महाराष्ट्र कोरोना : ओमिक्रॉनचा शोध कसा घेतला जातोय?

    • Author, मयांकत भागवत
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची तिसरी लाट आता सुरू झाली आहे. राज्यात पसरणारी ही लाट कोव्हिड-19 चा नवीन व्हेरियंट ओमिक्रॅानची आहे, असं तज्ञांचं मत आहे.

बीबीसीशी बोलताना महाराष्ट्र कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॅा शशांक जोशी सांगतात, "मुंबईत ओमिक्रॅान व्हेरियंटने 80 टक्के डेल्टा व्हेरियंटची जागा घेतली आहे. यात आता काहीच दुमत नाही."

राज्यात झपाट्याने पसरणाऱ्या ओमिक्रॅानचा प्रसार कुठे आणि किती प्रमाणात झालाय. याचा शोध घेणं राज्य आणि केंद्र सरकारने सुरू केलं आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ओमिकॉनचा शोध कसा घेतला जातोय? जाणून घेण्याआधी जिनोम सिक्वेंसिंग चाचणीच्या काय समोर आलं, ते पाहूया.

मुंबई महापालिकेनं काय सांगितलं?

मुंबई महापालिकेने 15 डिसेंबरला कोव्हिड जिनोम सिक्वेंसिंग चाचणीच्या सहाव्या फेरीत काय समोर आलं याची माहिती दिली होती.

एकूण 297 नमुन्यांमध्ये 35% डेल्टा व्हेरिअंट, 62% डेल्टा डेरिव्हेटीव्ह, 2% ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले होते.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल सांगतात, "297 नमुन्यांपैकी 183 नमुने 'डेल्टा डेरिव्हेटीव्ह' या उप प्रकाराचे तर 105 नमुने 'डेल्टा व्हेरिअंट'ने बाधित आढळून आले."

2 % म्हणजेच फक्त 7 नमुने ओमिक्रॅानचे असल्याचं निदर्शनास आलं होत. 297 पैकी 19 रुग्णांनी लशीची पहिली मात्रा घेतलेली होती. यापैकी ३ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले.

ओमिक्रॅानचा शोध घेण्यासाठी जिनोम सिक्वेसिंगची मदत

भारतात सर्वांत पहिल्यांदा परदेशातून आलेल्या प्रवाशांमध्ये ओमिक्रॅान व्हेरियंट आढळून आला होता.

कोव्हिड-19 च्या नवीन व्हेरियंटचा संसर्ग झाला की नाही याची माहिती पॅाझिटिव्ह सॅम्पलचं जिनोम सिक्वेंसिग केल्यानंतर कळते.

त्यामुळे ओमिक्रॅानचा प्रसार शोधण्यासाठी कोरोना पॅाझिटिव्ह सॅम्पलचं जिनोम सिक्वेंसिग केलं जातंय.

राज्य सरकारने मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ओमिक्रॉन कुठपर्यंत पसरलाय हे शोधण्यासाठी कोव्हिड पॅाझिटिव्ह रुग्णांचं जिनोम सिक्वेंसिंग करण्याचा निर्णय घेतलाय.

पुण्याच्या बी.जे.मेडिकल कॅालेजच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॅा. राजेश कार्यकर्ते, राज्याच्या जिनोम सिक्वेंसिंगचे स्टेट को-ओर्डिनेटर आहेत.

बीबीसीशी बोलताना ते सांगतात, "ओमिक्रॅानचा शोध घेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मुंबईत 300 आणि पुण्यात 100 नमुन्यांचं जिनोम सिक्वेंसिंग करण्याचा निर्णय घेतला आहे." 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत हे जिनोम सिक्वेंसिंग करण्यात येईल.

नोव्हेंबर महिन्यात दक्षिण अफ्रिकेत पहिल्यांदा ओमिक्रॅान आढळून आला होता.

राज्य सर्व्हेक्षण अधिकारी डॅा. प्रदीप आवटे बीबीसीशी बोलताना म्हणाले, "ओमिक्रॅानचा शोध घेण्यासाठी नोव्हेंबर महिन्यातच सुरूवात करण्यात आली. राज्यभरातून 1800 नमुने कम्युनिटी सर्व्हेक्षणाअंतर्गत जिनोम सिक्वेसिंगसाठी घेण्यात आले."

तर, मे महिन्यापासून आत्तापर्यंत 22000 नमुन्यांचं जिनोम करण्यात आलंय.

डॅा. राजेश कार्यकर्ते सांगतात, "CT म्हणजे कोव्हिड पॅाझिटिव्ह नमुन्याचा सायकल थ्रेशहोल्ड व्हॅल्यू (Cycle threshold) 25 आणि त्याचा आत असलेल्या नमुन्यांवर जिनोम करण्यात येईल."

राज्य सरकारने सुरू केलेल्या कम्युमिटी सर्व्हक्षणातून परदेशी प्रवास न केलेले 38 रूग्ण आढळून आलेत.

कोणत्या प्रयोगशाळेत घेतला जाईल ओमिक्रॅानचा शोध?

ओमिक्रॅान व्हेरियंटचा शोध घेण्यासाठी राज्यातील पाच प्रमुख प्रयोगशाळांची निवड करण्यात आलीये.

  • मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय
  • बी.जे.मेडिकल कॅालेज, पुणे
  • नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ व्हायरोलॅाजी, पुणे (NIV)
  • भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER)
  • एनसीसीएस (NCCS) पुणे

राज्याच्या जिनोम सिक्वेंसिंगचे स्टेट को-ओर्डिनेटर डॅा. राजेश कार्यकर्ते म्हणाले, "या सर्व प्रयोगशाळात दिवसाला 400 कोव्हिड पॅाझिटिव्ह नमुन्यांचं जिनोम सिक्वेसिंग करण्यात येतंय." तर NIV मध्ये परदेशातून येणारे प्रवासी आणि त्यांच्या थेट संपर्कात आलेल्यांचं जिनोम सिक्वेसिंग करण्यात येतंय.

तज्ज्ञ सांगतात, एका पॅाझिटिव्ह सॅम्पलचं जिनोम सिक्वेसिंग करण्यासाठी साधारणः तीन ते चार दिवस लागतात.

डॅा. कार्यकर्ते पुढे माहिती देतात, "सद्य स्थितीत 72 तासात आपण रिपोर्ट तयार करतोय."

जिनोम सिक्वेसिंग खूप खर्चिक आहे. एका सॅम्पलचा अभ्यास करण्याचा खर्च अंदाजे 5000 रूपये येतो.

'S' जिन नसेल तर ओमिक्रॅान असण्याची शक्यता?

कोरोनाबाधित रुग्णांच्या नमुन्यांत विविध प्रकारचे जिन किंवा जनुकं असतात. पण ओमिक्रॅानबाधित रुग्णांमध्ये S' जिन मिसिंग असल्याचं आढळून आलंय.

मुंबई महापालिके अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, "कोव्हिड पॅाझिटिव्ह रुग्णाच्या नमुन्यात S जिन मिसिंग असेल तर त्याला ओमिक्रॅान असण्याची शक्यता असते." त्यामुळे मुंबईतील रुग्णांची S जिन चाचणी केली जातेय.

जिनोम करण्याआधी कोव्हिड पॅाझिटिव्ह नमुन्याची S जिन चाचणी केली जातेय. पुण्यात येत्या काही दिवसात ओमिक्रॅानचा शोध घेण्यासाठी 4000 इंपोर्टेड किट्स येणार आहेत.

डॅा. कार्यकर्ते सांगतात, "जिनोम सिक्वेंसिंगसाठी राज्यभरातून नमुने घेण्यात आलेत. याचा रिपोर्ट जानेवारी महिन्यात येईल." 2000 पेक्षा जास्त नमुने असण्याची शक्यता आहे.

भारतात सामान्य RTPCR चाचणी करण्यासाठी लागणारं किट 19 रूपयांना तर SGFT असलेलं RTPCR किट 240 रूपयांना मिळतं.

राज्यभरात पुढील काही दिवसात 1 लाख टेस्ट करण्याचं ध्येय आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)