मास्कची सक्ती उठवणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार? #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.
1. मास्क मुक्तीचा निर्णय घेणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार?
महाराष्ट्र 'मास्कमुक्त' होणार का? असा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे गुरुवारी (27 जानेवारी) पार पडलेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली.
कोरोना प्रतिबंध लसीकरण मोठ्या संख्येने पूर्ण केलेल्या अनेक देशांमध्ये मास्क घालण्याचे बंधंन काढून टाकण्यात आले आहे. तसंच त्याठिकाणी अनेक निर्बंधही उठवण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही मास्क लावण्याचा नियम शिथिल करण्यात येऊ शकतो अशी चर्चा मंत्रीमंडळाच्या बैठकीत झाल्याचं समजतं.
यासंदर्भात कोव्हिड टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतरच अंतिम धोरण ठरवलं जाणार आहे. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
लसीकरण झालले्या नागरिकांना मास्क घालण्याचे बंधन नाही असा निर्णय घेणारा इस्रायल हा पहिला देश ठरला. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर त्यांनीही पुन्हा मास्क लावण्याचा नियम लागू केला.
आतापर्यंत मास्क घालण्याची सक्ती उठवलेल्या देशांमध्ये ब्रिटन , अमेरिका, स्वीडन, चीन, न्यूझीलंड, हंगेरी, इटली यांचा समावेश आहे.
दरम्यान, भारतात अद्याप केंद्र सरकार किंवा कोणत्याही इतर राज्याने 'मास्कमुक्ती'चा निर्णय घेतलेला नाही.
2. 'जय पवार यांचे कारनामे उघड करणार' किरीट सोमय्यांच्या या इशाऱ्यावर अजित पवार काय म्हणाले?
भाजपचे माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांच्यावर आरोप केले आहेत.

फोटो स्रोत, Hindustan Times
अजित पवार यांची 1055 कोटींची बेनामी संपत्ती जप्त केली आहे. आता जय पवार यांचे कारनामे उघड करणार. त्यांना तुरुंगात जावे लागेल असं वादग्रस्त विधान किरीट सोमय्या यांनी केलं आहे.
याला प्रत्युत्तर देत अजित पवार यांनी कायदा सर्वश्रष्ठ असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होते. पण काही जण केवळ वक्तव्य करतात. त्यांना महत्त्व देण्याची गरज नाही असं म्हटलं आहे.
केवळ आरोप करणारे उद्या कोणाचंही नाव घेतील आणि तुम्ही प्रश्न विचारणार हे योग्य नाही असंही ते म्हणाले. टिव्ही 9 ने हे वृत्त दिलं आहे.
3. टिपू सुलतान 'टायगर ऑफ म्हैसूर', नामकरणाच्या वादात एमआयएमची उडी
मुंबईत मालाड येथे एका मैदानाला टिपू सुलतान नाव दिल्याने राजकारण तापलं आहे. काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी या मैदानाचे नामकरण टिपू सुलतान असे केल्यानंतर भाजपने याला तीव्र विरोध दर्शवला होता. या वादात आता एमआयएमनेही उडी घेतली आहे.

फोटो स्रोत, facebook
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले, "ज्या टिपू सुलतानने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, तो देशगौरव होऊ शकत नाही. त्याचे नाव मैदानाला देणे सर्वथा गैर आहे. आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही. हा निर्णय रद्द झाला पाहिजे."
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी फडणवीसांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे. केवळ मुस्लीम नावाला विरोध आहे असा आरोप त्यांनी केला आहे. टिपू सुलतान यांना 'मिसाईल मॅन','टायगर ऑफ म्हैसूर' म्हणून ओळखलं जातं असंही इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
भाजपच्या विरोधात औरंगाबादमध्ये एमआयएमने नुकतेच याविरोधात आंदोलन केलं. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.
4. 'हिटलरचा बाप' हॅशटॅग वापरून जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?
रेल्वे परीक्षांच्या निकालावरून उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाच्या निमित्ताने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पाटणा येथील 'भिखना पहाडी' परिसरात पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ उडाला. संतप्त विद्यार्थ्यांनी रेल्वेच्या डब्याला आग लावली. यामुळे बिहार आणि नंतर उत्तर प्रदेशात आंदोलन तीव्र झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्वीट करत 'हिटलरचा बाप' असं हॅशटॅग वापरलं आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
ते म्हणाले, "उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची 'संपत्ती' जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्याकडे संपत्ती असती तर ते नोकरीसाठी रस्त्यावर उतरले असते का? बहुधा त्यांची पेनं, पुस्तकं, वह्या जप्त करतील."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
आपल्या आणखी एका ट्वीटमध्ये ते म्हणाले, "आरआरबी एनटीपीसीच्या परीक्षेसाठी एकूण सीट होत्या जवळपास 38 हजार, अर्ज आले होते तब्बल सव्वा कोटी. हे भयाण वास्तव आहे देशातील रोजगारांचं. बेरोजगारीचा हा स्फोट देशात अराजक माजवू शकतो. वेळीच सावध होवून तरुणांच्या हातांना काम द्या. त्यांच्या स्वप्नांच्या सोबत खेळू नका,"
5. एअर इंडियाची मालकी घेताच टाटा ग्रुपने घेतला 'हा' निर्णय
एअर इंडियाची मालकी आता अधिकृतरित्या टाटा कंपनीकडे गेली आहे. यासंदर्भात मालकी हक्कांचं हस्तांतरण पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्यावर्षी 8 ऑक्टोबर रोजीच टाटा समूहाने 18 हजार कोटींच्या बोलीत एअर इंडियाला खरेदी केली. 2700 कोटी रुपये रोख रक्कम आणि 15300 कोटी रुपयांचा कर्ज आपल्या डोक्यावर घेत टाटानं एअर इंडियाला आपल्या ताब्यात घेतली.
एएनआयच्या वृत्तानुसार, एअर इंडियाची मालकी स्वीकारताच टाटा ग्रुपने सर्वप्रथम एअर इंडियाच्या लेटलतिफपणाला आळा घालण्याचा निर्णय घेतला आहे.
एअर इंडियाच्या विमानांचं उड्डाण वेळापत्रकानुसार होईल यासाठी टाटा ग्रुप प्राधान्य देणार आहे. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
यासोबतच एअर इंडियाच्या विमानांमध्येही काही बदल केले जाऊ शकतात अशी चर्चा आहे. विमानातील आसन व्यवस्था, केबिन क्रू पेहराव, जेवणाची गुणवत्ता याकडेही प्रामुख्याने लक्ष दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























