जितेंद्र आव्हाडांचं मुंब्रावासियांना आवाहन, माझं 'हे' भाषण यूपीत व्हॉट्सअॅपवरून व्हायरल करा #5मोठ्याबातम्या

जितेंद्र आव्हाड

फोटो स्रोत, Facebook/Jitendra Awhad

फोटो कॅप्शन, जितेंद्र आव्हाड
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1. माझं 'हे' भाषण यूपीत व्हायरल करा, जितेंद्र आव्हाडांचं मुंब्रावासियांना आवाहन

भारताच्या उत्तरेत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुकांवर देशभरातून प्रतिक्रिया उमटत असतात. राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही यूपीच्या राजकारणावर भाष्य केलंय. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय.

"उत्तर प्रदेशची निवडणूक साधीसुधी नाही. ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे. त्यामुळे ही निवडणूक गांभीर्यानं घ्या. कोणीही गाफिल राहू नका. तुम्ही आज जे ठरवणार, तेच तुमचं भविष्य असणार आहे," असं म्हणत आव्हाड पुढे म्हणाले, तुमचं भविष्यच जर बिघडणार असेल तर भाजपला संपवून टाका.

यानंतर आव्हाडांनी मुंब्रावासियांना आवाहन केलं की, "माझं हे भाषण उत्तर प्रदेशात व्हॉट्सअॅपवरून व्हायरल करा."

"माझ्यावर बुलंदशहरमधील उमेदवाराची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मी उत्तर प्रदेशात जाऊन भाजपा विरोधात प्रचार करणार आहे," असं आव्हाडांनी सांगितलं.

तसंच, "काही जण भाजपाची सुपारी घेऊन उत्तर प्रदेशात उभे आहेत. मतदारांमध्ये फूट पाडण्यासाठी खेळी सुरू आहे. त्यापासून सावध राहा. स्वतःची अक्कल लावा. मत कोणाला दिले पाहिजे, हे तुम्ही ठरवा," असंही ते म्हणाले.

2. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होणार नाही - संजय राऊत

"महाराष्ट्रात पुढील 25 ते 30 वर्ष तरी भाजपाची सत्ता येणार नाही. त्यामुळे काही झालं तरी महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री होणार नाही," असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.

संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, संजय राऊत

संजय राऊत पुढे म्हणाले, "भाजप जागतिक स्तरावरचा आहे. उद्या ब्रिटनचा पंतप्रधान त्यांचा माणूस होईल, व्हाईट हाऊसमध्ये त्यांचा पंतप्रधान असेल."

मात्र, महाविकास आघाडी हेच या महाराष्ट्राचे भविष्य आहे, असं राऊत म्हणाले.

जे वैफल्यग्रस्त असतात, निराश मनाने राजकारण करतात त्यांच्या नशिबी शेवटपर्यंत निराशाच असते, असाही टोला राऊतांनी लगावला.

3. औरंगाबादमध्ये वाईन बार सुरू झाल्यास तोडफोड करू - जलील

किराणा दुकानात वाईन विक्रीच्या सरकारच्या निर्णयावर एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केलीय. दुकानांमधून वाईन विक्री सुरू झाल्यास तोडफोड करण्याचा इशारा जलील यांनी दिलाय. सकाळ वृत्तपत्रानं ही बातमी प्रसिद्ध केलीय.

सरकारच्या निर्णयाचा एमआयएम निषेध करत असल्याचं सांगत जलील म्हणाले की, म्ही निषेध नोंदवत आता थेट दुकाने फोडून टाकू.

इम्तियाज जलील

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, इम्तियाज जलील

"शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे राज्य सरकार सांगते, तर मग शेतकऱ्यांना गांजा व चरस हे उत्पादन घेण्यासाठी परवानगी द्यावी," असं जलील म्हणाले.

तसंच, वाईनऐवजी दुधाला महत्व देण्याची मागणी त्यांनी केली.

4. 'पुढच्या 7 दिवसात नवाब मलिकांविरोधात FIR दाखल करा'

आयआरएस समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे (NCSC) केलेल्या तक्रारीनंतर NCSC ने महाराष्ट्र पोलिसांना आदेश दिलेत की, पुढच्या 7 दिवसात नवाब मलिकांविरोधात FIR दाखल करा. आज तकनं ही बातमी दिलीय.

समीर वानखेडे हे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये मुंबई विभागीय अधिकारी होते. अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेनंतर मलिकांनी वानखेडेंवर विविध आरोप केले होते. त्यात एक मुद्दा वानखेडेंच्या जातीचाही होता.

जातीचं खोटं प्रमाणपत्र बनवल्याचा आरोप मलिकांनी वानखेडेंवर केला होता.

सोशल मीडियावरील फोटो, पोस्ट यांद्वारे आपल्याला त्रास दिल्याचा आरोप वानखेडेंनी केला होता आणि तशी तक्रार NCSC कडे केली होती. त्यानंतर NCSC ने महाराष्ट्र पोलिसांना हे आदेश दिले आहेत.

5. ममता बॅनर्जींनी ट्विटरवर राज्यपालांनाच ब्लॉक केलं...

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल जगदीप धनखर यांच्यातील वाद संपता संपत नाहीय. सोमवारी, 31 जानेवारी रोजी ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांना ट्विटरवर ब्लॉक केलं. त्यानंतर राज्यपालांनी ट्वीट करत ममता बॅनर्जींना व्हॉट्सअॅपवर केलेले मेसेज पोस्ट केले. इंडिया टूडेने ही बातमी दिलीय.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

ममता बॅनर्जी यांना याबद्दल विचारले असता, त्या म्हणाल्या, "ते रोज काहीतरी आरोप करणारे ट्वीट करत असतात. अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरण मागत असतात. त्यांना काढून टाकण्यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार पत्रे पाठवली आहेत. त्यांना नेमताना माझ्याशी सल्लामसलत करण्यात आली नव्हती."

ममता बॅनर्जी आणि राज्यपालांमधील वाद आता सोशल मीडियावर आल्यानं पुढे काय होतंय, हे पाहणं महत्वाचं ठरेल.

दुसरीकडे, पश्चिम बंगालमधील लोकशाही वाचवण्यासाठी राज्यपालांना हटवावं, अशी मागणी तृणमूलचे खासदार सुदीप बंडोपाध्याय यांना केलीय.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)