मोदी: ममता बॅनर्जी- ज्या रुग्णालयाचं उद्घाटन करत आहात, त्याचं उद्घाटन आम्ही आधीच केलंय #5मोठ्याबातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पश्चिम बंगाल

फोटो स्रोत, NurPhoto

फोटो कॅप्शन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा

1.'तुम्ही ज्या रुग्णालयाचं उद्घाटन करत आहात, त्याचं उद्घाटन आम्ही आधीच केलंय'

"तुम्ही ज्या रुग्णालयाचं उद्घाटन करत आहात त्याचं उद्घाटन आम्ही आधीच केलंय", असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भर कार्यक्रमातच सांगितलं. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोलकाता येथील चित्तरंजन नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या दुसऱ्या कॅम्पसचे उद्घाटन झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या. 'एनडीटीव्ही'ने ही बातमी दिली आहे.

ममता म्हणाल्या, "आरोग्यमंत्र्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी दोनदा फोन केला होता. मला वाटले हा कोलकात्यातील कार्यक्रम आहे, पंतप्रधान मोदी स्वत: यामध्ये रस दाखवत आहेत. माहितीसाठी मी हे सांगू इच्छिते की, याचं उद्घाटन आम्ही अगोदरच केलं आहे. कसं केलं? कोरोना काळात आम्हाला केंद्रांची गरज होती. तेव्हा मी स्वत: एक दिवस तिकडे गेले असताना, चित्तरंजन रुग्णालय मी पाहिले की, हे राज्य सरकारशी संलग्न आहे. अशा परिस्थितीत आम्ही त्याचे उद्घाटन करून त्याचे कोरोना सेंटर बनवले".

"राज्य सरकार कर्करोग रुग्णालयासाठी 25 टक्के बजेट देत आहे. या रुग्णालयासाठी राज्य सरकारने 11 एकर जागा दिली आहे. त्यामुळे लोकांचा विचार करता राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रितपणे काम केले पाहिजे", असं ममता यांनी सांगितलं.

2.पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा भीती वाटली नाही-कन्हैया

"पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा यांना भीती वाटली नाही. त्यांना आपल्याच देशात फिरायला भीती वाटते", असं म्हणत कन्हैया कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षा यंत्रणेत झालेल्या चुकीसंदर्भात कन्हैया गोव्यात युवा स्पंदन कार्यक्रमात बोलत होते. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

"जर सुरक्षेत त्रुटी असतील तर तुम्ही पंतप्रधान आहात, तुमच्याकडे सरकार आहे. गृहमंत्री तुमचे मित्र आहेत, विशेष सुरक्षा पथक (SPG) त्यांच्या अंतर्गत आहेत. तुम्ही तपास करून सुरक्षेत कुठे चूक झाली हे शोधा.

पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा यांना भीती वाटली नाही, आपल्याच देशात फिरायला यांना भीती वाटते. हे अजिबात चालणार नाही", असं कन्हैया म्हणाले.

एकीकडे म्हणतात मजबूत पंतप्रधान आहेत आणि दुसरीकडे पळून जातात असंही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, पंजाब, कन्हैया कुमार

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कन्हैया कुमार

"एका राज्यातील सर्व लोकांना गुन्हेगार ठरवलं जात आहे. सुरक्षेतील त्रुटीचं निमित्त करून पंजाबमधील लोकांना दहशतवाद्यांप्रमाणे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. पंजाब आपल्या देशाचा भाग आहे.

पंतप्रधानांचा कुठं कार्यक्रम असेल तर सुरक्षेची जबाबदारी एसपीजीची असते. एसपीजीचा प्रमुख गृहमंत्री अमित शाह आहेत. त्यामुळे सुरक्षेतील त्रुटीचा प्रश्न पंतप्रधानांनी आपल्या जिगरी मित्राला विचारला पाहिजे", असं कन्हैया म्हणाले.

3.जैश ए मोहम्मदकडून संघ परिसराची रेकी, गुप्तचर संस्थेचा अहवाल

नागपुरातील काही संवेदनशील ठिकाणांची 'जैश ए मोहम्मद'कडून रेकी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही या वृत्तास दुजोरा दिला आहे.

सेंट्रल एजन्सीकडून पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल परिसरातील मुख्यालय, रेशीम बागमधील संघाचा डॉ हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आणि इतर काही संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन तिथे सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आहे. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.

या प्रकरणी युएपीए कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जम्मू-काश्मीरमधील एका तरुणाने जुलै महिन्यात नागपुरात दोन दिवस वास्तव्य करून काही स्थानांची रेकी केल्याची माहिती सेंट्रल एजन्सी कडून नागपूर पोलिसांना मिळाली.

जम्मू काश्मीरमध्ये या तरुणाला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान ही माहिती समोर आली आहे.

4. कालीचरणला जामीन

प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कालीचरण महाराज याला न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. 'सकाळ'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यावर कालीचरण याने गुरुवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. रामदिन यांच्या न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.

कालीचरण

फोटो स्रोत, CG KHABAR/BBC

फोटो कॅप्शन, कालीचरण

समस्त हिंदू आघाडी संघटनेतर्फे 19 डिसेंबर रोजी शुक्रवार पेठेतील नातूबाग मैदानावर आयोजित 'शिवप्रताप दिन अर्थात अफजलखान वधाचा आनंदोत्सव' कार्यक्रमात दोन समाजात जातीय तेढ निर्माण होईल, असे प्रक्षोभक व चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कालिचरण याच्यासह पाच जणांवर खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यात कालिचरण महाराजाला जयपूरवरून ताब्यात घेण्यात आले होते. न्यायालयाने त्याला बुधवारी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली होती.

5. बीडच्या राजकारणात काका पुतण्यावर भारी

बीड मतदारसंघातील सहकाराची महत्त्वाची संस्था तालुका दूध संघाच्या निवडणुकीत जयदत्त क्षीरसागर यांनी पुतण्या आणि विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर मोठा विजय मिळवला आहे. 'लोकमतन्यूज18'ने ही बातमी दिली आहे.

बीड, जयदत्त क्षीरसागर, संदीप क्षीरसागर

फोटो स्रोत, FACEBOOK

फोटो कॅप्शन, जयदत्त क्षीरसागर

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर क्षीरसागर कुटुंबातील काका-पुतण्या अनेक वेळा आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.

तालुका दूध संघाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पक्षाला उमेदवार देखील उभा करता आले नाहीत.

त्यामुळे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी एकहाती बिनविरोध निवडणूक घेत दूध संघावर पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)