मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा सूर्यनमस्काराला का विरोध?

फोटो स्रोत, Getty Images
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आझादी के अमृत महोत्सव अंतर्गत शाळांमध्ये सूर्यनमस्काराला विरोध केला आहे.
केंद्र सरकारने देशभरातल्या शाळांमध्ये 1 ते 7 जानेवारीदरम्यान सूर्यनमस्काराचं सत्र आयोजित करावं असे आदेश दिले आहेत.
स्वातंत्र्याला 75 वर्ष झाल्यानिमित्ताने आझादी के अमृत महोत्सवअंतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन करणं अपेक्षित आहे.
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार करण्यापासून रोखलं आहे. सूर्यनमस्कार म्हणजे सूर्यपूजेचं एक रुप असल्याचं लॉ बोर्डाचं म्हणणं आहे.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी हे वक्तव्य जारी केलं आहे.
वक्तव्य नेमकं काय आहे?
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने जारी केलेल्या वक्तव्यात म्हटलं आहे, भारत हा धर्मनिरपेक्ष, बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक देश आहे. या सिद्धांताना प्रमाण संविधान लिहिण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, TWITTER/@AIMPLB_OFFICIAL
सरकारी शिक्षण संस्थांमध्ये कोणत्याही धर्माची शिकवण दिली जाणं आपल्या राज्यघटनेसंमत नाही. धार्मिक स्वरुपाच्या किंवा एका विचारसरणीचं पालन करणाऱ्या समाजाचे कार्यक्रम शाळेत आयोजित केले जाऊ शकत नाहीत.
पण सध्याचं सरकार घटनेतल्या तत्वांपासून भरकटलं आहे. देशातल्या सगळ्यांवर बहुसंख्याकांचा विचार सक्तीने थोपवला जात आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने 75व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने 30 राज्यांमध्ये सूर्यनमस्कार योजना राबवण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात 30 हजार शाळांचा समावेश करण्यात आला आहे. 1 जानेवारी ते 7 जानेवारी या कालावधीत सूर्यनमस्कार कार्यक्रम आयोजित करणं अपेक्षित आहे. 26 जानेवारीला सूर्यनमस्कारासंदर्भात सांगीतिक कार्यक्रम करण्याचीही योजना आहे.
देशातल्या समस्यांवर सरकारने लक्ष द्यावं
बोर्डाने जारी केलेल्या वक्तव्यात म्हटलं आहे की, सूर्यनमस्काराचे कार्यक्रम शाळेत आयोजित करणं हे घटनेला धरून नाही. देशप्रेमाचा खोटा प्रचार आहे. सूर्यनमस्कार हे सूर्यपूजेचं रुप आहे. इस्लाम आणि देशातील अन्य अल्पसंख्याक नागरिक सूर्याला देवता मानत नाहीत आणि त्यामुळे त्याची उपासनाही करत नाहीत.

फोटो स्रोत, AFP
त्यामुळे सरकारने हे निर्देश परत घ्यावेत आणि घटनेने आखून दिलेल्या धर्मनिरपेक्ष तत्वांचा सन्मान करावा.
सरकारला देशप्रेमाची भावना जागृत करायची असेल तर राष्ट्रगीत म्हटलं जाऊ शकतं. सरकारला देशाबद्दल खरोखरंच प्रेम असेल तर त्यांनी देशातल्या समस्यांच्या निवारणावर लक्ष केंद्रित करावं.
देशातली वाढती बेरोजगारी, चलनाचं अवमूल्यन, द्वेषभावना वाढीस लावणं, सीमांचं रक्षण करण्यात आलेलं अपयश, सार्वजनिक सरकारी आस्थापनांची विक्री या वास्तवातील प्रश्नांवर लक्ष द्यावं.
सूर्यनमस्काराच्या निमित्ताने वाद
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सूर्यनमस्कारासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे. हे परिपत्रक म्हणजे सरकारचं भगवीकरण झाल्याचा आरोप अनेक संस्थांनी केला होता.
12 डिसेंबरला जारी केलेल्या या परिपत्रकात म्हटलं आहे की, सकाळच्या वेळी भरणाऱ्या शाळेत सूर्यनमस्कार घालण्याचं सत्र आयोजित करावं. यामध्ये अधिकाअधिक मुलं सहभागी होतील याकडे लक्ष द्यावं. सुरुवातीला महाविद्यालयांसाठी हे परिपत्रक काढण्यात आलं होतं, काही काळानंतर शाळांनाही ते लागू करण्यात आलं.

फोटो स्रोत, Getty Images
26 जानेवारी रोजी होणाऱ्या सूर्यनमस्काराच्या कार्यक्रमाची ही तयारी असल्याचं या परिपत्रकात म्हटलं आहे. केंद्र सरकारतर्फे 26 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात 7.5 लाख सहभागी होतील असं सांगितलं जात आहे.
कर्नाटकात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनची लागण होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने या कार्यक्रमाच्या आयोजनावर अनेकांनी नापसंती व्यक्त केली आहे.
सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने शाळांमध्ये सूर्यनमस्काराचे कार्यक्रम आयोजित करायला आक्षेप घेतल्यानंतर सोशल मीडियावर यासंदर्भात उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.
स्वामी गोविंदा गिरी यांनी म्हटलं की, सूर्यनमस्कारात व्यायाम, योगासनं आणि प्राणायाम हे सगळं एकत्रित होतं. शरीराला उपयोगी आणि निरोगी ठेवण्यासाठीची ही सुरेख प्रक्रिया कोणी अनुसरत नसेल तर ते त्यांचं नुकसान आहे. समजूतदार लोकांनी अपप्रचारापासून स्वत:ला दूर ठेवावं.
विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ता विनोद बन्सल यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, सूर्यनमस्काराला विरोध करून काही उलेमा केवळ भारतीय मुसलमानांच्या आरोग्याचीच नव्हे तर इस्लामच्या वैश्विक प्रतिमेला तडा जाऊ देत आहेत.
सूर्यनमस्कार काय असतात?
सूर्यनमस्कार शारीरिक क्रियांशी संबंधित आसन आहे.
योग शिक्षकांच्या मते सूर्यनमस्कारात 12 आसनं असतात. प्रत्येक आसनाचं स्वतंत्र महत्त्व आहे.

योग जाणकारांच्या मते सूर्यनमस्कारामुळे पचन सुधारतं, पोटाचा घेर कमी होऊ शकतो तसंच शरीर लवचिक राखण्यातही मदत होऊ शकते.
सूर्याच्या प्रार्थनेशी हे संलग्न आहे. यासंदर्भात लोकांची मतमतांतरं आहेत. योग लंडनचे संस्थापक रेबेका फ्रेंच यांच्या मते, हे थोडं धार्मिक आहे. पण हे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. गुडघे टेकण्याचा अर्थ म्हणजे प्रार्थना असं तुम्ही समजू शकता. पण माझ्यादृष्टीने मी फक्त वाकतोय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























