जितेन गजारिया : रश्मी ठाकरे यांच्याबद्दल ट्वीट करणाऱ्या भाजपच्या IT सेल सदस्याची चौकशी

जितेन गजारिया

फोटो स्रोत, Jiten Gajaria / facebook

फोटो कॅप्शन, जितेन गजारिया
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

महाराष्ट्र भाजपचे सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बीकेसीच्या सायबर सेल ऑफिसमध्ये त्यांची चौकशी सुरू आहे.

जितेन गजारिया यांनी 4 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा फोटो केला होता.

हा फोटो ट्वीट करताना त्यांनी रश्मी ठाकरेंचा उल्लेख 'मराठी राबडी देवी', असा उल्लेख केला होता.

रश्मी ठाकरे फोटो

फोटो स्रोत, Twitter

त्यापूर्वी गजारिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक फोटो ट्वीट केला होता.

या ट्विटमध्ये त्यांनी वापरलेली भाषा आक्षेपार्ह असल्याची टीका केली गेली.

ट्वीट

फोटो स्रोत, Twitter

या ट्वीटमुळे शिवसेनेनं भाजप आणि गजारिया यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी माध्यमंशी बोलताना सांगितलं, "भाजपनं एक युनिव्हर्सिटी चालू केली पाहिजे. ट्रोलिंग कसं करावं, अपमानित कसं करावं हे शिकवण्यासाठी त्यांचा एक कारखाना आहे. लोकांना अपमानित करण्यासाठी ट्रेनिंग दिलं जातं. विकृत मनमोवृत्तीची माणसं 25 हजार रुपये पगारावर ठेवलीय. रश्मी ठाकरे यांचा राजकारणाशी संबंध नाही. त्यांच्यावर का बोललं जातंय? याप्रकरणी कडक कारवाई व्हायला पाहिजे.

दुसरीकडे, जितेन गजारिया यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, "जितेन यांचे ट्वीट आक्षेपार्ह नाही आहेत. ते सभ्य भाषेत आहेत. मुख्यमंत्र्यांची बायको म्हणून ट्वीट करायला नको असं लोकांना वाटतो. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कक्षेत राहून ते ट्वीट करण्यात आलं आहे. पोलिसांवर सरकार दबाव आणत आहे.

'जितेन गजरिया यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलेलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आता योग्य ती कारवाई होईल. पण मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, कोणाच्याही भावना दुखावतील अशी कृत्य करू नयेत,' असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.

महिला नेत्यांनी काय म्हटलं?

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी याप्रकरणी बोलताना म्हटलं, "वारंवार मुद्दामहून चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या, महिलांचा अपमान करणाऱ्या या व्यक्तीला जामीन मिळता कामा नये. दुही आणि तेढ वाढवायचं या लोकांचं काम आहे. स्त्री आहे म्हणून तिच्याबद्दल अपमानजनक ट्विट केलेले दिसतात."

तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी म्हटलंय, "दुसऱ्याच्या मुख्यमंत्र्यांच्या बायकोविषयी तक्रार करताना तुमच्या पूर्वीच्या मुख्यमंत्र्याच्या पत्नीनं काय काय गुण उधळले, त्याच्याविषयी ट्वीट केलं तर बरं होईल. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला यात ओढणं बरोबर नाहीये. ज्याप्रकारे रश्मी ठाकरेंचं नाव गुंतवण्याचा प्रयत्न केला जात आहे, तो दुर्वैवी आहे."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)