'मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही हिंदुत्व सोडलं'- अमित शाह #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. 'मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही हिंदुत्व सोडलं' - अमित शाह
"हिंमत असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा आणि महाविकास आघाडीने एकत्र लढून भाजपचा पराभव करून दाखवावा" असं खुलं आव्हान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरे सरकारला दिलं आहे.
रविवारी (19 डिसेंबर) पुण्यात भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
अमित शाह आपल्या भाषणात म्हणाले, "ही लोकमान्य टिळकांची भूमी आहे. ते म्हणाले होते स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवेनच. पण शिवसेनेसाठी सत्ता हाच त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आता मुख्यमंत्री बनले आहेत. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि तिन्ही पक्षांनी मिळून भाजपला हरवून दाखवावं. भाजपचा कार्यकर्ता लढण्यास तयार आहे."
महाराष्ट्राची जनता हिशोब करायला तयार आहे असंही ते म्हणाले. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
आपल्या भाषणात अमित शाह यांनी 2019 निवडणुकांपूर्वी झालेल्या बैठकांबाबतही भाष्य केलं. ते म्हणाले, "मी युतीची चर्चा करण्यासाठी आलो होतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे ठरलं होतं. ते म्हणतात मी खोटं बोललो. ठीक आहे. पण तुमच्या सभेत कोणाचे फोटो मोठे होते. तुम्हाला मुख्यमंत्री बनायचं होतं म्हणून तुम्ही खोटं बोलला. त्यासाठी तुम्ही हिंदुत्व सोडलं."
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अमित शाहांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, "सत्तेच्या गुर्मीत असलेले लोक अशा प्रकारची वक्तव्य करतात. केंद्र सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात राग आहे. त्यामुळे त्यांनीच आधी राजीनामा द्यावा."
लोकशाहीत गृहमंत्र्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं असून लोकशाहीचा सन्मान करायला शिका असंही ते म्हणाले.
2. शिवसेनेचे मंत्री बाळासाहेबांची संस्कृती विसरले का? - नवनीत राणा
शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्यांची तुलना अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांच्या गालाशी केल्याचं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. यावरून खासदार नवनीत राणा यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
गुलाबराव पाटील बाळासाहेब ठाकरेंची संस्कृती विसरले का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

फोटो स्रोत, Ganesh Pol/BBC
गुलाबरराव पाटील यांनी आपलं वक्तव्य मागे घेऊन तात्काळ माफी मागावी अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे. त्यांनी तसे न केल्यास आमच्या स्टाईलने निषेध नोंदवू असा इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिलं आहे.
या वक्तव्याबाबत गुलाबराव पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले, "माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील बोदवड याठिकाणी एका कार्यक्रमात मी रस्त्यांबाबत बोललो होते. चांगले रस्ते असावेत ही अपेक्षा होती. कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. हेमा मालिनी यांच्याविषयी मनात आदर आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
गुलाबराव पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपनेही केली आहे. भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. गृहमंत्रा दिलिप वळसे पाटील यांनी याची दखल घ्यावी असंही त्या म्हणाल्या आहेत.
3. कॉलेजच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार?
कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून राज्यातील महाविद्यालयीन परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होत आहेत. त्यात आता ओमिक्रॉन हा नवीन व्हेरिएंट आल्याने विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एकदा परीक्षांबाबत संभ्रम आहे.

फोटो स्रोत, facebook
यासंदर्भात बोलताना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले, परीक्षा घेण्यासंदर्भातील सर्व अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
ते म्हणाले, "परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन याचे अधिकार स्थानिक प्रशासनला दिले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून स्थानिक अधिकारी निर्णय घेतील."
लॉकडाऊन उठवल्यानंतर आता राज्यभरात महाविद्यालय सुरू झाली आहेत.
राज्य सरकारने कुलगुरुंच्या नियुक्तीबाबत सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात सुधारणा करायचं ठरवलं आहे. यापुढे कुलगुरू पदाच्या नियुक्तीसाठी राज्य सरकार राज्यपालांकडे शिफारस पाठवणार आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. यापुढे कुलगुरू शिवसेना ठरवणार असं माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार म्हणाले होते.
उदय सामंत त्यांनी यावेळी विद्यापीठ कुलगुरू नेमणुकीविषयी सुद्धा भाष्य केलं. "केंद्र सरकारने याबाबत जे धोरणं अवलंबलं आहे तेच आम्ही करतोय. आम्ही चुकत असू तर केंद्र सरकारही चुकत आहे."असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.
4. 'योगी सरकार आमचे फोन टॅप करत आहे' - अखिलेश यादव
योगी आदित्यनाथ आमचे फोन टॅप करत आहेत असा आरोप समाजवादी पार्टीचे अधयक्ष अखिलेश यादव यांनी केला आहे. केंद्रीय संस्थाच्या जोरावर विरोधकांना धमकवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असंही ते म्हणाले आहेत.

अखिलेश यादव यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी भाजपवर थेट आरोप करत मुख्यमंत्री आदित्यनाथ अनुपयोगी असल्याची टीका केली आहे.
ते म्हणाले, "आमचे फोन टॅप केले जात आहेत. योगी आदित्यनाथ स्वत: काही लोकांचे रेकॉर्डिंग ऐकतात. पत्रकारांनो तुम्हीही सावध राहा. भाजपला पराभवाची धास्ती आहे म्हणूनच आता दिल्लीहून नेते, त्यांचे मुख्यमंत्री, अध्यक्ष येतील."
सपाचे राष्ट्रीय सचिव राजीव राय आणि इतर काही नेत्यांच्या काही ठिकाणांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. भाजपला हारण्याची भीती आहे म्हणूनच अशी कारवाई केली जाते असंही ते म्हणाले आहेत. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
5. सोनाली पाटील 'बिग बॉस'मधून बाहेर
टिकटॉक स्टार सोनाली पाटील बीग बॉसमधून बाहेर पडली आहे. रविवारी (19 डिसेंबर) सोनालीने बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला.
विशाल निकम, विकास पाटील, मीरा जगन्नाथ,मीनल शाह, जय दुधाणे,उत्कर्ष शिंदे आणि सोनाली पाटील या सात जणांमधून कोण एलिमिनेट होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष होतं. आता अभिनेत्री आणि टिकटॉकस्टार सोनाली पाटील बाहेर पडली आहे.
सोनाली पाटील मुळची कोल्हापूरची असून टिकटॉकच्या माध्यमातून सोनालीचा चाहता वर्ग निर्माण झाला. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. वैजू नंबर वन या मालिकेद्वारे तिने मनोरंजन क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचे ग्रँड फिनाले लवकरच पार पडणार आहे. विजेत्याला 20 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. आता बिग बॉस मराठीत एकूण 6 स्पर्धक बाकी आहेत. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























