं आहे.
भाजप आणि काँग्रेस बरोबरच आम आदमी पार्टी आणि तृणमूल कांग्रेसही यावेळी उमेदवारांसह निवडणुकीच्या मैदानात आहे.
गोव्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी 105 मतदान केंद्रांचं व्यवस्थापन महिला अधिकाऱ्यांकडे असणार आहे असं सांगितलं आहे. तसंच सर्व पोलिंग बूथ हे इको फ्रेंडली पद्धतीनं सजवण्यात आले आहेत.
उत्तराखंडच्या सर्व 70 जागांवर मतदान
या दोन राज्यांशिवाय सोमवारी उत्तराखंडच्या सर्व 13 जिल्ह्यांच्या 70 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. याठिकाणी सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात होईल आणि सायंकाळी सहा वाजपर्यंत मतदान केलं जाईल.
राज्यात सध्या भाजपचं सरकार आहे. पण या पाच वर्षांच्या कार्यकाळात भाजपनं एका पाठोपाठ तीन मुख्यमंत्री बदलले आहेत. त्यामुळं पक्षातील अंतर्गत वादाचा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
या पाच वर्षांच्या कार्यकाळात 9 मार्च 2021 ला त्रिवेंद्र सिंह रावत यांनी राजीनामा दिलास आणि तिरथ सिंग रावत यांना नवीन मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आलं. मात्र, चार महिन्यांच्या आत तिरथ सिंह रावत यांनीही राजीनामा दिला आणि पुष्कर सिंह धामी यांनी त्यांची जागा घेतली.
याठिकाणी 70 सदस्यांच्या निवडणुकीसाठी 632 उमेदवार मैदानात आहेत. सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 10 मार्चला समोर येतील.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)