You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Goa Election : अमित शहा म्हणतात, 'गांधी कुटुंबीयांसाठी गोवा हे सुट्टी एन्जॉय करण्याचं ठिकाण' #5मोठ्याबातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा...
1.गांधी कुटुंबीयांसाठी गोवा हे सुट्टी एन्जॉय करण्याचं ठिकाण-अमित शहा
"भाजपाने गोव्याचा विकास केला. गांधी परिवारासाठी गोवा फक्त सुट्टी एन्जॉय करण्याचं ठिकाण आहे," अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यात बोलताना केली. गोवा विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी शहा खुद्द गोव्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, "भाजपासाठी गोवा म्हणजे गोल्डन गोवा. पण काँग्रेससाठी गोवा म्हणजे गांधी परिवाराचा गोवा. आम्ही राज्याचं बजेट 432 कोटींहून 2,567 कोटींवर आणलं आहे." 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
"माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी गोव्याच्या विकासासाठी काहीही केलं नाही. भाजपाने मात्र दिलेला शब्द पाळला. त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कामाचं कौतुकही केलं. ते म्हणाले, गोव्याचे मुख्यमंत्री सावंतजी, मनोहर पर्रिकरांच्या गोल्डन गोव्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी खूप कष्ट घेत आहेत", असं शहा म्हणाले.
"गोव्यातला लसीकरणाचा वेग देशात सर्वाधिक आहे. प्रमोद सावंत यांच्या कार्यकाळात सर्वाधिक वेगाने 100 टक्के लसीकरणाचं लक्ष गाठण्यात गोवा यशस्वी ठरला आहे", असं शहा म्हणाले.
2.ज्याला घ्यायची आहे तो कुठेही जाऊन घेणारच, भुजबळांकडून वाईन विक्रीचं समर्थन
"मध्य प्रदेशात भाजपाचं सरकार आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर मद्य घरात ठेवायला परवानगी दिली आहे. बार उघडायला परवानगी दिली आहे. आख्ख्या जगाने वाईनला हेल्थ फूड म्हणून मंजुरी दिली आहे. त्यात शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल. ज्याला घ्यायची आहे, तो कुठेही जाऊन घेणारच आहे. त्यामुळे उगीच साप साप म्हणून भुई थोपटण्याचं काम आहे. काहीतरी विषय काढून त्याच्यावर आंदोलन करायचं हे काही बरोबर आहे असं मला वाटत नाही," असं राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. 'आपलं महानगर'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
राज्यात सुपर मार्केटमध्ये तसंच किराणा दुकानाच वाईन विक्रीला परवानगी देण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
3.वाईनरी कंपनीत संचालक असणं गुन्हा आहे का? राऊंताचा सोमय्यांना सवाल
"ते (किरीट सोमय्या) म्हणतायत त्याप्रमाणे आमची जर एखादी वायनरी असेल, तर ती त्यांनी ताब्यात घ्यावी आणि स्वत: चालवावी. एखाद्या कुटुंबातली कुणी व्यक्ती व्यवसाय करत असेल, तर तो काही गुन्हा आहे का? बँकांना लुबाडणं, चोऱ्या-माऱ्या करणं यापेक्षा कष्ट करणं कधीही चांगलं. पण भाजपाचे थोतांडी लोकं जे काही म्हणत आहेत, अशा काही वायनरीज आमच्या कुटुंबाच्या असतील तर नक्कीच मी त्यांच्या नावावर करून द्यायला तयार आहे," असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.
"संजय राऊत परिवाराने काही महिन्यांपूर्वी वाईन व्यवसायातल्या एका मोठ्या उद्योगपतीसोबत व्यवसायात भागिदारी सुरू केली. 16 एप्रिल 2021 रोजी संजय राऊत यांनी अशोक गर्ग यांच्या वाईन उत्पादन ग्रुपसोबत करार केला. त्यांच्या दोन्ही मुली विदिता, उर्वशी या कंपन्यांमध्ये पार्टनर झाल्या", असा आरोप किरीट सोमय्यांनी केला.
किरीट सोमय्यांची मुलं चणे-शेंगदाणे विकतात का? अमित शाह यांचा मुलगा केळी, सफरचंद, ढोकळा विकतो का? असा उलट सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर केलेल्या आरोपांना आता संजय राऊतांनी उत्तर दिलं आहे.
4.संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज, सोमवारपासून सुरुवात होत असून, 'पेगॅसस' हेरगिरी तंत्रज्ञानाच्या खरेदीवरून दोन्ही सभागृहांमधील कामकाज पुन्हा वादळी ठरण्याची शक्यता आहे. इस्रायलशी झालेल्या शस्त्रात्र खरेदी करारामध्ये 'पेगॅसस' तंत्रज्ञान खरेदीचाही समावेश असल्याच्या 'न्यूयॉर्क टाइम्स'च्या वृत्तातील दाव्यामुळे नवा वाद उफाळला आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतले जात असून, गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अधिवेशनाचे कामकाज दोन सत्रांमध्ये होईल. 2 ते 11 फेब्रुवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धातील सभागृहांचे कामकाज प्रत्येकी पाच तास होणार आहे. 'सामना'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
राज्यसभेचे कामकाज सकाळी 9 ते दुपारी 2 आणि लोकसभेचे कामकाज दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत चालेल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर सोमवारी, 31 जानेवारी रोजी आर्थिक पाहणी अहवाल संसदेत मांडला जाईल. 1फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील.
5.अश्लील भाषेत व्हीडिओ करणाऱ्या मुलीला पुण्यात अटक
इन्स्टाग्रामवर अश्लील भाषा आणि धमकीचे व्हीडिओ पोस्ट करणाऱ्या तरुणींना पिंपरी-चिंचवडच्या पोलिसांनी अटक केली आहे.
थेरगाव क्वीन या नावाने हे अकाऊंट होतं. मित्रमैत्रिणींसह अश्लील भाषेतील धमकीचे व्हीडिओ पोस्ट केल्याने तीनजणांना अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिली. 'लोकमत न्यूज18'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
माहिती तंत्रज्ञान तसंच अन्य कलमांअंतर्गत या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)