रझिया सुलतान : गुलामाच्या प्रेमात पडल्यामुळे दिल्लीच्या या सम्राज्ञीची सत्ता गेली का?

फोटो स्रोत, Sansad TV
- Author, राणा सफवी
- Role, इतिहासकार, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
भारताची पहिली महिला शासक रझिया सुलतानचं नाव आलं आणि हेमा मालिनीचा चित्रपट आठवला नाही तर नवलच. कमाल अमरोही यांचा 'रझिया सुलतान' या चित्रपटात हेमा मालिनी यांनी रझियाची भूमिका केली होती तर जोडीला होते अंगभर काळा रंग लावलेले धर्मेंद्र.
पण ज्या प्रकारे कथा कादंबऱ्यांमध्ये दाखवलं जातं त्याप्रमाणे दिल्लीचे सुलतान (सन 1210 ते 1236) इल्तुतमिशची मुलगी रझिया लाजरीबुजरी नव्हती आणि पडद्याआड मोठी झाली नव्हती.
वाळूच्या टेकड्यांवर रडत गाणं म्हणणारी तर ती अजिबातच नव्हती, मग भले ते गाणं 'ए दिले नादां' सारखं श्रवणीय का असेना.
'वीस मुलांच्या बरोबरीची एक मुलगी'
रझिया एक तरबेज घोडेस्वार, प्रशिक्षित तलवारबाज आणि तीरंदाज होत्या. त्यांचे वडील आणि नंतर विश्वासू काळा गुलाम जमालुद्दीव याकूब यांनी तिला युद्धकलेत पारंगत केलं होतं.

फोटो स्रोत, ARUN BHARDWAJ
रझियाला जनतेवर राज्य कसं करायचं याचंही प्रशिक्षण दिलं गेलं होतं आणि जेव्हा इल्तुतमिश ग्वाल्हेरला एका मोहिमेवर गेले तेव्हा रझियाला राजवटीची जबाबदारी सोपवून गेले होते.
इल्तुतमिशचा सर्वात मोठा मुलगा आणि उत्तराधिकारी नसीरुद्दीन महमूद सन 1229 मध्ये एका लढाईत मारला गेला. त्यांचा आपल्या लहान मुलावर विश्वास नव्हता आणि त्याचा सगळा वेळ फक्त भोगविलासात जायचा.
त्यामुळे परंपरेला छेद देत इल्तुतमिशने आपल्या मुलीला, रझियाला आपली उत्तराधिकारी नेमलं. असं म्हणतात की इल्तुतमिश आपल्या मुलीचं वर्णन 'वीस मुलांच्या बरोबरची एक मुलगी' असं करायचा.
पण इल्तुतमिशच्या इच्छेविरुद्ध काही लोकांनी रझियाचा लहान आणि बिनकामाचा भाऊ रुकनुद्दीन फिरोजला गादीवर बसवलं.
पण रझिया लढवय्या होत्या, त्यांनी लवकरच परिस्थिती आपल्या बाजूने वळवली.
'राजाचे गुण'
इतिहासकार ख्वाजा अब्दुल्लाह मलिक इसामी त्याकाळातले बखरकार होते. सन 1349-50 या काळात प्रसिद्ध झालेल्या आपल्या 'फुतुहात-ए-सलातिन' या पुस्तकात ते लिहितात की रझिया फाटके तुटके कपडे घालून शुक्रवारची नमाज जिथे अदा होते तिथे आल्या आणि त्यांनी आपली व्यथा लोकांना सांगितली.
रझियाचं म्हणणं होतं की, त्यांची सावत्र आई शाह तुर्कन आपला मुलगा रुकनुद्दीन फिरोज याच्यावतीने राज्य करत होती.

फोटो स्रोत, ARUN BHARDWAJ
तिथे उपस्थित असलेल्या लोकांकडून रझियाने आपल्या सावत्र आईचं कारस्थान मोडून काढण्यासाठी मदत मागितली.
रझियाला या अवस्थेत पाहून आणि त्यांच्या जोरदार भाषणाने तिथले लोक प्रभावित झाले. यामुळे आणि एक स्थित्यंतर घडवणारी गोष्ट घडली होती. रझिया आणि दिल्लीच्या लोकांमध्ये सरळ संवाद सुरू झाला.
इसामी लिहितात की या घटनेनंतर रझिया आणि सर्वसामान्य लोक यांच्यात एक करार झाला. या कराराअंतर्गत जर 'रझिया स्वतःला पुरुषांपेक्षा वरचढ सिद्ध करू शकल्या नाहीत तर त्यांचं शिर धडावेगळं केलं जाईल' असं ठरलं.
तोवर त्यांचा सावत्र भाऊ शहरात परत आला होता आणि त्याचा राज्याभिषेक झाला होता. पण शाह तुर्कनला अटक झाली. माय-लेक दोघांनाही 9 नोव्हेंबर 1236 या दिवशी ठार करण्यात आलं.
आपला सावत्र भाऊ रुकनुद्दीनला हटवून रझिया 'सुलतान जलालुद्दीन रझिया' या नावाने गादीवर बसल्या.
त्या काळात राजघराण्यातल्या महिलांना ज्या पदव्या दिल्या जायच्या, विशेषतः राजकुमारी किंवा राजांच्या पत्नींना ज्या पदव्या दिल्या जायच्या त्या पदव्या स्वीकारायला रझियाने नकार दिला. त्यांच्या दृष्टीने महिलांना दिली जाणारी पदवी कमजोर पदवी होती.
रझियाने आग्रह धरला होता की तिला 'सुलताना' नाही तर 'सुलतान' म्हणून संबोधल जावं.
रझियाने महिलेसारखी वेषभूषा सोडून पुरुषांसारखे कपडे घालायला सुरुवात केली. त्यांनी चेहरा झाकणंही बंद केलं.
इतिहासकार मिन्हाज-उस-सिराज म्हणतात, "सुलतान रझिया एक महान शासक होत्या. त्या समजूतदार होत्या, इमानदार होत्या, उदार होत्या, न्यायी होत्या. आपल्या प्रजेच्या संरक्षणासाठी कटीबद्ध होत्या आणि सैन्याच्या सैनापती होत्या. त्यांच्यात ते सारे गुण होते जे एका राज्यकर्त्यात असायला हवे. पण त्यांच्या जन्म चुकीच्या लिंगात झाला होता. त्या एक स्त्री होत्या त्यामुळे पुरुषांच्या दृष्टींना त्यांच्या गुणांना काहीच महत्त्व नव्हतं."
त्या एका खुल्या दरबारात बसायच्या आणि कुशलतने सगळी प्रकरणं हाताळायच्या.

फोटो स्रोत, ARUN BHARDWAJ
पण रझियाच्या पतनाचं कारण ठरलं एका काळ्या गुलामाशी त्यांची जवळीक आहे ही लोकभावना.
रझिया जमालुद्दीन याकूत नावाच्या एका गुलामाच्या प्रेमात होत्या अशी वदंता होती. याकूतला त्यांनी घोडेस्वारांच्या दलाचं प्रमुख बनवलं होतं.
यामुळे तुर्कांचा चहालगनी म्हटला जाणारा एक शक्तीशाली गट नाराज झाला. या गटाला वाटायचं की सगळी महत्त्वाची पदं तुर्कांकडे राहिली पाहिजेत.
प्रेमसंबंध?
आजही आपल्याला रझिया आठवते ते एक राज्यकर्ती म्हणून नाही तर एक दुर्दैवी स्त्री म्हणून, जिचं तिच्या गुलामावर प्रेम होतं आणि योगायोगाने ती शासक होती.

फोटो स्रोत, ARUN BHARDWAJ
पण त्या काळातल्या कोणत्याही इतिहासकाराने या प्रेमसंबंधविषयी काहीही लिहिलेलं नाही. इतकाच उल्लेख आढळतो की घोड्यावर चढवताना याकूतला रझियाला स्पर्श करण्याची परवानगी होती. पण घोडेस्वारांच्या दलाचे प्रमुख या नात्याने हे त्यांचं कामच होतं. इल्तुतमिशसाठीही ते हेच करायचे.
जेव्हा आपण प्रत्येक गोष्टीकडे रोमान्सच्या नजरेतून पाहायला लागतो तेव्हा हे विसरतो की रझिया किती अवघड परिस्थितीत राज्य करण्याचा प्रयत्न करत होत्या. अशात आपल्या वडिलांचे विश्वासू गुलाम आणि त्यांचे शिक्षक असणाऱ्या याकूतवर त्यांचा भरवसा असणं साहजिक होतं.
जेव्हा मी माझ्या मुलीला रझियाची कथा ऐकवत होते तेव्हा ती ओरडून म्हणाली, "आई रझिया त्यांच्याकडे एक सल्लागार म्हणून पाहायची. त्यांना वडिलांच्या जागी मानायची."
खरं काहीही असेल पण शक्तिशाली तुर्कांच्या गटाने रझियाच्या विरोधात विद्रोह केला. याकूतची हत्या केली गेली आणि रझियाला कैद केलं.
त्यांचे एका काळ्या गुलामासोबत कथितरित्या प्रेमसंबंध होते म्हणून त्यांच्याविरोधात विद्रोह झाला की त्या तुर्कांच्या हातचं बाहुलं बनून राहायला तयार नव्हत्या, स्वतःचे निर्णय स्वतः घेत होत्या म्हणून झाला हे सांगता येत नाही.
चहलगानी गटाने मग त्यांचा भाऊ मुइजुद्दीन बहराम याला गादीवर बसवलं.
रझिया कैदेतून पळून भटिंडाला जाण्यात यशस्वी ठरल्या. तिथे आणखी एक तुर्क अमीर मलिक अल्तूनियाशी त्यांनी हातमिळवणी केली. नंतर याच्याशीच त्यांनी लग्न केलं.
दिल्लीच्या लोकांनी त्यांना शासक म्हणून निवडलं होतं. त्यांच्यापासून लांब गेल्यानंतर रझियांची ताकदच गेली. यानंतर काही काळाने आपल्या भावाच्याविरोधात एका मोहिमेचं नेतृत्व करताना त्यांचा मृत्यू झाला.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























