IPL Auction 2022: लिलावाने हाडवैरी आणले एकत्र; अश्विन-बटलर, कृणाल-दीपक एका संघात

राजस्थान रॉयल्स, जोस बटलर, रवीचंद्रन अश्विन

फोटो स्रोत, RODGER BOSCH

फोटो कॅप्शन, रवीचंद्रन अश्विन
Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

इंडियन प्रीमिअर लीग लिलावात संघांनी केलेल्या योजनांमुळे एकमेकांविरोधात उभे ठाकलेले खेळाडू एकत्र खेळताना दिसणार आहेत.

राजस्थान रॉयल्सने जोस बटलरला रिटेन केलं होतं. त्यांनी लिलावात रवीचंद्रन अश्विनला खरेदी केलं. 2019 हंगामात अश्विनने बटलरला मंकडेड आऊट करण्यावरून वाद रंगला होता. बटलरने यासंदर्भात तीव्र नाराजीही व्यक्त केली होती. योगायोग म्हणजे अश्विन आणि बटलर या दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांबरोबर खेळायला आतूर असल्याचं म्हटलं आहे.

दुसरीकडे आयपीएलमधील नवीन संघ लखनौ सुपरजायंट्सने कृणाल पंड्या आणि दीपक हुड्डा यांना ताफ्यात समाविष्ट केलं. गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेदरम्यान कृणाल आणि दीपक यांच्यातला वाद विकोपाला गेला होता. बडोदा संघासाठी खेळणारे हे दोघे एकमेकांविरोधात उभे ठाकले. लखनौ संघाने या दोघांना एकत्र आणण्याचा धाडसी निर्णय घेतला.

कृणाल-दीपक यांचं का बिनसलं?

मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी स्पर्धेत बडोद्याच्या पहिल्या सामन्याआधी दीपक हुड्डाचं कर्णधार कृणाल पांड्याबरोबर भांडण झालं. यानंतर दीपक हुड्डा बायो-बबल सोडून निघून गेला. वादानंतर दीपक हुड्डाने बडोदा क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहिलं आणि कर्णधार कृणाल पांड्याने शिवीगाळ केल्याची तसंच करिअर बरबाद करीन असे आरोप केल्याचं म्हटलं होतं. बडोदा क्रिकेट असोसिएशनने हुड्डाची ही वर्तणूक शिस्तभंग असल्याचं सांगत त्याचं संपूर्ण मोसमासाठी निलंबन केलं.

बडोद्यानं निलंबन केल्यानंतर हुड्डानं राजस्थानकडून क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. काही दिवसांपूर्वीच हुड्डाची वेस्ट इंडिज विरुद्धच्या सीरिजमध्ये निवड झाली होती. विराट कोहलीने दीपकला भारतीय संघाची कॅप दिली. दोन वनडेत हुड्डाची कामगिरी समाधानकारक झाली. टीम इंडियाकडून समाधानकारक कामगिरी केलेल्या हुड्डाला लखनऊ सुपर जायंट्सनं 5 कोटी 75 लाखांना खरेदी केलं.

विशेष म्हणजे हुड्डानंतर लखनऊनं कृणाल पांड्याला 8 कोटी 25 लाख रूपयांना खरेदी केलं.

कृणाल पंड्या, दीपक हुड्डा, लखनौ सुपरजायंट्स, बडोदा

फोटो स्रोत, RANDY BROOKS

फोटो कॅप्शन, कृणाल पंड्या

कृणाल आणि त्याचा भाऊ हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघासाठी खेळायचे. मात्र मुंबईने या दोघांनाही रिटेन केलं नाही. गुजरात टायटन्स संघाने हार्दिकला कर्णधार म्हणून नियुक्त केलं. लखनौने कृणालला ताफ्यात समाविष्ट केलं. हुड्डा संघात असताना कृणालसाठी बोली लावणाऱ्या लखनौ संघाच्या पदाधिकाऱ्यांना पाहून क्रिकेटरसिकांना आश्चर्य वाटलं.

दीपकने काही दिवसांपूर्वीच भारतीय संघासाठी वनडे पदार्पण केलं. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये बडोद्यासाठी खेळताना 46 सामन्यांमध्ये 42.76च्या सरासरीने 2908 धावा केल्या आहेत. दीपकने बॉलिंग करताना 20 विकेट्सही घेतल्या आहेत. पल्लेदार फटकेबाजी करणारा अष्टपैलू खेळाडू अशी दीपकची ओळख आहे.

आयपीएल स्पर्धेत दीपक 2014-2015 या कालावधीत राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळला. त्यानंतर तीन वर्ष तो सनरायझर्स हैदराबाद संघात होता. 2020-21 या दोन हंगामात तो पंजाब किंग्ज संघाकडून खेळला.

कृणालने 5 वनडे आणि 19 ट्वेन्टी20 स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. धावा रोखणं आणि विकेट्स पटकावणं या दोन्ही आघाड्यांवर तरबेज कृणालने आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघासाठी खेळताना चमकदार कामगिरी केली.

लिलावात मुंबई इंडियन्स संघ कृणालला पुन्हा ताफ्यात समाविष्ट करेल असं चाहत्यांना वाटत होतं. मात्र तसं झालं नाही. लखनौ सुपरजायंट्स संघाने कृणालला खरेदी करण्यासाठी जोरदार बोली लावत आगेकूच केली.

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये कृणाल बडोदा संघाकडून खेळतो. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे बडोदा संघाचं नेतृत्वही त्याच्याकडे सोपवण्यात आलं.

अश्विनने बटलरला मंकडेड आऊट केलं आणि...

2019 आयपीएल हंगामात पंजाब आणि राजस्थान यांच्यात जयपूर इथे सामना होता. सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर किंग्ज इलेव्हन पंजाबच्या बॉलर्सची यथेच्छ धुलाई करत होता.

किंग्ज इलेव्हन पंजाबने सुरूवातीला बॅटिंग करताना 184 धावांची मजल मारली होती. या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 12.4 ओव्हर्समध्ये 1 बाद 108 अशा सुस्थितीत होता. त्याक्षणी राजस्थानला जिंकण्यासाठी 7.2 ओव्हर्समध्ये म्हणजेच 43 चेंडूत 77 रन्स हव्या होत्या. हे करण्यासाठी त्यांच्या हातात ९ विकेट्स होत्या. विजयाचं पारडं राजस्थानच्या बाजूने झुकलेलं आहे असं चित्र होतं.

पाचव्या चेंडूवर अश्विनने रनअप सुरू केला. अंपायरच्या इथे येताच त्याने बाजूला बघितलं. त्यावेळी बटलर क्रीझच्या बाहेर असल्याचं त्याच्या लक्षात आलं. अश्विनने झटकन रनअप थांबवून बटलरला आऊट केलं.

राजस्थान रॉयल्स, जोस बटलर, रवीचंद्रन अश्विन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जोस बटलर

अश्विसनह किंग्ज इलेव्हन पंजाबच्या खेळाडूंनी अपील केलं. तू खरंच अपील करतो आहेस का? असं बटलरने अश्विनला विचारलं. अश्विन तात्काळ हो म्हणाला. तू अपील कसं करू शकतोस असं बटलरने विचारलं. त्यावर इट्स माय स्पेस असं अश्विनने प्रत्युत्तर दिलं. अश्विनने मंकडेड आऊट केल्याने बटलर नाराज झाला.

मैदानावरील अंपायर्सनी निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला. अश्विनने बेल्स उडवल्या त्यावेळी बटलर क्रीझमध्ये नसल्याचं स्पष्ट होताच थर्ड अंपायर ब्रुस ऑक्सनफर्ड यांनी बटलर बाद असल्याचा निर्णय दिला. नाराजी व्यक्त करत बटलर पॅव्हेलियनमध्ये परतला. बटलरने 43 चेंडूत 10 फोर आणि 2 सिक्सेससह 69 धावांची खेळी केली.

उत्तम सूर गवसलेला बटलर बाद होताच राजस्थान रॉयल्सची लय बिघडली. बटलर पिचवर असताना रनरेटचं आव्हान वाढतच होतं मात्र विकेट हातात असल्यामुळे बटलर राजस्थानला मॅच काढून देईल असं चित्र होतं. बटलर आऊट झाला आणि राजस्थानची घसरगुंडी उडाली.

राजस्थानला 20 ओव्हर्समध्ये 170 धावाच करता आल्या आणि किंग्ज इलेव्हन पंजाबने 14 रन्सने थरारक विजय मिळवला.

अश्विनचं काय म्हणणं होतं?

युक्तिवाद करण्याचा प्रश्नच नाही. मी जे केलं ती प्रतिक्षिप्त क्रिया होती. मी जेमतेम रनअपला सुरुवात केली होती, त्याचवेळी त्याने क्रीझ सोडलं होतं. त्यामुळे आऊट करणं साहजिक होतं. तो माझ्याकडे बघत देखील नव्हता. तो सहज क्रीझ सोडून पुढे गेला होता.

सोशल मीडियावर याप्रकरणाची जोरदार चर्चा झाली. मंकडेड हा आऊट करण्याचा प्रकार असावा का, तो स्पिरीट ऑफ द गेमला धरून आहे का यावरही बोललं गेलं. जोस बटलरने याप्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली होती.

मंकडेड म्हणजे बॉलर बॉलिंग रनअपमध्ये असताना नॉन स्ट्रायकर बॅट्समन क्रीझबाहेर असेल तर बॉलर त्याला आऊट करू शकतो.

मंकडेड पद्धतीने आऊट केल्याने अश्विनवर टीकाही झाली होती. त्या हंगामानंतर पंजाब संघाने अश्विनला केवळ कर्णधारपदावरून नव्हे तर संघातूनही वगळलं. अश्विन मागचे दोन हंगाम दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळला.

लिलावानंतर अश्विन-बटलर

राजस्थान रॉयल्सने अश्विनला संघात घेताच सोशल मीडियावर मीम्स, कोट्या, विनोद यांना उधाण आलं. काही वेळातच अश्विन आणि बटलर दोघांनीही व्हीडिओ शेअर केले.

बटलरबरोबर खेळण्यासाठी उत्सुक आहे असं अश्विन म्हणाला तर अश्विनबरोबर खेळायला आतूर आहे, यावेळी मी क्रीझमध्ये अशी मजेशीर कोटी बटलरने केली.

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)