बिपिन रावत : 'तामिळनाडू बनतोय नवीन काश्मीर' असं लिहिणाऱ्या यूट्यूबरला अटक #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा..
1) बिपिन रावत : 'तामिळनाडू बनतोय नवीन काश्मीर' असं लिहिणाऱ्या यूट्यूबरला अटक
तामिळनाडूत हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात भारताचे सीडीएस बिपिन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत ट्विटरवर आक्षेपार्ह लिहिणाऱ्या यूट्यूबरला तामिळनाडूतील मदुराई शहरात पोलिसांनी अटक केली आहे. मरिधास असं या यूट्यूबरचं नाव आहे.
द न्यूज मिंटनं ही बातमी दिली आहे.
'डीएमके पक्षाच्या सत्तेत तामिळनाडू आता नवीन काश्मीर बनू पाहतंय' असं ट्वीट मरिधास यांनी केलं होतं.
तसंच, लष्करी अधिकाऱ्याच्या अपघाताची मस्करी करत असल्याचा आरोप डीएमकेच्या कार्यकर्त्यांवर मरिधास यांनी केला. शिवाय, फुटीरतावादी गटांसाठी डीएमके आवडता पक्ष आहे हे नाकारता येणार नाही, असाही आरोप त्यांनी ट्वीटमधून केलाय.
काश्मीरबाबतच्या उल्लेखाचं ट्वीट आता डिलिट करण्यात आलंय. मात्र, डीएमकेवरील आरोपांचे ट्वीट अद्यापही मरिधास यांच्या टाईमलाईनवर आहेत.

फोटो स्रोत, Reuters
मरिधास यांना कलम 153 आणि कलम 505 (2) अंतर्गत मदुराई पोलिसांनी अटक केली आहे. याआधीही मरिधास यांच्याविरोधात धार्मिक तेढ निर्माण करणारा व्हीडिओ तयार केल्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.
2) मी मोदींसारखा नापास नाही, माझी गुणपत्रिका पाहू शकता - कन्हैया कुमार
ज्यांना देश वाचवायचा आहे, त्यांनी काँग्रेसमध्ये यावं आणि ज्यांना देश विकायचा आहे, त्यांनी भाजपमध्ये जावं, असं म्हणत असताना काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिक्षणावर टीका केली. मी मोदींसारखा नापास नाही, माझी गुणपत्रिका पाहू शकता, असं कन्हैया कुमार म्हणाले.
देशातील एक व्यक्ती रात्री येऊन टीव्हीवर काहीही बोलत असेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुमचं भलं होणार आहे, असं म्हणत कन्हैया कुमार यांनी मोदींवर निशाणा साधला. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"पंतप्रधान म्हणजे देश आहे का? पंतप्रधानांबद्दल काही बोललं की देशद्रोही ठरवलं जातं," असंही ते म्हणाले.
3) निवडणुका एकत्र घ्या किंवा सर्वच थांबवा - अजित पवार
महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. सुप्रीम कोर्टानं ओबीसींच्या जागांवरील निवडणुका थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "निवडणुका सगळ्याच एकत्र घ्या किंवा थांबवायच्या असतील तर सर्वच थांबवा या मतावर राज्य सरकार ठाम आहे." महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Twitter/Ajit Pawar
"राज्य चालवत असताना राज्यातील सर्वच घटकांना सोबत घेऊन जायचं असतं तीच भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. पण आता बाकीच्या सर्वसाधारण, एससी, एसटीच्या निवडणुका होणार आहेत आणि ओबीसींच्या होणार नाही हे न्यायाला धरुन नाही," असंही अजित पवार म्हणाले.
सुप्रीम कोर्टानं ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर दिलेल्या निर्णयावर पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, "चार - पाच राज्यात असाच प्रसंग आला होता. त्यावेळी न्यायव्यवस्थेने निकाल वेगळा दिला होता आणि महाराष्ट्रात असा निकाल वेगळा दिला आहे. राज्य सरकारने ज्यात दुरुस्ती केलेली होती, तो कायदा स्थगित केलेला नाही मात्र ओबीसींच्या जागांवरील निवडणूका थांबवल्या आहेत."
4) 'आमच्या जीवावर 18 खासदार आणले आणि आता....'
ज्यांनी आमच्या जीवावर 18 खासदार निवडून आणले, ते आता देशाच्या राजकारणात जायची स्वप्नं बघत आहेत. पण देशाच्या राजकारणात जायचं असेल तर त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं.
गेल्या दोन वर्षात एकदाही मंत्रालयात न गेलेल्यांनी वेगवेगळ्या वल्गना करू नये, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा पंतप्रधान पुन्हा होणे शक्य नाही. कोव्हिड काळात केंद्र शासनाने परिस्थिती सक्षमपणे पेलली आहे," असं चंद्रकांत पाटील. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनाही टोले लगावले.

फोटो स्रोत, Twitter/Chandrakant Patil
चंद्रकांत पाटील म्हणाले, "ममता बॅनर्जीही पंतप्रधान होऊ पाहात आहेत, तर शरद पवार यांचे नाव कायमच पंतप्रधान म्हणून समोर येत असते. मात्र आगामी काळातही भारतीय जनता पार्टीच सत्तेत राहील."
5) गरिबांना मोबाइलसाठी अनुदान मिळावं - मुकेश अंबानी
गरिबांना स्वस्तात मोबाइल खरेदी करता यावा, म्हणून मोबाइलवर अनुदान देण्याची मागणी उद्योगपती मुकेश अंबानी यांनी केलीय. इंडिया मोबाईल काँग्रेस 2021 मध्ये मुकेश अंबानी बोलत होते. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
"सरकारी युनिव्हर्सल ऑब्लिगेशन फंडाचा वापर देशात मोबाइलसाठी अनुदान देण्यासाठी केला गेला पाहिजे. देशातील लोकांना जर डिजिटल ग्रोथचा भाग बनायचं असेल, तर त्यांना परवडणाऱ्या दरात सेवा आणि डिव्हाइस उपलब्ध करुन दिली पाहिजे," असं ते म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
मुकेश अंबानी पुढे म्हणाले, "भारताला 2G मधून 4G आणि नंतर 5G मध्ये मायग्रेशन लवकरात लवकर पूर्ण करायला हवं. लाखो भारतीयांना 2G तंत्रज्ञानापर्यंत मर्यादित ठेवणं म्हणजे त्यांना डिजिटल क्रांतीच्या लाभांपासून वंचित ठेवणं हे आहे."
तसंच, "कोरोना साथीदरम्यान जेव्हा सर्वकाही बंद होतं तेव्हा केवळ इंटरनेट आणि मोबाइलमुळेच अनेक फायदे झाले. तंत्रज्ञान आपल्या जीवनाच आणि रोजगारासाठी मदतीचं ठरत आहेत," असंही अंबानी म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























