नंदुरबार: गांधीधाम-पुरी एक्सप्रेसला आग; दोन डबे जळून खाक

नंदुरबार रेल्वे स्थानकावरून सुटलेल्या गांधीधाम-पुरी एक्सप्रेसच्या दोन डब्यांना आग लागल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये.
या आगीत रेल्वेच्या 2 बोगींचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे या मार्गावरील एकूण 5 गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी थांबवण्यात आल्या आहेत.
नंदुरबार रेल्वे स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर गाडी असताना एक्सप्रेसमधील पॅन्ट्रीच्या डब्यात अचानक आग लागली. आग लागल्याचं कळताच ट्रेन तात्काळ थांबवण्यात आली.
त्यानंतर रेल्वेतील प्रवाशी तात्काळ गाडीतून बाहेर पडले. सुरुवातीला ट्रेनमधील पॅन्ट्रीच्या डब्याला ही आग लागली. आग तात्काळ वेगाने पसरली आणि शेजारील दोन डब्यांना आग लागली.

आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आग लागलेला डबा इतर गाडीपासून वेगळा करुन आग विझवण्याचं काम सुरू केलं.
ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळू शकली नसून घटनास्थळी नंदुरबार अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम मोठ्या वेगाने सुरू आहे.

नंदुरबार रेल्वे स्टेशनचे विद्युत अभियंता नीरज निराला यांनी माहिती दिली की, "आम्हाला संदेश प्राप्त झाला की गांधीधाम-पुरी ट्रेनला आग लागली आहे. आम्ही घटनास्थळी धाव घेत रेल्वेचा ओवरहेड विद्युत पुरवठा बंद केला. कारण पाणी मारत असताना विद्युत प्रवाह पसरण्याची शकयात होती. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी मदत केली."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























