You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जावेद हबीब : महिलेच्या केसांवर थुंकल्या प्रकरणी हेअर स्टायलिस्टने मागितली माफी, काय आहे प्रकरण?
हेअर स्टायलिस्ट जावेद हबीब यांच्यावर एका महिलेच्या केसांवर थुंकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्यांना महिला आयोगाने देखील जाब विचारला होता. त्यानंतर हबीब यांनी महिला आयोगाकडे माफी मागितली आहे.
जावेद हबीब यांनी लेखी माफी मागितली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आपला उद्देश नव्हता असे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे.
मुजफ्फरनगरमध्ये खतौली मधील सीओ राकेश कुमार यांनी जावेद हबीब यांच्या विरोधात कलम 355(अनादर), 504 (अपमान) आणि साथ रोग नियंत्रण कायदा 1897 शी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मुजफ्फरनगर जिल्ह्याच्या मन्सूरपूर पोलिस ठाण्यात बागपत जिल्ह्याच्या बडौतमधील रहिवासी पुजा गुप्ता यांच्या तक्रारीवरून एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद हबीब या महिलेच्या डोक्यावर थुंकले होते, असं सांगण्यात आलं आहे.
"मी स्वत:चं पार्लर चालवते. त्यादिवशी मी केस कापण्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी आले होते. ते माझ्या केसांवर थुंकतील हे मला माहिती नव्हतं. हा अपमान आहे. विद्यार्थी आणि प्रेक्षक माझ्यावर हसत होते," असं पीडित पुजा गुप्ता म्हणाल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
महिला आयोगानं घेतली दखल
राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणाची दखल घेतली असून, या प्रकरणी एक ट्विटदेखील केलं आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालकांना टॅग करत या व्हीडिओमागचं सत्य शोधून योग्य ती कारवाई करण्यास सांगितलं आहे.
या प्रकरणी महिला आयोगानं दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश अस्थाना यांनाही पत्र लिहून याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली होती. महिला आयोग या प्रकरणी जावेद हबीब यांनाही नोटिस पाठवणार आहे, असंही एएनआय या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.
स्थानिक पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, या प्रकरणी आवश्यक ती पावलं उचलली जातील, असंही एएनआयनं म्हटलं आहे.
गुरुवारी (6 जानेवारी) सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यात जावेद हबीब एका महिलेचे केस कापत होते. त्यात केस कापताना ते महिलेच्या डोक्यारव थुंकलेले पाहायला मिळालं. पाण्याची कमतरता असेल तर असे केस कापू शकतात, असंही ते म्हणत असल्याचं व्हीडिओत दिसलं.
ही घटना मुजफ्फरनगरमध्ये 3 जानेवारीला आयोजित कार्यक्रमात घडलेली आहे. जावेद हबीब या कार्यक्रमात हेअर स्टाइल संबंधी टिप्स देत होते.
या प्रकरणानंतर सोशल मीडियावर जावेद हबीब यांच्यावर प्रचंड टीका होत आहे. त्यांनी या प्रकरणी माफीही मागितली आहे.
जावेद हबीब यांना इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हीडिओ पोस्ट केला.
"माझ्या सेमिनारमधील काही गोष्टींमुळं लोकांना वाईट वाटलं. आमचे सेमिनार प्रोफेशनल आणि जास्त वेळ चालणारे असतात. त्याला आम्हाला गमतीशीर बनवावं लागतं. पण मी आता काय बोलू. तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर मी मनापासून माफी मागतो," असं या व्हीडिओत त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जावेद हबीब यांच्याविरोधात कारवाईची मागणी करत आंदोलन केलं आहे.
सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया
गुरुवारी सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं. शुक्रवारीही लोकांनी याच्या समर्थनार्थ आणि विरोधात सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या.
ट्विटरवर #JavedHabib ट्रेंड होत आहे. त्यात बहुतांश ट्विटमध्ये लोक जावेद हबीबवर टीका करत आहेत. त्यापैकी काही ट्विट याठिकाणी देत आहोत.
'सगळ्याची नितीमत्ता सारखीच'
ट्विटरवर 'कॅप्टन भारत' नावाच्या हँडलवरून जावेद हबीब यांना टॅग करत महिलांबरोबर होत असलेल्या गैरवर्तनाकडे इशारा केला.
''सावधान! थुंकणारे आपल्या आसपास आहेत. कितीही मोठा ब्रँड असू द्या किंवा कितीही मोठा शिकलेला व्यक्ती असू द्या, सर्वाची नितीमत्ता सारखीच आहे,'' असं लिहिलं होतं.
भाजप समर्थक असल्याने टीका
काही लोक एएनआय या वृत्तसंस्थेची तीन वर्ष जुनी बातमी शेअर करून जावेद हबीब भाजप समर्थक असल्याचं सांगत टीका करत आहेत.
ही बातमी 22 एप्रिल 2019 ची आहे. त्यावेळी जावेद हबीब भाजपद्वारे सुरू करण्यात आलेल्या 'मैं भी चौकीदार' मोहिमेला पाठिंबा देत त्यात सहभागी झाले होते.
"आतापर्यंत मी केसांचा चौकीदार होतो, आता देशाचा बनलो आहे," असं त्यात जावेद हबीब यांनी म्हटलं होतं.
अभिषेक मनू सिंघवी म्हणाले 'भयानक'
दुसरीकडं काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार अभिषेक मनू सिंघवी यांनी जावेद हबीब यांना टॅग करत ट्विट केलं.
"हे प्रकरण भयानक आहे. पण त्यावर उपस्थितांचं हसू आणखी भयानक आहे. आपल्याला या मानसिकतेतून बाहेर पडावं लागेल. एखाद्याची खिल्ली उडवणं आणि अपमान यातील फरक लक्षात घ्यावा लागेल. मला हेही कळलं आहे की, ते भाजप नेते आहेत," असं अभिषेक मनू सिंघवी यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)