ओमिक्रॉन : 'सध्या कठोर लॉकडाऊनची गरज नाही, पण केसेस वाढत गेल्या तर...'- सुरेश काकाणी

कोरोना, मुंबई

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

मुंबईमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा हा 20 हजारांपर्यंत जाऊन पोहोचला. पण काही दिवसांपासून हे आकडे कमी होताना दिसत आहेत.

हे आकडे कमी झाल्यामुळे तिसरी लाट ओसरते आहे का? मुंबईतल्या कुठल्या भागामध्ये कुठल्या वर्गामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आढळते आहे? त्याची काय कारणं आहेत? लॉकडाऊन आणि लोकल ट्रेन बंद करण्याबाबत मुंबई महापालिका काय विचार करतेय?

या आणि अशा विविध प्रश्नांची उत्तरं बीबीसी मराठीने मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी बातचीत करून घेतली.

प्रश्न - मुंबईमध्ये रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसते. हा आकडा 20 हजारांपर्यंत पोहोचला होता, पण तेरा हजारांपर्यंत आता खाली आलेला दिसतोय. ही लाट ओसरते आहे असं म्हणावं का?

सुरेश काकाणी - मुंबईमध्ये रुग्णांची संख्या ही कमी होताना दिसते आहे हे खरं आहे. परंतु यामधून ही लाट ओसरते आहे असं इतक्यात म्हणणं हे खूप धाडसाचं ठरेल. हा आठवडा खूप महत्त्वाचा आहे. पुढचे काही दिवस रुग्णांची संख्या ही अशीच घटताना दिसली, तर आपल्याला काहीतरी निष्कर्ष काढता येईल. पण सध्यातरी 'वेट अँड वॉच' ची भूमिका ठेवावी लागेल.

तिसरी लाट आली आहे हे तर स्पष्ट आहे. पण यामधला रूग्णांचा उच्चांक असणारा 'पीक टाईम' येऊन गेला आहे की अजून ही वेळ यायची आहे? कारण मुंबईत रूग्णांची संख्या 40 हजारांपर्यंत जाईल अशीही एक भीती होती.

कोरोना, मुंबई

फोटो स्रोत, Getty Images

टास्क फोर्सच्या झालेल्या चर्चेत त्यांनी असं सांगितलं की, ही तिसरी लाट आहे आणि जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापासून ती ओसरायला सुरुवात होईल. मुंबईमध्ये दुसऱ्या आठवड्यापासूनच रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय.

तिसर्‍या आठवड्यात आपल्याला ही लाट ओसरते आहे का? याबाबत ठामपणे सांगता येईल. पण जानेवारीच्या तिसर्‍या आठवड्यापासून ही लाट ओसरायला सुरवात होईल हा सर्वांचा अंदाज आहे.

रुग्ण कितीही वाढले तरीही आम्ही उपचारासाठीची सर्व तयारी ठेवलेली आहे. तिसरी लाट ओसरली तरीही महिनाभर ही संपूर्ण तयारी आम्ही तशीच ठेवणार आहोत.

प्रश्न - मुंबईच्या कुठल्या भागात सर्वाधिक रुग्ण आहेत? आणि ते रूग्ण वाढण्याची काय कारणं आहेत याचं सर्वेक्षण झालं आहे का?

सुरेश काकाणी - आम्ही केलेल्या सर्वेक्षणातून असं दिसून आलं की, 90% रूग्णांची संख्या ही उच्च मध्यमवर्गीय इमारतींमधली आहे.

साधारण 5% - 7% टक्के रूग्ण हे दाटीवाटीच्या वस्तीमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये दिसून येत आहेत. हा जो 'ट्रेन्ड' दिसून येतो आहे, त्यावरून लग्न समारंभ, पार्ट्या, भेटीगाठींचे समारंभ यातून रूग्णांची संख्या अधिक वाढत आहे.

कोरोनाचे नियम अशा समारंभ पाळले जात नाहीत त्यामुळे ही रूग्ण संख्या वाढते आहे. पश्चिम उपनगरातील काही वॉर्डमध्ये रूग्णांची संख्या अधिक दिसून येत आहे.

प्रश्न - सध्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे संपूर्ण राज्यातच निर्बंध लावण्यात आलेले आहेत. पण जर भविष्यात रूग्ण संख्या वाढली तर लॉकडाऊनची आवश्यकता भासेल का?

सुरेश काकाणी - सध्याच्या परिस्थितीतून लोकांनी करूनच निर्बंध पाळणं हे आवश्यक आहे. त्यांनी मास्क लावला पाहिजे. बाहेर पडताना सॅनिटायझर वापरलं पाहिजे. सोशल डिस्टंसिंग ठेवल पाहिजे. हे काटेकोरपणे पाळलं तर रूग्णांची संख्या नियंत्रणात राहील आणि आपल्यावर लॉकडाऊन लावण्याची पाळी येणार नाही.

कोरोना, मुंबई

फोटो स्रोत, ANI

जर आपण यंत्रणेचा विचार केला तर, आज आमच्याकडे 35000 बेड उपलब्‍ध आहेत. त्यापैकी 80% बेड रिकामे आहेत. मुबलक प्रमाणात ऑक्सिजन, आयसीयुसुध्दा तयार आहेत. रूग्णांची संख्या वाढली तर 1 लाख बेड उपलब्‍ध असावेत असा आमचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने आम्ही तयारी करतोय. त्यामुळे आताच्या परिस्थितीत तरी लॉकडाऊनची गरज वाटत नाही. जर भविष्यात रूग्ण वाढले तर शासन स्तरावर निर्णय घेतला जाईल.

प्रश्न - मुंबईत सर्वाधिक गर्दी होते ती लोकल ट्रेनमध्ये... लसीचे दोन डोस झालेल्यांनाच आधीपासून लोकलट्रेनमध्ये परवानगी आहे. पण लोकल ट्रेन प्रवासावरअधिक कडक निर्बंध लावण्याचा विचार आहे का?

सुरेश काकाणी - अद्याप असा कोणताही विचार नाही. याआधी पासून लोकांचं सहकार्य आम्हाला मिळत आलेलं आहे. जर रुग्णांची संख्या नियंत्रणात राहिली तर लोकल ट्रेन्सच्या प्रवासावर कोणतेही निर्बंध लावण्याची वेळ येणार नाही असा विश्वास आम्हाला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)