उत्तर प्रदेश निवडणूक: योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढवणार? #5मोठया बातम्या

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढणार?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येतून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. हिंदी दैनिक जागरणने योगी आदित्यनाथ अयोध्येतून विधानसभा निवडणूक लढतील असं लिहिलं आहे.

"पक्षाच्या दिल्लीतील मुख्यालयात दोन दिवस झालेल्या मॅरेथॉन बैठकीत यावर सहमती झाली आहे. आता केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर औपचारिक घोषणा होणं बाकी आहे. गोरखपूरमधून पाचवेळा लोकसभेत निवडून गेलेल्या योगी आदित्यनाथ पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढत आहेत.

2017 मध्ये भाजपाला राज्यात मोठा विजय मिळाला मात्र तेव्हा योगी आदित्यनाथ मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार नव्हते. ते विधानपरिषदेचे सदस्य झाले आणि मुख्यमंत्री बनले. यावेळेस त्यांच्या नावावर निवडणूक लढवली जात आहे," असं जागरणने आपल्या बातमीत म्हटलं आहे.

2. प्रताप सरनाईक यांच्या इमारतीला दंडमाफी

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या छाबय्या विहंग गार्डन इमारतीवरील दंड आणि दंडावरील व्याज रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे.

सरनाईक यांच्या कंपनीने बांधलेल्या प्रकल्पात पाच मजले अनधिकृत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्यांना 3 कोटी 33 लाख रुपयांचा दंड करण्यात आला होता. मात्र सरनाईक यांनी केवळ 25 लाख रुपयांचा दंड भरला होता. त्यामुळे दंडावरील व्याजच 1 कोटी झाले होते.

त्याचप्रमाणे मंत्रिमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे व सेवाशर्तीचे विनयमन) अधिनियम, 2017यात सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणेच छोट्या दुकानावरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील.

बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये दहापेक्षा कमी कामगार असतात, हे लक्षात घेता यापुढे रस्त्यालगतच्या सर्वच दुकांनावरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशीही दुरुस्ती मंजूर करण्यात आली.

3. संसदेचे 718 कर्मचारी कोरोनाबाधित

अर्थसंकल्पीय अधिवेशन तोंडावर आले असताना एक काळजी करायला लावणारी बातमी समोर आली आहे. संसदेचे 718 कर्मचारी सध्या कोरोनाबाधित असल्याचं वृत्त हिंदुस्तान टाइम्सने प्रसिद्ध केलं आहे. यातील बहुतेकांना गेल्या दोन आठवड्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

9 जानेवारीपर्यंत 400 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. 12 तारखेला हा आकडा 700 च्या वर गेला. यातील 200 कर्मचारी राज्यसभेतील असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

4. मनोहर पर्रिकरांच्या पुत्रास तिकीट?

गोव्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पणजी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत अशी चर्चा सध्या राज्यात सुरू आहे.

मनोहर पर्रिकर याच मतदारसंघातून पाच वेळा निवडणूक जिंकून विधानसभेत गेले होते. उत्पल पर्रिकर यांच्या उमेदवारीबाबत मी निर्णय घेऊ शकत नाही. संसदीय मंडळ याचा निर्णय घेऊ शकतं असं भाजपाचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ही बातमी लोकसत्ताने प्रसिद्ध केली आहे.

5. चीनपासून धोका कमी झालेला नाही

चीनमुळे भारताला असलेला धोका कमी झालेला नाही असं लष्कर प्रमुख मुकुंद नरवणे यांनी स्पष्ट केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

15 जानेवारी रोजी असलेल्या सैन्य दिनाच्या निमित्ताने ते पत्रकारांशी बोलत होते. चीनने आपला लँड बाऊंड्री लॉ 1 जानेवारी रोजी लागू केला आहे. मात्र तो मान्य करण्यास भारत बाध्य नाही असं ते म्हणाले.

जनरल नरवणे म्हणाले, चीनच्या लँड बॉर्डर कायद्याला द्वीपक्षीय संबंधांत काहीही जागा नाही. आम्ही तो स्वीकारत नाही. भारत आणि चीनमध्ये आधीपासून अनेक करार झालेल आहेत. कोणताही नवा कायदा आम्हाला बाध्य नाही."

"लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनशी झालेल्या वादाला थांबवण्यात अंशतः यश नक्कीच आलं आहे. परंतु उत्तर सीमेवरचा धोका कोणत्याही प्रकारे कमी झालेला नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)