नरेंद्र मोदी सुरक्षा : सोनिया गांधी- पंतप्रधान संपूर्ण देशाचे, सुरक्षा त्रुटीस जबाबदार व्यक्तींवर कारवाई करा

नरेंद्र मोदी सोनिया गांधी

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. पंतप्रधान संपूर्ण देशाचे, सुरक्षा त्रुटीस जबाबदार व्यक्तींवर कारवाई करा - सोनिया गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या सुरक्षेतील त्रुटीमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.

दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या प्रकरणी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्याशी चर्चा केली. या संपूर्ण घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई करा, अशी सूचना सोनिया गांधी यांनी केली आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक झाल्याची घटना बुधवारी (5 जानेवारी) समोर आली. त्यानंतर यासंदर्भात देशभरात चर्चा सुरू आहे. काँग्रेस हायकमांडने गुरुवारी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत चन्नी यांच्याकडून संबंधित घटनेची सविस्तर माहिती घेतली.

पंतप्रधानांच्या सुरक्षेसंदर्भात संपूर्ण काळजी घ्यायला हवी, असं सोनिया गांधी यांनी चन्नी यांना सांगितलं. तसंच पंतप्रधान हे संपूर्ण देशाचे आहेत. जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करा, असंही गांधी यांनी म्हटलं. ही बातमी लोकमतने दिली.

2. भाजप खात असलेली थाळी बाळासाहेबांनी भरलेली - संजय राऊत

बाळासाहेब ठाकरेंनी फक्त उद्धव ठाकरेंनाच नाही तर आमच्यासारख्या अनेकांना दिलं आहे. आजचा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात ज्या थाळीमध्ये खात आहे ती थाळी सुद्धा बाळासाहेबांनीच भरलेली आहे, असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

संजय राऊत

फोटो स्रोत, Getty Images

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ते बोलत होते.

"देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास नगरसेवक ते मुख्यमंत्री असा आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद हे आयतं मिळालं आहे. तळागळातून वर येणाऱ्या आणि मुख्यमंत्री होणाऱ्या व्यक्तीलाच सामान्य माणसांची आणि त्यांच्या परिस्थितीची जाण असते, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

त्याच्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी वरील वक्तव्य केलं. तसंच तुम्हाला काय मेहनतीने थाळी मिळाली आहे का? कोव्हिडच्या काळात तुम्ही रिकाम्या थाळ्या वाजवल्या. तुमचा संबंध त्याच थाळीपुरता आहे, असा टोला राऊत यांनी लगावला. ही बातमी लोकसत्ताने दिली.

3. लस नाही तर रेशन नाही, छगन भुजबळ यांचा इशारा

नागरिकांनी लसीकरण नसेल तर रेशन मिळणार नाही, असा निर्णय नाशिक जिल्ह्यात घेण्यात आला आहे.

परिस्थिती पाहून राज्यातही हा कटू निर्णय लागू केला जाऊ शकतो, असा इशारा नागरी अन्न पुरवठा मंत्री तसंच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे.

छगन भुजबळ

फोटो स्रोत, Getty Images

राज्यात कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नाशिकमध्येही गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.

या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. नाशिक जिल्ह्यात 28 डिसेंबरला कोरोनाची रुग्णसंख्या 540 इतकी होती, आता 5 जानेवारीला हीच रुग्णसंख्या 1461 वर पोहचली आहे.

त्यामुळे लसीकरण नसेल तर रेशन नाही, या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच नाशिकमध्ये केली जाणार आहे. राज्यातही असा कटू निर्णय घ्यावा लागू शकतो, असं भुजबळ म्हणाले. ही बातमी झी 24 तासने दिली.

4. विधानसभा, लोकसभा निवडणूक खर्चाची मर्यादा वाढणार

देशातील निवडणुकीसंदर्भात केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विधानसभा तसंच लोकसभा मंतदारसंघात निवडणुकीदरम्यान केल्या जाणाऱ्या खर्चावरील मर्यादा आता वाढवण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या शिफारसीनुसार केंद्र सरकारने हा निर्णय घेतला. या वर्षात होणाऱ्या आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत हा निर्णय लागू होईल.

निवडणूक आयोग

फोटो स्रोत, Nurphoto

सध्या विधानसभा मतदारसंघात उमेदवाराला 28 लाख रुपये इतका खर्च करता येतो. त्याची मर्यादा वाढवून 40 लाखांवर नेण्यात आली.

तर लोकसभा मतदारसंघात खर्चासाठी असलेली 70 लाखांची मर्यादा वाढवून 95 लाखांवर नेण्यात आली आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश यांच्यासारख्या मोठ्या राज्यात ही मर्यादा असेल. पण गोव्यासारख्या लहान राज्यात लोकसभा मतदारसंघासाठी 75 लाख इतकी मर्यादा असेल. ही बातमी ई-सकाळने दिली.

5. जोहान्सबर्ग कसोटीत भारताचा पराभव, दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून विजय

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे.

डीन एल्गरच्या शानदार 96 धावा, त्याला मिळालेली इतर फलंदाजांची साथ यांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने भारताने दिलेलं 240 धावांचं आव्हान सहज पार केलं.

के. एल. राहुल

फोटो स्रोत, Getty Images

पहिल्या डावात भारताना सर्वबाद 202 इतक्या धावा केल्या. त्याला उत्तर देताना पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेने 229 धावा धावा करत 27 धावांची आघाडी मिळवली.

दुसऱ्या डावातही भारतीय संघ फलंदाजीत विशेष अशी कामगिरी करू शकला नाही. दुसऱ्या डावात भारताने सर्वबाद 266 पर्यंत मजल मारून दक्षिण आफ्रिकेसमोर 240 धावांचं आव्हान ठेवलं.

दक्षिण आफ्रिकेने केवळ 3 गड्यांच्या मोबदल्यात हे आव्हान पार केलं. पहिल्या डावात भारताकडून 7 गडी बाद करणाऱ्या शार्दूल ठाकूरची चमक दुसऱ्या डावात फिकी पडल्याचं दिसून आलं. डीन एल्गरच्या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

या विजयामुळे भारत-दक्षिण आफ्रिका 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली. मालिकेतील पुढचा सामना 11 ते 15 जानेवारीदरम्यान केपटाऊन येथे खेळवला जाईल. ही बातमी एबीपी माझाने दिली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)