IIT Kharagpur ने हिंदुत्वाचा प्रचार करण्याच्या नादात इतिहास बदलला का?

फोटो स्रोत, Iit kharagpur
- Author, प्रभाकर मणि तिवारी,
- Role, कोलकात्याहून, बीबीसी हिंदीसाठी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
पश्चिम बंगालमधील खडगपूर इथली 'इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी' (आयआयटी) वर्षाच्या अखेरच्या महिन्यात सातत्याने बातम्यांना खाद्य पुरवताना दिसते आहे.
डिसेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात या संस्थेने स्वतःच्या 70 वर्षांच्या इतिहासातील सर्वाधिक प्लेसमेन्टचा विक्रम केला. आता या संस्थेने तयार केलेल्या कॅलेंडरवरून वाद सुरू झाला आहे.
याआधी कोलकात्यातील हावडा इथे असणाऱ्या 'इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीयरिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी' या केंद्रीय संस्थेच्या ऑनलाइन कार्यशाळेत गीतापठण करण्यात आलं, तेव्हासुद्धा वाद झाला होता. पण आता कॅलेंडरवरून सुरू झालेल्या वादाने 'आयआयटी, खडगपूर'च्या प्लेसमेन्टसंबंधीच्या यशालाही मागे टाकलं आहे.
या कॅलेंडरमध्ये काहीही चुकीचं नाहीये; आर्यांच्या आक्रमणासंदर्भातील मिथक मोडीस काढण्याचा प्रयत्न तेवढा त्यात आहे, असं आयआयटीने आणि कॅलेंडर तयार करणाऱ्या 'सेंटर फॉर एक्सलन्स फॉर इंडियन नॉलेज सिस्टम' या संस्थेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.
- आयआयटी, आयआयएममध्ये दलित, ओबीसी, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांनी आत्महत्या का केली?
- मराठी भाषेत शिक्षण घेतल्यामुळे मुंबई महापालिकेनं शेकडो उमेदवारांना नोकरी नाकारली का?
- तुकाराम सुपे : दहा पट महाग मातीच्या कुंड्या ते TET घोटाळा, जाणून घ्या प्रवास
- आर्य भारताचे मूळ निवासी नाहीत, ते स्थलांतरित - DNA संशोधनात दावा
परंतु, आयआयटी खडगपूरने हिंदुत्वाचा प्रचार करण्याच्या खटपटीत इतिहासाचा विपर्यास केला आहे, असा आरोप अनेक शिक्षणतज्ज्ञांनी केला आहे.
ही गोष्ट केवळ इथवर थांबलेली नाही. कॅलेंडरसंबंधीचा वाद वाढत असताना आयआयटी, खडगपूरमधील त्याच केंद्राने वास्तूरचना, पर्यावरण अभ्यास, अर्थशास्त्र व गणित या विषयांवर पदवीचे व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करायचा निर्णय घेतला आहे.
कॅलेंडरमध्ये काय आहे?
हे वादग्रस्त कॅलेंडर संस्थेच्या वार्षिक दीक्षान्त समारंभात प्रकाशित करण्यात आलं, त्या वेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.
पण या कॅलेंडरमध्ये मुळात वादग्रस्त होण्यासारखं काय आहे?
'रिकव्हरी ऑफ द फाउंडेशन ऑफ इंडियन नॉलेज सिस्टम' असा मथळा असणाऱ्या या कॅलेंडरमध्ये भारतातील पारंपरिक ज्ञानव्यवस्थेचं चित्रण करण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Itt kharagpur
कॅलेंडरमधील प्रत्येक महिन्याच्या पानावर जगभरातील विख्यात व्यक्तिमत्त्वांची छायाचित्रं आहेत आणि भारतीय गणिती भाषेत विषयांची नावं लिहिली आहेत.
उदाहरणार्थ, ऑगस्ट महिन्याच्या पानावर विष्णुपुराणाचा संदर्भ देऊन सप्त ऋषींची चित्रं लावण्यात आली आहेत आणि त्यांना भारतीय ज्ञानाचे अग्रदूत ठरवण्यात आलं आहे.
अशाच रितीने मार्च महिन्याच्या पानावर बीजगणित व 'ज्यामिती' असं लिहिलं आहे. त्या सोबत प्रसिद्ध वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाइन यांचं छायाचित्र आहे.

फोटो स्रोत, Iit kharagpur
आर्यांनी आक्रमण केल्याची घटना काल्पनिक असून हिंदूंना कमीपणा यावा अशा उद्देशाने हा सिद्धान्त मांडण्यात आला, त्यात द्रविड लोक एतद्देशीय असल्याचं सांगून आर्यांनी त्यांच्यावर हल्ला केल्याचं दाखवलं गेलं, असं कॅलेंडरमध्ये म्हटलं आहे.
आर्यांच्या या आक्रमणाचं कथित मिथक खोटं असल्याचं कॅलेंडरमध्ये नोंदवलं आहे.
या संपूर्ण कॅलेंडरमध्ये वेद आणि पुराणांमधील दाखले देऊन भारतीय संस्कृतीचं वर्णन केलं आहे, तसंच श्री अरविंद व स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या थोर व्यक्तिमत्त्वांच्या अवतरणांचा आधार घेऊन कॅलेंडरमधील मांडणीचं समर्थन करण्यात आलं आहे.
कॅलेंडरनिर्मितीसाठीच्या सल्लागार मंडळात सदस्य म्हणून 'आयआयटी, खडगपूर'चे संचालक वीरेंद्र कुमार तिवारी, 'ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन'चे अध्यक्ष अनिल डी. सहस्रबुद्धे आणि अर्थ मंत्रालयातील मुख्य आर्थिक सल्लागार संजीव संन्याल यांचा समावेश आहे.
वाद आणि विरोध
आयआयटीच्या या कॅलेंडरचं प्रकाशन झाल्यानंतर विविध संघटनांनी त्याचा विरोध करायला सुरुवात केली आहे.
देशातील आघाडीच्या तंत्रशिक्षण संस्थेचा आणि कॅलेंडरमध्ये उल्लेख आलेल्या विषयांचा संबंध काय, असा प्रश्नही उपस्थित केला जातो आहे. या कॅलेंडरचा विरोध करत संस्थेच्या आवारासमोर निदर्शनंही झाली आहेत.

फोटो स्रोत, IIT Kharagpur
'सेव्ह एज्युकेशन कमिटी' या संस्थेचे तपन दास म्हणतात, "आयआयटीचं हे कॅलेंडर म्हणजे इतिहास आणि तथ्यं यांचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आहे. यात आर्यांचं आक्रमण हे मिथक असल्याचं सांगून इतिहास पुसण्याचा खटाटोप करण्यात आला आहे. या सगळ्याचं समर्थन करताना अवैज्ञानिक व दुबळे युक्तिवाद करण्यात आले आहेत. संस्थेचं व्यवस्थापन आणि काही शिक्षण स्वतःच्या महत्त्वाकांक्षांपायी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भारतीय जनता पक्ष यांच्या सूचनेनुसार चालणाऱ्या केंद्र सरकारचा अजेंडा पुढे नेत आहेत."
आयआयटी, खडगपूरच्या आवारासमोर निदर्शनं करणाऱ्या 'अखिल भारत शिक्षा बचाओ समिती' या संघटनेच्या म्हणण्यानुसार, सदर कॅलेंडर संघ परिवाराच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला बळकटी देणारं आहे.
संघटनेच्या पश्चिम बंगाल शाखेचे सचिव तरुण नस्कर म्हणतात, "या कॅलेंडरमध्ये भारतीय ज्ञानव्यवस्थांच्या नावाखाली विविध पौराणिक गोष्टींना आणि इतिहासबाह्य बाबींना विज्ञान व इतिहास म्हणून सादर करण्यात आलं आहे. या देशातील विज्ञानशिक्षणाच्या क्षेत्रावरचा कलंक ठरणारी ही घटना आहे."

फोटो स्रोत, Iit kharagpur
हे कॅलेंडर हिंदुत्ववाद थोपवणारं आणि इतिहासाचा विपर्यास करणारं आहे, अशी टीका अनेक संघटनांनी केली आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या 'गणशक्ती' या मुखपत्राने सदर कॅलेंडरविरोधातील बातम्या छापल्या आहेत. पश्चिम बंगाल विज्ञान मंचानेसुद्धा या कॅलेंडरवर टीका केली आहे.
आर्यांसंबंधीचा दावा
पश्चिम बंगाल विज्ञान मंचाचे अध्यक्ष तपन साहा म्हणतात, "या कॅलेंडरद्वारे विविध काल्पनिक युक्तिवादांना इतिहास म्हणून सादर करण्याचा प्रयत्न झाला आहे. सिंधू संस्कृती आणि आर्य सभ्यता या संदर्भात कॅलेंडरमध्ये संशोधनाच्या नावाखाली जे लिहिण्यात आलं आहे ते निराधार आहे. हे कॅलेंडर हिंदुत्ववादी विचारसरणी लादणारं आहे, आणि त्याला केंद्र सरकारचं पाठबळ लाभलं आहे."

फोटो स्रोत, Iit kharagpur
आयआयटीचं हे कॅलेंडर राजकीय खेळाचा भाग असून इतिहासाचा विपर्यास करणारं आहे, असं कोलकात्यातील रवींद्र भारती विद्यापीठामध्ये इतिहासाचे प्राध्यापक असणारे डॉ. सुस्नात दास यांनी म्हटलं आहे.
बीबीसी हिंदीशी बोलताना डॉ. दास म्हणाले, "आयआयटीमध्ये इंजिनीयर आणि वैज्ञानिक तयार होत असतात. त्यात समाजविज्ञान, साहित्य व इतिहास या संदर्भात विशेष जागृती नसते. या पार्श्वभूमीवर असे दावे करून त्यांना इतिहासाविषयी चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न होतो. हा शिक्षणाच्या भगवेकरणाचा व इतिहासाच्या विपर्यासाचा प्रयत्न आहे. याला केंद्रातील सत्तारूढ पक्षाची संमती आहे."
सर्व प्रमुख इतिहासकारांनी प्राचीन सभ्यतेसंदर्भात संशोधन करून विशिष्ट निष्कर्ष काढलेले आहेत. आर्यांचं आक्रमण, हे एक प्रस्थापित झालेलं व सर्वस्वीकृत तथ्य आहे. ते लोक मध्य आशियातून भारतात आले होते. शंभर वर्षांपूर्वीच सिद्ध झालेली तथ्यं अशा कॅलेंडरच्या माध्यमातून पुसण्याचा प्रयत्न निराधार व हास्यास्पद आहे.
डॉ. दास म्हणतात, "आयआयटीने आर्यांचं आक्रमण हे मिथक ठरवून आत्तापर्यंतच्या सिद्ध विचारांनाच खोटं ठरवण्याची खटपट केली आहे. भारतावर मुस्लिमांनीच हल्ला केला, आर्यांनी नव्हे, असं दाखवायचा हा प्रयत्न आहे."
इतिहासाचे माजी शिक्षक रंजन कुमार दास यांच्या म्हणण्यानुसार, "आर्यांच्या आक्रमणाचा इतिहास खूप जुना आहे. केवळ एका कॅलेंडरद्वारे हा इतिहास पुसता येणार नाही."
सह्यांची मोहीम
दरम्यान, आयआयटीचे एक माजी विद्यार्थी आशिष रंजन यांनी या कॅलेंडरच्या प्रदर्शनाविरोधात सह्यांची मोहीम सुरू केली आहे.
त्यांनी आयआयटीच्या संचालकांकडे एक अर्ज केला आहे. सदर कॅलेंडरमध्ये नोंदवलेल्या गोष्टींचा विरोध करताना रंजन यांनी वैज्ञानिक दाखले दिले आहेत.
'द फॉर्मेशन ऑफ ह्यूमन पॉप्युलेशन इन साऊथ अंड सेंट्रल एशिया' या मथळ्याच्या शोधनिबंधाचा हवाला देऊन रंजन लिहितात की, भारतात 60 हजार वर्षांपूर्वी माणसं आली, आणि हळुहळू उपखंडात त्यांची वस्ती पसरत गेली. त्यानंतर इसवीसनपूर्व चार हजार वर्षं आधी इराणहून आणखी माणसं आली.
आशिष रंजन बीबीसीला म्हणाले, "इराणहून काही लोक भारतात आले, ही जगभर सर्वमान्य झालेली बाब आहे. परंतु, सदर कॅलेंडरने या मान्यतेला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यासाठी कोणत्याही संशोधनाचा आधार घेतलेला नाही."
देशातील सर्वांत जुनं आयआयटी म्हणून खडगपूरमधील आयआयटी ओळखलं जातं, पण अशा प्रचारी कॅलेंडरने या संस्थेच्या प्रतिमेला धक्का बसेल. कोणत्याही संशोधनाविना संस्थेच्या कॅलेंडरमध्ये हे दावे करण्यात आले आहेत.
'आयआयटी, खडगपूर'ने संस्थेच्या मुख्य कार्यक्षेत्राचा भागही नसलेल्या विषयामध्ये अशा रितीने काही मुद्दे मांडणं औचित्यालाही धरून नाही, असं रंजन म्हणतात.
माजी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांनी आयआयटी, खडगपूरच्या या कॅलेंडरचा निषेध केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत एक हजारांहून अधिक माजी विद्यार्थ्यांनी असा अर्ज संस्थेच्या संचालकांकडे पाठवला आहे.
संस्थेचं प्रत्युत्तर
आयआयटीमधील 'सेंटर फॉर एक्सलन्स फॉर इंडियन नॉलेज सिस्टम्स' या केंद्राचे प्रमुख प्राध्यापक जय सेन यांनी सदर कॅलेंडरसाठी सामग्री गोळा करून त्याची मांडणी केली आहे.
कॅलेंडरसंदर्भात वाढत असलेल्या वादाला प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, "सत्य मांडणं हा या कॅलेंडरचा उद्देश आहे. समाजमाध्यमांवर बहुतांश लोकांनी या प्रयत्नाचं कौतुक केलं आहे."
या कॅलेंडरमध्ये कोणताही वादग्रस्त मुद्दा नोंदवलेला नाही, असा प्राध्यापक सेन यांचा दावा आहे. आर्यांच्या आक्रमणाचं मिथक उभं करून भारताचा खोटा व भ्रामक इतिहास मांडण्यात आला आणि सदर कॅलेंडर त्याच भ्रामकतेचा विरोध करतं, असं त्यांचं म्हणणं आहे. कॅलेंडरच्या बाराही पानांवर वैज्ञानिक युक्तिवाद करण्यात आले असून त्यासाठी 12 पुरावेही देण्यात आले आहेत, असं ते सांगतात.
प्राध्यापक सेन पुढे म्हणतात, "हे कॅलेंडर इतका गहजब उडवेल असं आमच्या कल्पनेतही आलं नव्हतं. कॅलेंडर छापून आल्यानंतर आम्हाला पाठवण्यात आलेल्या हजारो ई-मेलमध्ये बहुतांशाने या प्रयत्नाचं कौतुकच करण्यात आलं आहे. युरोप आणि अमेरिका इथल्या अनेक शिक्षणसंस्थांनी या कॅलेंडरमधील प्रत्येक पानासंदर्भात वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित करण्याची इच्छा दाखवली आहे."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























