नरेंद्र मोदी यांच्या कोरोना संकटातही पंजाबमध्ये प्रचारसभा #5मोठ्याबातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी, कोरोना, भाजप, पंजाब

फोटो स्रोत, NurPhoto

फोटो कॅप्शन, पंतप्रधान नरेंद्र मोदी
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईटस यांचा घेतलेला आढावा

1.कोरोना संकटातही पंतप्रधानांची सभा

वाढत्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये राज्य सरकारने विविध निर्बंध लागू करण्यात आले असले तरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येत असलेल्या राजकीय सभांना मात्र कोणतेही निर्बंध लागू नसल्याचे दिसून येत आहे.

फिरोजपूर येथे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकीय सभा होणार असून ही सभा नियोजित वेळेनुसारच होणार आहे, अशी माहिती भाजपचे राज्य सरचिटणीस सुभाष शर्मा यांनी सांगितलं. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

पंतप्रधानांची राजकीय सभा कोरोनामुळे रद्द केली जाणार नाही. ही भाजपची सभा नसून केंद्र व राज्य सरकारचा संयुक्त कार्यक्रम असल्याचे शर्मा यांनी सांगितले.

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी हेही या कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या कार्यक्रमांना कोणाचाही विरोध नसेल, असे शर्मा यांनी सांगितले.

फिरोजपूर येथील वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या उपग्रह केंद्राचा पायाभरणी कार्यक्रम, दोन वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन आणि इतर कार्यक्रमांना पंतप्रधान उपस्थित राहाणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.

या वेळी पंतप्रधानांची सभाही होणार असून या सभेला राज्याच्या विविध भागांतील तीन लाख नागरिक उपस्थित राहाण्याची अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचीही सभा मंगळवारी आयोजित करण्यात आली असून अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल हे लांबी मतदारसंघात गावबैठका घेणार आहेत, अशी माहिती एका भाजप नेत्याने दिली आहे.

2. तर रश्मी ठाकरे मुख्यमंत्री म्हणून राज्याचं नेतृत्व करतील: अब्दुल सत्तार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठरवलं तर रश्मी ठाकरे राज्याचं नेतृत्व करु शकतील, असं शिवसेना नेते आणि ठाकरे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे.

"उद्धव साहेबांचा आदेश असला तर काहीही होऊ शकतं. मला वाटतं उद्धवसाहेब रश्मी ताईंवर जबाबदारी देऊ शकतात. आता त्या सामनाच्या मुख्य संपादक म्हणून काम करत आहेत.

"लोकशाहीच्या मार्गाने जनतेपर्यंत कसं पोहोचलं पाहिजे, त्यांना न्याय देण्यासाठी कशा उपाययोजना करायला पाहिजे, हे रश्मीताईंना चांगल्या प्रकारे माहिती आहे. राज्यात एक आदर्श महिला म्हणून त्यांचं नाव आहे,", असं अब्दुल सत्तार म्हणाले. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, महाविकास आघाडी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रश्मी ठाकरे

"बाळासाहेबांच्या नंतर उद्धवजी आणि त्यानंतर रश्मी ठाकरे उत्तम प्रकारे काम करु शकतील. रश्मी ठाकरे आज पदड्यामागे काम करत आहेत. त्या पडद्याच्या पुढे नाहीत. पण त्यांना महाराष्ट्रातील राजकारण बऱ्यापैकी माहिती असतं. कारण त्या उद्धव साहेबांच्या, आदित्यसाहेबांच्या सोबत राहतात. उद्धवजी, आदित्य साहेब कसं काम करतात, या सर्वांच्यापेक्षा एक महिला म्हणून त्यांचं नियोजन, महिला सक्षमीकरणासाठी तसंच बळकटीकरण काय करायला हवं, याविषयी त्यांचं चिंतन आहे," असं सत्तार म्हणाले.

3. वैष्णोदेवीत एकाच कॉलेजात 140 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह

जम्मू काश्मीरमधील श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठ येथे करोनाचा बॉम्ब फुटला असून एकाचवेळी विद्यापीठातील तब्बल 140 विद्यार्थ्यांना करोना संसर्गाची लागण झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

आरोग्य विभागाने विद्यापीठात विशेष टीम पाठवली असून तातडीने पुढील पावले टाकण्यात येत आहेत. दरम्यान, विद्यापीठाचे नियमित वर्ग आधीच बंद करण्यात आले आहेत.

देशात कोविड बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना जम्मू काश्मीरमध्येही गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. त्यात मंगळवारी राज्यात 350 नवे रुग्ण आढळले असून त्यातील 140 रुग्ण श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठातील असल्याने सगळेच हादरले आहेत. 'दैनिक जागरण'ने ही बातमी दिली आहे.

विद्यापीठाचे रजिस्ट्रार नागेंद्र जम्वाल यांनीही या माहितीला दुजोरा दिला. जे विद्यार्थी करोना बाधित आहेत त्यांना विद्यापीठातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

4.मंत्री जितेंद्र आव्हाडांवर अट्रॉसिटी दाखल करा-वकील सदावर्ते

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दलित, महार हे आक्षेपार्ह शब्द वापरले आहेत, जे न्यायालयाने प्रतिबंधित केले आहेत. त्यांनी अशा शब्दांचा सार्वजनिकरीत्या वापर केला आहे.

समूहाचा अपमान करतानाच दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या आकांक्षेने त्यांनी ठाणे येथील सावित्रीच्या लेकी कार्यक्रमात हे भाष्य केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 'माय महानगर'ने ही बातमी दिली आहे.

एका संवैधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने झालेला हा गंभीर अपराध आहे. त्यामुळे आव्हाडांविरोधात अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांची या वक्तव्याच्या प्रकरणात चौकशी व्हावी अशीही मागणी त्यांनी केली आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गुणरत्न सदावर्ते, ओबीसी

फोटो स्रोत, FACEBOOK/JITENDRA AWHAD

फोटो कॅप्शन, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

मुंबई महापालिकेची निवडणूक पाहता जातीय दंगल भडकवण्याच्या उद्देशाने गलिच्छ राजकारण करण्याच्या मानसिकतेत आव्हाड आहेत. त्यामुळे आव्हाडांना अनुसुचित जातीच्या वस्त्यांमध्ये जाण्यास प्रतिबंध करावा असेही या तक्रारीत म्हटले आहे.

5. बांगलादेशचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

बांगलादेशने टेस्टचा दर्जा मिळाल्यापासून पहिल्यांदाच म्हणजे 22 वर्षांत पहिल्यांदा न्यूझीलंडला हरवण्याची किमया केली.

माऊंट मॅघनई इथे झालेल्या टेस्टमध्ये बांगलादेशने न्यूझीलंडवर 8 विकेट्सनी विजय मिळवला. फास्ट बॉलर इबादत हुसेन या विजयाचा शिल्पकार ठरला. 'न्यूज18'ने ही बातमी दिली आहे.

बांगलादेश, न्यूझीलंड

फोटो स्रोत, Hannah Peters

फोटो कॅप्शन, एबादत हुसेन

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 328 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशने 458 धावांचा डोंगर उभारला.

चार बॅट्समननी अर्धशतकी खेळी केली. एबादत हुसेनच्या 6विकेट्सच्या बळावर बांगलादेशने न्यूझीलंडचा दुसरा डाव 169 धावांत गुंडाळला.

बांगलादेशला विजयासाठी 40 धावांचं लक्ष्य मिळालं. त्यांनी 2 विकेट्स गमावून हे लक्ष्य गाठलं. एबादतला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. या विजयासह बांगलादेशने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)