'12 कोटींची परदेशी बनावटीची गाडी वापरणाऱ्यांनी फकीर म्हणवून घेऊ नये', सामनातून टीका #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, PRAKASH SINGH
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी #पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा
1. 12 कोटींची परदेशी बनावटीची गाडी वापरणाऱ्यांनी फकीर म्हणवून घेऊ नये - संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोख या सदराच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींवर परखड टीका केली आहे. प्रधानसेवक म्हणून वावरणाऱ्या मोदींनी 12 कोटींची परदेशी बनावटीची गाडी घेतली. त्यामुळं त्यांनी यापुढं स्वतःला फकीर म्हणवून घेऊ नये असं राऊतांनी म्हटलं आहे.
राऊत यांनी गाडीच्या मुद्द्यावरून टीका करताना राऊत यांनी भाजपकडून नेहमी टीका होणाऱ्या नेहरूंचीही तुलना मोदींबरोबर केली. मेक इन इंडिया, स्वदेशीचा नारा देणारे परदेशी बनावटीची गाडी वापरतात. नेहरूंनी मात्र कायम स्वदेशी बनावटीची अॅम्बेसेडरच वापरली, असं राऊत म्हणाले.
"भाजपची सत्ता कधीही जाणार नाही असं त्यांना वाटतं. पण पश्चिम बंगालनं त्यांना धडा शिकवला. कोलकाता महापालिकेतही ते पराभूत झाले. आता नव्या वर्षात विधानसभेच्या निवडणुकांतही त्यांची घसरगुंडी होईल.
कालीचरण यांच्या कृत्याचा भाजपनं निषेधही केला नाही. त्यामुळं गांधींवर हल्ले करणाऱ्यांचे विचार मान्य असणाऱ्यांनी त्यांच्या जयंतीला समाधीवर नतमस्तक होण्याचं ढोंग तरी करू नये."
पंतप्रधानांनी गंगास्नान केल्यामुळं कोरोना वाहून गेलेला नाही किंवा लोकांचं नैराश्यही दूर झालेलं नाही. 2022 मध्ये तरी शहाणे व्हा. कारण चुकीच्या लोकांना अंबारीत बसवण्याचं काम तुमच्यात हातून घडलं असावं असंहा राऊत म्हणाले आहेत.
2. नारळाची कुस्ती जिंकून राणे हिंद केसरीची बरोबरी करू शकत नाही-शंभूराज देसाई
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'टीव्ही 9' नं याबाबतचं वृत्त दिलं.
नारायण राणे हे बत्ताशावरचे पहिलवान आहेत. त्यामुळं नारळावरची कुस्ती जिंकून ते हिंदकेसरीची बरोबरी करू शकत नाही, असं शंभुराजे देसाई यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जिल्हा बँकेच्या निवडणुका मर्यादीत मतदारांच्या असतात. भविष्यात जनमताचा कौल घेण्यासाठी पुढे या, तेव्हा शिवसेनेची शक्ती कळेल अशा शब्दात देसाई यांनी राणेंना आव्हान दिलं.
दरम्यान, आगामी विधानसभेत महाराष्ट्रात भाजपची सत्ता येईल असंही राणे म्हणाले. आम्हाला भाजपचा मुख्यमंत्री पाहिजे, लगानची टीम नको असंही त्यांनी म्हटलं होतं. तर पोस्टर लावण्यावरूनही त्यांनी शिवसेनेवर टीका केली.
3. परदेशी देणगी स्वीकारणाऱ्या 6000 सामाजिक संस्थांची नोंदणी रद्द
परदेशी देणगी घेणाऱ्या 6000 संस्थांची नोंदणी 1 जानेवारीपासून रद्द झाली आहे. यापैकी काही संस्थांनी परदेशी देणगी नियमन (एफसीआरए) परवाना नूतनीकरण केलं नसेल, किंवा त्यांचे अर्ज फेटाळले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 'लोकसत्ता'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, भारतीय लोक प्रशासन संस्था, मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय), इमॅन्युएल हॉस्पिटल असोसिएशन, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, आयआयटी दिल्ली यासह इतर संस्थांचा समावेश आहे.
एफसीआरए कायद्यानुसार सामाजिक संस्थांना (एनजीओ) ही नोंदणी करणं अनिवार्य असतं. जवळपास 5789 संस्थांनी नुतणीकरणच केलं नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
यासाठीची नोंदणीची मुदत संपण्याआधी संस्थांना परवाना नुतणीकरण करण्याबाबत सूचना पाठवण्यात आल्या होत्या. तरी अनेक संस्थांनी अर्ज केले नाही त्यामुळं त्यांची परवानगी रद्द झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
4. कोरोनाच्या धोक्यात शिवसेनेच्या जत्रोत्सवात प्रचंड गर्दी, कारवाई करण्याची भाजपची मागणी
कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत असताना नागरिकांडून मात्र नियमांची ऐशी-तैशी केली जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्यात अंधेरीतल्या एका कार्यक्रमामुळं शिवसेनेलाच मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचा विसर पडला का? असा सवाल केला जात आहे. 'एबीपी माझा'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
अंधेरीमध्ये शिवसेनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मालवणी जत्रोत्सवाला प्रचंड गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. गर्दीचे नियम मोडत कोरोना नियमांची पायमल्ली याठिकाणी होत असल्याचं सांगितलं जात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अंधेरी पोलीस स्टेशन समोरच हा जत्रोत्सव होत आहे. महापौर मॉलसारख्या ठिकाणी पाहणी दौरे करतात मग अशा कार्यक्रमांना परवानगी कशी मिळते, हा देखील मुद्दा उपस्थित होत आहे.
या प्रकरणी आयोजकांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी भाजपच्या नेत्यांनी केली आहे. मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्यानं वाढत असताना अशा कार्यक्रमांवरून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
5. एकनाथ शिंदे सक्षम त्यांच्यावर मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी टाकावी, दानवेंचा सल्ला
उद्धव ठाकरे यांचं आजारपण आणि मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी यावर आणखी एका भाजप नेत्यांनी भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे सक्षम आहेत, त्यांना शिवसेनेनं मुख्यमंत्री करावं असा सल्ला केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिला आहे. 'दिव्य मराठी'नं हे वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, EKNATH SHINDE/FACEBOOK
उद्धव ठाकरे आजारी आहेत. पण राज्याचा कारभार चालवायला कुणीतरी मुखिया पाहिजे. एकनाथ शिंदे हे सक्षम आहेत. त्यामुळं त्यांना मुख्यमंत्री करायला काय हरकत आहे, असं दानवे यांनी म्हटलं आहे.
शिवसेनाच नव्हे तर तुम्ही इतर कुणालाही मुख्यमंत्री पद द्या. राष्ट्रवादीला द्या, अजित पवारांना द्या पण कोणाला तरी हे पद द्यावं असं ते म्हणाले आहेत.
नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. त्यावरुनही विरोधकांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























