काशी विश्वनाथ मंदिराच्या कार्यक्रमात फक्त नरेंद्र मोदीच का दिसत होते?

फोटो स्रोत, Twitter/Shehzad_Ind
- Author, अनंत प्रकाश
- Role, बीबीसी हिंदी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडोअरच्या लोकार्पण सोहळ्यासाठी सोमवारी (13 डिसेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत दाखल झाले.
याचं कव्हरेज करण्यासाठी काशी विश्वनाथ मंदिर परिसरापासून ते गंगा घाटापर्यंत आणि बनारसच्या गल्लोगल्लीत वृत्तसंस्था, वर्तमानपत्रं आणि टीव्ही चॅनेलचे कॅमेरे आहेत.
पंतप्रधान मोदींसोबत संवाद साधण्याची संधी मिळावी यासाठी भाजपचे समर्थक, कार्यकर्ते आणि नेते सुद्धा इथे उपस्थित आहेत. भाजप आणि उत्तर प्रदेश सरकारसाठी हा कार्यक्रम किती महत्त्वाचा आहे याची प्रचिती यावरून येते की, पहिल्यांदाच निवडणुकीच्या काळात भाजपचे एवढे नेते एका ठिकाणी एकत्र जमले आहेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजपचे खासदार आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्री बनारसला पोहचले आहेत. परंतु कॅमेऱ्याने कैद केलेल्या दृश्यात, फोटोत एक बाब स्पष्ट दिसून येते ती म्हणजे, 'या कार्यक्रमाचे नायक' केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.
13 डिसेंबरला सर्व वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर दिलेल्या जाहिरांतींपासून ते मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या होर्डिंग्जवर फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी दिसत आहेत.
काशी विश्वनाथ मंदिरात आरती करण्यापासून ते बनारसचे घाट आणि गल्लोगल्ली केवळ मोदीच दिसतात. दरम्यान, इथे कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी अनेकदा सोबत दिसले.
वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातींमध्ये आतल्या पानावर योगी आदित्यनाथ यांच्या नावाने एक वक्तव्यही छापण्यात आलं. परंतु जाहिरातीत त्यांचा फोटो कुठेही दिसत नाही.

फोटो स्रोत, Twitter/kharge
उत्तर प्रदेश सरकारचे एक वरिष्ठ अधिकारी एसीएस (होम) अवनीश अवस्थी यांनी हे योगी सरकारच्या नियोजनाचाच भाग असल्याचं सांगितलं आहे.
वृत्तसंस्था एएनआयनुसार, ते म्हणाले की हा प्रकल्प 2018 साली सुरू झाला आणि आता तो संपला आहे.
मग जर काशी विश्वनाथ मंदिर कॉरिडोअर प्रकल्प योगी आदित्यनाथ यांच्या कार्यकाळात सुरू झाला तर मग ते पोस्टर्सवर कुठेही झळकत का नाहीत?
हिंदूहृदय सम्राटाची प्रतिमा?
उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी आयोजित झालेल्या कार्यक्रमांच्या जाहिरातींमध्ये योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान मोदी सोबत दिसले आहेत. म्हणूनच हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
11 डिसेंबरला सर्व वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर पूर्ण पेज जाहिरात छापण्यात आली. यात योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी सोबत दिसतात.
यापूर्वी 7 डिसेंबर, 6 डिसेंबर, 25 डिसेंबर आणि 16 नोव्हेंबर या दिवशी छापण्यात आलेल्या जाहिरातींमध्येही हेच दिसतं. यामुळे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे की, काशी विश्वनाथ मंदिराच्या कार्यक्रमाच्या जाहिरातींमधूनच योगी आदित्यनाथ यांचा फोटो गायब का आहे?
भाजपचे राजकारण जवळून पाहिलेले वरिष्ठ पत्रकार शरत प्रधान सांगतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची विशेष प्रतिमा त्यांना कायम राखायची आहे.

फोटो स्रोत, SANJAY KANOJIA / AFP
ते म्हणाले, "या जाहिराती केंद्र सरकारने दिल्या असतील तर यावरून हे स्पष्ट होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहमतीने हे झालं असावं. कारण त्यांच्यऐवजी इतर कोणाला प्रोजेक्ट केलं गेलेलं त्यांना चालणार नाही. विशेषत: काशी विश्वनाथ धाम प्रकरणात. कारण योगी आदित्यनाथ हे भगवाधारी असल्याने ते हिंदुत्वाचे सर्वात मोठे दावेदार बनतात. त्यामुळे मला असं वाटतं की या निवडणुकीत मोदींना आपली हिंदुत्वाची प्रतिमा कायम राखायची आहे. यात त्यांना इतर कोणाचाही हस्तक्षेप नको आहे."
खरं तर हा पहिलाच कार्यक्रम नाही ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अशाप्रकराच्या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा बनले आहेत.
प्रधान सांगतात, "त्यांना हे सुनिश्चित करायचं आहे की त्यांना सर्वात मोठे हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखलं जावं. हे खरं आहे की त्यांचे चाहते आहेत आणि लोक त्यांना पसंत करतात. ते विकासाविषयी सुद्धा बोलले. परंतु हिंदूहृदय सम्राट ही प्रतिमाच आपल्याला तारू शकते हे त्यांच्या लक्षात आलं असावं. त्यामुळे इतर कोणी यावर दावा करणार नाही याची काळजी ते घेत आहेत."

फोटो स्रोत, Twitter/BJP4India
"काही प्रमाणात योगी आदित्यनाथ यांची प्रतिमाही याला कारणीभूत आहे असं मला वाटतं. त्यांना असं वाटतं की योगी आदित्यनाथ त्यांच्याशी स्पर्धा करत आहेत आणि हे त्यांना मान्य नाही की इतर कोणी त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत आहे,"
याबाबत सध्यातरी योगी आदित्यनाथ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊ शकत नाहीत असं शरत प्रधान सांगतात.
ते म्हणाले, "योगी आदित्यनाथ सध्या कोणत्याही प्रकारे आव्हान देण्याच्या परिस्थितीत नाहीत. पण आदित्यनाथ यांची प्रतिमाही विकसित होत आहे. आगामी काळात 2021 नंतर मोदींसाठी ही परिस्थिती आव्हानात्मक होऊ शकते.
"कारण हिंदू-मुस्लीम करूनच निवडणुका जिंकायच्या असतील तर यात योगी हे मोदींच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतील. योगी आदित्यनाथ अत्यंत महत्त्वाकांक्षी आहेत. ते भगवा परिधान करतात आणि ते मोदींच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत. त्यामुळे पुढे ते आव्हान देऊ शकतात. म्हणूनच मोदी त्यांना प्रतिस्पर्धेपासून दूर ठेवत आहेत," प्रधान सांगतात.
योगींचा फोटो नसल्याचे राजकीय अर्थ काय आहेत?
भाजपने हा मेगा इव्हेंट उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित केला. मंदिर परिसरात आपण पाहिलं तर लक्षात येतं की अनेक ठिकाणी अजूनही काम सुरू आहे.
मग भाजपने हा कार्यक्रम घेण्याची घाई का केली असाही प्रश्न उपस्थित होतो. या प्रश्नाचे उत्तर अमित शाह, जेपी नड्डा किंवा दुसरे नेतेच देऊ शकतात. पण भाजप या कार्यक्रमाचा वापर यूपी निवडणुकीपूर्वी करणार असे संकेत मिळतात.
उत्तर प्रदेशच्या राजकारणाचे अभ्यासक ज्येष्ठ पत्रकार योगेश मिश्र म्हणाले, "हा भव्य कार्यक्रम पाहता आणि याच्या केंद्रस्थानी नरेंद्र मोदी आहेत असं स्पष्ट दिसत असताना याचा एकच अर्थ निघतो की, यूपी निवडणुकांबाबत ते आपली रणनीती बदलत आहेत."
ते दावा करतात, "सध्या उत्तर प्रदेशातील परिस्थिती पाहून भाजप निवडणूक जिंकेल असं दिसत नाही. कारण योगी आदित्यनाथ एक हिंदू नेता होते. पण त्यांची किंवा त्यांच्या आसपास असणाऱ्यांच्या चुकांमुळे आता ते एका जातीचे नेते बनले आहेत."

फोटो स्रोत, Twitter/BJP4India
ते पुढे सांगतात, "विकास केल्याचा कितीही दावा सरकार करत असली तरी विकासाची अशी कोणतीही कामं झालेली नाहीत ज्यामुळे जनतेत सरकारविषयी सकारात्मक प्रतिमा तयार होईल."
"यूपी सरकारच्या 95 टक्के मंत्र्यांनी सार्वजनिक कार्य केलेलं नाही. त्यामुळे या सरकारच्या कामकाजाच्या आधारे जिंकणं कठीण असल्याचा फीडबॅक पंतप्रधान मोदींना मिळाला असावा. त्यांना उत्तर प्रदेशच्या निवडणुका जिकांयच्या असल्याने ते आपली सर्व ताकद पणाला लावणार," असंही मिश्र सांगतात.
"नरेंद्र मोदी प्रचाराच्या रिंगणात एकटे उतरले तर जातीय राजकारणाच्या सीमा ओंलाडणं शक्य होईल. निवडणूक बहुसंख्याक विरुद्ध अल्पसंख्याक अशी होईल. आणि अशा परिस्थितीत भाजपचा कायम विजय होतो. ज्यावेळी जातीय राजकारण होतं तेव्हा प्रादेशिक पक्ष जिंकतात.
"गेल्या काही दिवसांत अखिलेश यादव यांनीही रॅली काढल्या. यात मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे निवडणूक आपल्या जबाबदारीवर लढणार असं मोदींनी ठरवलं असावं असं मला वाटतं. कारण त्यांच्या आमदारांचीही हीच इच्छा आहे," मिश्र सांगतात.
पंतप्रधान मोदींचा खास अंदाज
वर्तमानपत्रांतील एवढ्या जाहिरातींमध्ये योगी आदित्यनाथ यांची अनुपस्थिती केवळ योगायाग समाजायचा का?
यावर बोलताना शरत प्रधान म्हणाले, "अंधभक्तच याला केवळ योगायोग मानू शकतात. याचे अर्थ स्पष्ट आहेत आणि पंतप्रधान मोदींना यासाठी ओळखलंही जातं. त्यांना फ्रेम शेअर करणं पसंत नाही."
योगेश मिश्र सांगतात की, याला योगायोग मानला जाऊ शकत नाही. "कारण गुजरातपासून ते आज काशीपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शैली अशीच राहिली आहे. त्यांच्या फ्रेममध्ये दुसरं कोणीही येत नाही. काशी विश्वनाथ मंदिरात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कोणतेही योगदान नाही आणि मोदींना हा संदेश द्यायचा आहे की तेच सर्वेसर्वा आहेत."

फोटो स्रोत, Twitter/BJP4UP
ही निवडणूक मोदींच्या नावाने लढवली जाईल हे आता स्पष्ट होताना दिसत आहे. यापूर्वी रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा एकदाही उल्लेख केला नाही. त्यांचे कौतुक केले नाही. ते केवळ भाजप सरकारविषयी बोलत होते. पण मुख्यमंत्र्यांबद्दल ते बोलले नाहीत. हा सुद्धा संकेत होता.
यापूर्वी एका एक्सप्रेसचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात योगी आदित्यनाथ पीएम नरेंद्र मोदी यांच्या गाडीच्या मागे चालताना दिसत होते. हे सर्व संकेत आहेत.
"अयोध्येचं उदाहरण पाहिलं तर त्यावेळीही कॅमेऱ्यात मोदींव्यतिरिक्त दुसरं कोणीही दिसलं नव्हतं. फोटोंपासून कव्हरेजपर्यंत सगळीकडे तेच दिसत होते. ही त्यांची स्टाईल सुद्धा आहे आणि ते जे काम करत आहेत त्याचं श्रेय ते इतर कोणाला का घेऊ देतील."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























