You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अनिरा कबीरः 'विद्यार्थ्यांकडे कामुक नजरेने पाहणार नाही, याचा काय भरवसा?' तृतीयपंथी शिक्षिकेला विचारलेला प्रश्न
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अनिरा कबीर नोकरीसाठी इंटरव्ह्यू द्यायला गेल्या होत्या. गेल्या दोन महिन्यांतला हा त्यांचा 14वा इंटरव्ह्यू होता.
अनिरा यांनी टोपी आणि मास्क परिधान केला होता. त्यामुळं त्यांच्या चेहऱ्याचा जास्त भाग झाकलेला होता.
35 वर्षांच्या अनिरा ट्रान्सजेंडर महिला आहेत. ट्रान्सजेंडर महिलांना मिळणाऱ्या वागणुकीमुळे त्यांनी असं केलं होतं. यापूर्वीही अनिरा यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता.
अनिरा यांना दक्षिण भारतातील राज्य केरळच्या एका सरकारी शाळेमध्ये तात्पुरत्या स्वरुपाची नोकरी मिळाली होती. पण दोन महिन्यांपेक्षाही कमी काळातच त्यांना चुकीच्या पद्धतीनं काढून टाकण्यात आलं.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. जिल्हाधिकारी पी. कृष्णन यांनी सांगितलं की, अनिरा कबीर यांना काढून टाकण्यात आलेलं नाही, तर त्यांनी गोष्टींचा चुकीचा अर्थ लावला आहे, असं मुख्याध्यापकांनी त्यांना सांगितलं.
अनिरा कबीर यांनी जानेवारीमध्ये सरकारकडे मदत मिळण्यासाठी संपर्क केला होता. इच्छामृत्यूसाठी याचिका दाखल करण्यासाठी त्यांना एक वकील हवा होता. "मला केवळ माझा उदरनिर्वाह चालवायचा आहे. पण तेही अशक्य झालं आहे," असं अनिरा म्हणाल्या.
अनिरा कबीर यांनी अशा देशांबाबत वाचलं होतं जिथं इच्छामृत्यूला परवानगी आहे. पण भारतात केवळ पॅसिव्ह युथनेसिया (इच्छामृत्यू)ची परवानगी आहे.
पॅसिव्ह युथनेसियाचा अर्थ म्हणजे, अशा आजाराने पीडित असलेला व्यक्ती ज्याला वाचवता येणार नाही, तसंच तो व्हेंटिलेटर किंवा फिडिंग ट्यूबच्या आधारे जिवंत असायला हवा. असा परिस्थितीत लाइफ सपोर्ट हटवण्याबाबत किंवा ते सुरू ठेवण्याबाबत वाद होतो. अशावेळी रुग्णाकडे ते हटवण्याची सहमती देण्याचा अधिकार असतो. त्यालाच पॅसिव्ह युथनेसिया म्हणतात.
''इच्छामृत्यूसाठी कायद्याने परवानगी मिळणार नाही, हे मला माहिती आहे. पण मला या प्रकरणात एक संदेश द्यायचा होता," असं अनिरा म्हणाल्या.
अनिरा यांचा संघर्ष
या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधलं जावं असं अनिरा यांना वाटत होतं. त्यात त्यांना यशही मिळालं. सरकारनं यावर तत्काळ प्रतिक्रिया दिली आणि अनिरा यांना दुसरी नोकरी मिळाली.
अनिरा यांचा विचार अगदी स्पष्ट होता. त्यांना जीवन संपवायचं नव्हतं. त्यांनी जे केलं ते इतरांसाठी प्रेरणा बनलं. त्याबरोबरच अशा प्रकारचा विरोध करणं ही भारतात सर्वसामान्य बाब नाही.
अनेक वर्षांपासून भारतीय लोक न्याय आणि यंत्रणेत बदलासाठी उपोषण, अनेक दिवस कमरेपर्यंत पाण्यात उभं राहणं, जीवंत उंदीर तोंडानं पकडणं अशी आंदोलनं करतात.
सामाजिक शास्त्रज्ञांच्या मते, महात्मा गांधींच्या अहिंसात्मक सविनय कायदेभंगाच्या आंदोलनामध्ये दीर्घकाळ उपोषणाचाही समावेश होता. पण भारतासारख्या देशातील सरकारं त्याची उपेक्षा करतात. अनघा इंगोला हैदराबाद विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र शिकवतात. सरकारला त्यांनी दिलेली वचनं पाळण्यात यश आलं नाही, हे सांगणं हा अनिरा कबीर यांचा इरादा असल्याचं त्या म्हणाल्या.
"या प्रकरणात सरकारला कोणाच्याही काम करण्याच्या अधिकारांचं रक्षण करण्यात यश आलेलं नाही," असं त्या म्हणाल्या. इंगोला यांनी सामाजिक भेदभावाबाबत अनेक कामं केली आहेत.
एका अंदाजानुसार भारतात सुमारे 20 लाख ट्रान्सजेंडर आहेत. ट्रान्सजेंडर्सच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांच्या मते, ही संख्या आणखी जास्त आहे. 2014 मध्ये भारताच्या सुप्रीम कोर्टानं ट्रान्सजेंडर्सचे अधिकारही इतरांसारखेच असल्याचं एका आदेशात म्हटलं होतं.
मात्र, भारतात अजूनही ट्रान्सजेंडर शिक्षण आणि आरोग्यसारख्या सुविधांसाठी संघर्ष करत आहेत. त्यापैकी बहुतांश हे भिकारी किंवा वेश्या व्यवसायाकडं वळले आहेत.
ट्रान्सजेंडर समुदायाला राजकीय प्रतिनिधित्व आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची गरज आहे, अनिरा कबीर म्हणतात.
"मला कधीही इच्छामृत्युसारखं पाऊल उचलण्याची इच्छा नव्हती. पण आमच्याकडे दुसरा काय पर्याय आहे?" असंही त्या म्हणाल्या. सेंट्रल केरळच्या पलक्कड जिल्ह्यात लहानाच्या मोठ्या झालेल्या अनिरा कबीर यांनी, जन्माच्या आधारावर जी लैंगिक ओळख मिळाली आहे, त्याबाबत अनेक वर्षांपासून संघर्ष करत असल्याचं म्हटलं आहे.
सरकार झुकलं
अनिरा यांना कुटुंबीयांशी बोलण्याची इच्छा नाही. नुकतंच त्यांच्या भावाचं निधन झालं असून, अजून कुटुंब त्यातून सावरलेलं नाही, असं त्या म्हणतात.
अनिरा यांनी पलक्कड जिल्ह्यात इतरही ट्रान्सजेंडरचा शोध सुरू केला तेव्हा त्या किशोरवयीनच होत्या. पण याच प्रयत्नात त्यांना अटक झाली आणि तेव्हापासून त्यांनी ते करणं बंद केलं.
एका वृत्तपत्रामध्ये ट्रान्सजेंडर लोकांचा फोटो पाहून त्या बंगळुरूच्या घरून पळून गेल्या होत्या. त्याचवेळी त्यांचा संपर्क ट्रान्सजेंडर समुदायाशी आला होता. पण त्यांच्या जीवनातील संघर्ष कधीही कमी झाला नाही. ट्रान्सजेंडर समुदायातील बहुतांश लोक अनेक वर्षांपर्यंत जेंडर रिअसाइनमेंट सर्जरीसाठीही भीक मागत पैसे गोळा करत असतात. पण कबीर जेव्हा घरी परत आल्या तेव्हा त्या प्रचंड निराश होत्या.
"माझ्या कुटुंबाची इच्छा होती, तसं जगण्याचा मी खूप प्रयत्न केला," असं त्या म्हणाल्या.
"माझ्या आसपासचे लोक म्हणाले की, सिगरेट ओढणं, जिमला जाणं किंवा व्यक्तीमत्त्वं विकास अशा गोष्टींनी त्यांच्यात पुरुषीपणा येईल," असं अनिरा सांगतात. पण हा सर्व दिखावा करून त्यांनी स्वतःला दुःख दिलं नाही.
अनिरा कबीर यांनी अत्यंत संघर्ष करत शिक्षण पूर्ण केलं. त्यांना लहान मुलांना शिकवायला आवडत होतं. त्या विद्यार्थी होत्या तेव्हाही त्या मुलांना शिकवत होत्या. त्या शेजारच्या मुलांना शिकवत होत्या. घर सोडल्यानंतरही त्या मनासारखं जीवन जगण्यासाठी संघर्ष करत राहिल्या.
अनिरा कबीर यांच्याकडे तीन मास्टर्स पदव्या आहेत. एक शिक्षण क्षेत्रातली पदवीही आहे. माध्यमिक शाळेतील मुलांना शिकवण्यासाठीची एक परीक्षाही त्या उत्तीर्ण झाल्या होत्या. पण मुलाखतीत त्यांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारले जात होते.
विद्यार्थ्यांकडे कामुक नजरेने पाहणार नाही, याचा काय भरवसा असंही त्यांना एका इंटरव्हयूमध्ये विचारण्यात आलं होतं.
"मी नोकरीसाठीची परीक्षा उत्तीर्ण झाली होते. त्यासाठी मी पात्रही होते," असं अनिरा म्हणाल्या. त्यांची नियुक्ती सामाजिक शास्त्राच्या ज्युनियर शिक्षक पदावर झाली होती. हे पदही कायमस्वरुपी नव्हतं. त्यांनी शाळेतील एका अधिकाऱ्याला त्या ट्रान्सजेंडर असल्याचं सांगितलं होतं.
"मी त्यांना ट्रान्सवुमन असल्याचं सांगितलं होतं. तसंच मुलाखतीत अशाप्रकारे येण्यासाठी माफीही मागितली होती. मी त्यांना सांगितलं होतं की, नोकरी नसेल तर मला घराचं भाडंही चुकवता येणार नाही."
अनिरा यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये शिकवायला सुरुवात केली तेव्हा त्यांना सहकाऱ्यांकडून अपमान सहन करावा लागला. पण त्याठिकाणचे विद्यार्थी चांगले होते. " मला अचानक 6 जानेवारीपासून शाळेत यायचं नाही असं सांगण्यात आलं. मला नोकरीवरून काढण्यात आलं होतं. ते नियमाच्या विरोधात होतं," असं अनिरा सांगतात.
नोकरी गमावल्यानं अनिरा एकदम घाबरल्या होत्या. त्या शाळेच्या जवळ असलेल्या दुकानांमध्ये गेल्या. त्याठिकाणी त्यांना सेल्सपर्सनचं काम मागितलं. पण त्यांना काम मिळालं नाही.
यादरम्यान त्यांनी कायदेशीर मदत मागितली. ती बातमी व्हायरल झाली आणि केरळच्या शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ यावर प्रतिक्रिया दिली. "मी कबीर यांची भेट घेतली आहे. त्यांनी पलक्कडमधील एका सरकारी कार्यालयात दुसरी तात्पुरती नोकरी सुरू केली आहे," असं त्यांनी स्पष्ट केलं.
मात्र, अनिरा यांच्यासारखे इतर अनेकजण अजूनही मदत मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
न्यायासाठी मोठी रांग
2018 मध्ये शानवी पोन्नुसामी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहिलं होतं. त्यांनी इच्छामृत्यूला परवानगी देण्याची मागणी केली होती. गेल्यावर्षी त्यांनी सुप्रीम कोर्टात त्यासाठी याचिका दाखल केली होती.
त्यांना एअर इंडियामध्ये नोकरी देण्यास नकार देण्यात आला होता, असा आरोप त्यांनी केला होता.
एअर इंडियामध्ये ट्रान्सजेंडर स्टाफच्या नियुक्तीसाठी काहीही धोरण नव्हतं. अनेक महिने सरकार आणि एअर इंडियानं या याचिकेवर उत्तर दिलं नव्हतं. नंतर एअर इंडियानं शानवी यांची याचिका खोटी असल्याचं सांगत, अब्रुनुकसानीचा दावा केला होता.
हे प्रकरण न्यायालयात सुरू राहिलं आणि त्यांची संपूर्ण सेव्हिंग त्यात खर्च झाली. नंतर त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहिलं होतं. यानंतर काय बदललं असं विचारलं असता, " काहीही नाही. काहीही उत्तर मिळालं नाही. त्यात एअर इंडियाला आता टाटा या खासगी कंपनीनं खरेदी केलं आहे. त्यामुळं नोकरीची शक्यता आणखी कमी झाली आहे," असं त्या म्हणाल्या.
मात्र, शानवी यांनी मद्रास हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे. कायदेशीर लढा देताना झालेला खर्च मिळण्याची मागणी त्यांनी केली आहे. "अशा प्रकारची यंत्रणा असेल तर लोक जीवन कसं जगतील", असं त्या म्हणाल्या.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)