You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना : अमित शहांच्या रॅलीत प्रचंड गर्दी #5मोठ्याबातम्या
विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.
1. अमित शहांची बरेलीमध्ये प्रचंड गर्दीमध्ये जनविश्वास यात्रा
ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी विविध निर्बंध लादल्याचं पाहायला मिळालं. मात्र केंद्रीय नेत्यांच्या उपस्थितीतच नियम पायदळी तुडवले जात आहेत.
उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये भाजपच्या जनविश्वास यात्रेमध्ये तुफान गर्दी असल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ही यात्रा झाली. 'एबीपी माझा'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
"आजच्या यात्रेमध्ये मोठ्याप्रमाणात प्रेम आणि आशीर्वाद दिल्यामुळे बरेलीच्या जनतेचं आभार मानतो," असं अमित शहा यांनी ट्विट केलं आहे.
शुक्रवारी कुतुबखाना येथून अमित शाह यांचा रोड शो सुरू झाला. त्यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, मंत्री संतोष गंगवार यांची उपस्थिती होती. या यात्रेत प्रचंड गर्दी झाल्याचा व्हीडिओ एएनआय या वृत्तसंस्थेन प्रसिद्ध केला.
सोशल मीडियावर यामुळं अनेक प्रतिक्रिया येत आहेत. उत्तर प्रदेश निवडणुकीत महत्त्वाच्या असलेल्या मतदारांचा जीव या माध्यमातून धोक्यात घातला जात असल्याचं सोशल मीडियावर म्हटलं जात आहे.
2. '...तर महाराष्ट्रात लॉकडाऊन'
महाराष्ट्रात जानेवारी आणि एप्रिल महिन्यात कोरोनाचा स्फोट होण्याची शक्यता असल्याचं वक्तव्य राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिलं आहे. तसंच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचंही ते म्हणाले.
लोकांनी जर कोरोनाचे नियम पाळले नाही आणि परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवता आलं नाही, तर पुन्हा एकदा लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय नसल्याचंही वडेट्टीवार म्हणाले. 'लोकसत्ता'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
राज्यात शुक्रवारी कोरोनाच्या 8 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नव्याने नोंद झाली आहे. त्यामुळं स्थिती गंभीर होत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही रुग्णवाढीच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली होती. टास्क फोर्सच्या बैठकीत कठोर निर्बंधांबाबत चर्चा झाली. मात्र लॉकडाऊनचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील, असंही टोपेंनी सांगितलं.
3. बैलगाडा शर्यतीवर आता कोरोनाचं सावट
सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, कोरोनाच्या सावटामुळं पुन्हा या एकदा या शर्यतींवर संकट निर्माण झालं आहे. 'टीव्ही 9 मराठी'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मावळ आणि आंबेगाव येथील बैलगाडा शर्यतींची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारली आहे. त्यामुळं नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शर्यतीसाठी उत्सुक असणाऱ्यांच्या आनंदावर विरजन पडलं आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. राज्यात 8 हजारांपेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर पुणे शहरात 412 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळं ही शर्यत तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी या स्पर्धांचं आयोजन केलं होतं.
4. माफियाराज संपवण्यासाठी मठ सोडून राजकारणात प्रवेश - योगी आदित्यनाथ
माफियाराज संपवण्यासाठीच मठ सोडून राजकारणामध्ये प्रवेश केल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यराज यांनी सांगितलं आहे. 'ई सकाळ'नं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
लहान असताना माफिया लोकांची घरं बळकावत होते. माझंही घर बळकावण्याचा प्रयत्न केला पण मी त्यांना चोप दिला. तेव्हाच राजकारणात जाऊन माफियाराज संपवायचं ठरवलं होतं, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.
माफिया हा कोरोनापेक्षाही गंभीर असून त्याला कोणताही धर्म किंवा जात नसते असंही योगी म्हणाले. दरम्यान, उत्तर प्रदेश निवडणुकीत मोठ्या विजयाचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीत भाजपला 350 पेक्षा जास्त जागा मिळतील असं योगी आदित्यनाथ म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मदतीनं राज्यात मोठा विकास करत असल्याचा दावा त्यांनी केला.
5. वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी कालीचरण महाराजांची न्यायालयीन कोठडीत रवानगी
महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कालीचरण महाराज यांची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी करण्यात आली आहे. 13 जानेवारीपर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
रायपूरमध्ये कालीचरण महाराज यांच्यावर कलम 505(2) आणि 294 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंतर पोलिसांनी यात 124 अ म्हणजे देशद्रोहाचं कलमही जोडलं. 'एनडीटीव्ही'नं याबाबतचं वृत्त दिलं.
कालीचरण यांच्या पोलिस कोठडीची मुदत शनिवारी संपणार होती. मात्र, चौकशी आधीच पूर्ण झाल्यानं पोलिसांनी एक दिवस आधी शुक्रवारीच त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केलं आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याची विनंती करण्यात आली.
कालीचरण यांनी मध्यप्रदेशच्या खजुराहोमधून अटक करण्यात आली. पण रायपूर पोलिसांनी कारवाईपूर्वी पूर्वकल्पना दिली नव्हती असा दावा मध्यप्रदेश सरकारनं केला आहे. त्यामुळं मध्यप्रदेशातील भाजप सरकार आणि छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारमध्ये वाद निर्माण झाला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)