उद्धव ठाकरेंचा शाळा सुरू करण्याला हिरवा कंदील, सोमवारपासून सुरू होणार शाळा

ओमिक्रॉनची तिसरी लाट आल्यानंतर बंद असलेल्या राज्यभरातील शाळा सोमवारी 24 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शाळा सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या प्रस्तावाला मान्यता दिलीये.
राज्यातील प्री-प्रायमरी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रत्रकार परिषदेत माहिती दिली.
गेल्या दोन वर्षांपासून मुलांच्या शाळा नियमितपणे सुरू नाहीत, त्यांची अभ्यासाची सवय तुटली आहे तेव्हा शाळा सुरू करण्यात याव्यात अशी मागणी पालक करत होते. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
सोमवारपासून सुरू होणार शाळा
मुंबई आणि महाराष्ट्रात ओमिक्रॉनची तिसरी लाट डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पसरण्यास सुरूवात झाली. कोरोनाचे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून उद्धव ठाकरे सरकारने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, "सोमवारपासून राज्यभरातील शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी संमती दिलीये," येत्या 24 जानेवारीपासून महाराष्ट्रातील प्री-प्रायमरी ते बारावी शाळा सुरू होतील.
कोरोना संसर्ग पसरल्यापासून राज्य सरकारने पहिल्यांदाच प्री-प्रायमरी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय.
त्या पुढे सांगतात, "प्रत्येक भागातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत." एका महापालिलेने निर्णय घेतला म्हणजे सर्वांनी तो फॉलो करावा असं नाही. अधिकाऱ्यांनी त्यांच्या भागातील परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा.

फोटो स्रोत, Getty Images
शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने याआधीच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचना पुन्हा शाळा सुरू करताना कायम असतील.
शिक्षणमंत्री पुढे म्हणाल्या, "मुलांना शाळेत येण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल. कोणाचंही शिक्षण थांबू नये ही आमची भूमिका आहे."
बुधवारी शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्र्यांकडे शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव पाठवला होता.
लहान मुलांच्या टास्कफोर्सनेही शाळा सुरू कराव्यात याबाबत हिरवा कंदिल राज्य सरकारला दिला होता.
वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या, "सुरक्षेचे सर्व उपाय करूनच शाळा पुन्हा सुरू केल्या जातील."
शाळा सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती
गेल्या दोन वर्षात मुलं शाळेत गेली नाहीयेत. या मुलांच्या भविष्याचा विचार करून शाळा सुरू करण्याबाबत मागणी जोर धरू लागली होती.
गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचं शिक्षणतज्ज्ञांचं म्हणणं आहे. सातत्याने शाळा बंद असल्याने दोन पिढ्यांच नुकसान झाल्याचं देखील ते सांगतात. त्यामुळे सरसकट शाळा बंद करू नयेत असं शिक्षणतज्ज्ञांचं मत आहे.
'मेस्टा' (महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशन) या संघटनेने 17 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शाळा सुरू करण्याबाबत पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी 700 दिवस शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचं किती नुकसान झाले आहे हे नमूद केले आहे.
महाराष्ट्रात ओमिक्रॉनची तिसरी लाट पसरतेय. पण ही लाट सौम्य दिसून येतेय. लहान मुलांना होणारा संसर्ग गंभीर नाहीये. त्यामुळे शाळा सुरू करण्यास हरकत नाही असं तज्ज्ञांचं मत आहे.
मुंबईतही कोरोनाचे आकडे सातत्याने कमी होताना दिसून येत आहेत.

फोटो स्रोत, facebook
मेस्टाचे सचिव विनोद कुलकर्णी बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात, "आमच्या या मागणीला पालक संघटनांचाही पाठिंबा आहे. आम्ही 16 जानेवारीला पालक आणि मुलांना शाळेत बोलवून त्यांच्याशी चर्चा केली.
"पालकांची शाळा सुरू करण्याची मागणी आहे. तशी लेखी परवानगी त्यांनी दिली आहे. त्यामुळे आम्ही शाळा सुरू करण्यावर ठाम आहोत," कुलकर्णी यांनी सांगितले.
"आम्ही पालकांच्या परवानगीनंतर राज्यातल्या काही शाळा सुरूही केल्या होत्या. पण त्यानंतर आमची आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा झाली.
20 जानेवारीला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय मांडून सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन त्यांनी दिले आहे. पण जर उद्या शाळांचा निर्णय झाला नाही तर मात्र आम्ही संस्थाचालक आणि पालक रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत," कुलकर्णी सांगतात.
मुलांच्या शाळाबाबत पालकांचे मत काय?
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्या लाटेत मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांमध्ये भीती होती. ती आता ओमिक्रॉनच्या लाटेतही कायम आहे का?
याबाबत आम्ही काही पालकाचं मत जाणून घेतलं. मुंबई शहर पालक संघटनेच्या सदस्य गायत्री सबरवाल सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
"आम्हाला अजिबात भीती वाटत नाही. ऑनलाइन शाळांमुळे मुलांच्या डोळ्यांचे विकार वाढलेले आहेत. घरात बसून मुलांची प्रगती खुंटली आहे. मैदानं खेळण्यासाठी खुली आहेत. जी मुलं पाच-सहा तास खेळण्यासाठी मैदानावर जाऊ शकतात, ती शाळेत का नाही जाऊ शकत? गेल्या दोन वर्षांपासून मुलं घरात आहेत," सबरवाल सांगतात.
"ती आमच्याबरोबर मॉल मध्ये जाऊ शकतात. बाहेर जेवायला जाऊ शकतात, फिरायला जाऊ शकतात, मग शाळेतच पाठवायची कसली भीती? कोरोनामुळे सर्वांचे आयुष्य बदललं आहे. या बदललेल्या दैनंदिन जीवनाची सवय शाळांना आणि मुलांनाही व्हायला हवी असं आमच्यातल्या 65%पालकांना वाटतं. ज्या पालकांना भीती वाटते त्यांच्यासाठी ऑनलाईन पर्यायही उपलब्ध ठेवावा," सबरवाल सांगतात.
आमच्या मुलांना अशिक्षित ठेवणार आहे का?
ग्रामीण भागातल्या शिक्षक आणि पालकांचं यापेक्षा वेगळं मत नाही. ग्रामीण भागात ओमिक्रॉनचे आकडे खूप कमी आहेत. मग सरसकट सगळ्या शाळा बंद कशाला करता? असा मतप्रवाह ग्रामीण भागातील शिक्षक आणि पालकांमध्ये आहे.

फोटो स्रोत, facebook
राज्य माध्यमिक मुख्यध्यापक संघटनेचे जे. के. पाटील सांगतात, "ज्यावेळी जानेवारीमध्ये शाळा बंद करण्याची नियमावली आली तेव्हा सरकारी नियमानुसार आम्ही शाळा बंद केल्या.
"तेव्हा अनेक पालक आमच्याशी येऊन भांडू लागले. आमच्या पोरांना अशिक्षित ठेवायचं आहे का? हा प्रश्न विचारू लागले. आम्ही त्या पालकांना समजावलं. सरकारी नियमावली असल्यामुळे आमचे हात बांधले गेले आहेत. पण शाळा सुरू केल्या पाहीजेत," पाटील सांगतात.
दौंडमधल्या खुटगावमध्ये 2000 विद्यार्थ्यांची शाळा आहे. पुणे ग्रामिणचे जर ओमिक्रॉन रुग्णांचे आकडे बघितले तर 46 रूग्ण हे सापडले आहेत आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यात 7 हजारांच्या आसपास रूग्ण आहेत. आमच्या गावांत बोटावर मोजण्याइतके रूग्ण असताना आमची शाळा का बंद करायची? असं म्हणणं शिक्षक आणि पालकांचं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























