Goa Election : संजय राऊत म्हणतात, 'आम्ही काँग्रेसकडं झोळी घेऊन उभे नाही, खिशातल्या जागा नकोत' #5मोठ्याबातम्या

Published
वाचन वेळ: 4 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :

1) आम्ही काँग्रेसकडं झोळी घेऊन उभे नाही, खिशातल्या जागा नकोत - राऊत

"आम्ही काँग्रेसकडे झोळी घेऊन उभे नाही आहोत. शिवसेना आणि राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा प्रस्ताव काँग्रेससमोर ठेवला होता. राहुल गांधी सकारात्मक आहेत, पण गोव्याच्या स्थानिक नेतृत्वाच्या डोक्यात काय आहे हे मला माहिती नाही," अशी खंत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याच्या शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या स्वप्नाला काँग्रेसनं धक्का दिलाय. काँग्रेसनं गोव्यातील उमेदवारांची दुसरी यादीही जाहीर केलीय.

त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी किंवा शिवसेनेसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट झालंय. त्यानंतर राऊतांनी हे विधान केलं. तरूण भारतनं ही बातमी दिलीय.

संजय राऊत पुढे म्हणाले, "40 पैकी 30 जागा काँग्रेसला लढण्यास आम्ही सांगितल्या आहेत. उरलेल्या 10 जागांवर मित्र पक्षांना लढण्याची संधी द्या. काँग्रेस गेल्या 50 वर्षात ज्या जागा जिंकू शकली नाही, त्या जागा आम्ही मागितल्या. काँग्रेसच्या खिशातल्या जागा मागितल्या नाहीत."

गोव्यात एकत्र लढलो नाही, तर काँग्रेसचा एक आकडी आमदारसुद्धा निवडून येणार नाही, असं वातावरण असताना काँग्रेससारख्या पक्षाला आधार देण्याचा प्रयत्न आम्ही करत होतो, असंही संजय राऊत म्हणाले.

2) 'हा अभिनय क्षेत्रातील खून', मालिकेतून काढल्यानं अभिनेत्याचा संताप

राजकीय भूमिका घेतल्यानं अभिनेते किरण माने यांना स्टार प्रवाह वाहिनीने 'मुलगी झाली हो' मालिकेतून काढल्याचा आरोप होतो आहे. याबाबत सोशल मीडियावरून संताप व्यक्त केला जातोय. सकाळ वृत्तपत्रानं ही बातमी दिली आहे.

किरण माने हे चित्रपट, मालिका आणि नाट्य क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेते असून, ते सोशल मीडियावरून विविध चालू घडामोडींवर भाष्य करत असतात.

या प्रकाराला किरण माने यांनी 'झुंडशाही' म्हटलं आहे. ते म्हणतात, "मला जर न्याय मिळाला नाही, तर आता झुंडशाहीविरोधात बोलायला कुणीच धजावणार नाही, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. मला न्याय मिळाला तर खूप लोक याविरोधात बोलायला पुढे येतील, काय करायचं ते लोकांनी ठरवावं."

"माझ्या सगळ्या पोस्ट वाचा, त्यामुळे कुठेही जातीवादी विखार दिसणार नाही. कुणावर विनाकारण पातळी सोडून केलेली टीका दिसणार नाही," असंही किरण माने म्हणाले.

3) ...तर मी 2019 मध्येच लढण्याचा आग्रह केला असता - उत्पल पर्रिकर

गोव्यात निवडणुकीची रंगत वाढत जाताना दिसतेय. दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच गोवा विधानसभा निवडणुकीला सामोरं जातोय. त्यामुळे भाजपच्या कामगिरीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.

मनोहर पर्रिकरांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांनी गोव्याची राजधानी पणजी मतदारसंघातून लढण्याची इच्छा व्यक्त केलीय. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

त्यावर बोलताना भाजपचे गोवा प्रभारी आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, "मनोहर पर्रिकरांनी गोव्यात भाजपसाठी खूप मोठं काम केलंय. नेत्यांची मुलं आहेत म्हणून भाजपमध्ये तिकीट मिळत नाही. जर त्यांनी काम केलं असेल तर तिकिटासाठी त्यांचा विचार केला जाईल. यावर मी निर्णय घेत नाही. केवळ पक्षाचं संसदीय मंडळच तिकीट वाटपाच्या विषयावर निर्णय घेईल."

यानंतर उत्पल पर्रिकर यांनी म्हटलं की, "मला ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर बोलायचं नाही. जर मला केवळ पर्रिकरांचा मुलगा म्हणून तिकीट हवं असतं तर मी हा आग्रह 2019 मध्येच केला असता. तेव्हा मला मागच्या दाराने नकार देण्यात आला होता."

1995 पासून मनोहर पर्रिकर पणजी मतदारसंघातून पाचवेळा विधानसभेत निवडून गेले होते. याच मतदारसंघातून मुलगा उत्पल पर्रिकर यांना लढण्याची इच्छा आहे.

4) 'पम्मी, तुम जिती मैं हारा' असं धनंजय मुंडे म्हणतील तेव्हाच मी जिंकेन - करुणा मुंडे

"मला अजूनही न्याय मिळाला नाही. पण मी समाधानी आहे. माझे पती जेव्हा स्वतः हून माझ्याजवळ आणि मीडियासमोर येतील आणि 'पम्मी, तुम जिती मै हारा' असं जेव्हा म्हणतील, शपथविधीमध्ये जेव्हा ते माझं नाव घेतील, तेव्हाच मला न्याय मिळाला असं मी समजेन," असं करुणा धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

करुणा मुंडे यांनी पुण्यात एका कामगार संघटनेत प्रवेश केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. लोकमतनं ही बातमी दिलीय.

काही दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांनी एका राजकीय पक्षाची स्थापना केली. त्यानंतर राज्यभरात पक्षाचा विस्तार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसंच, "माझ्यावर निवडणूक लढवण्याची वेळ आलीच तर परळी गावातून आमदारकीची निवडणूक लढवेन. धनंजय मुंडे विरोधात निवडणूक लढवेन. नवरा विरुद्ध बायको अशी ही लढत असेल," असंही करुणा मुंडे म्हणाल्या.

5) शेलार आणि पेडणेकरांनी सामंजस्यानं वाद मिटवावा - हायकोर्ट

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजप नेते आशिष शेलारांनी आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याचं प्रकरण मुंबई हायकोर्टाच्या दारात पोहोचलं होतं. आता हायकोर्टानं हा वाद सामंजस्यानं मिटवण्याचा सल्ला दिलाय. आपलं महानगरनं ही बातमी दिलीय.

मुंबईतील एका दुर्घटनेवरून शेलारांनी महापौर पेडणेकर आणि महापालिका प्रशासनावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

राज्य महिला आयोगाकडूनही या प्रकरणाची दखल घेण्यात आली होती. त्यानंतर आपल्यावरील गुन्हा रद्द व्हावा म्हणून शेलार हायकोर्टात गेले होते.

हायकोर्टानं वाद सामंजस्यानं मिटवण्याचा सल्ला दिला. तसंच, शेलार आणि पेडणेकरांना नोटीस बजावली आहे. शिवाय, महापौर आणि सरकारला दोन आठवड्यात आपली भूमिका सादर करण्याचे आदेशही हायकोर्टानं दिलेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)