नागपूर विधान परिषद निवडणूक: या मतदारांना करावे लागणार पीपीई किट घालून मतदान.

नागपूर निवडणूक

फोटो स्रोत, Praveen mudholkar/bbc

    • Author, प्रवीण मुधोळकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी, नागपूरहून
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे मतदार असणारे भाजप नगरसेवक मतदानासाठी नागपुरात परतले आहेत. विरोधी पक्षांकडून या मतदारांना संपर्क केला जाऊ नये, म्हणून त्यांना भाजपकडून राज्याबाहेर पाठवण्यात आलं होते.

कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूला निर्बंध घालण्यासाठीच्या नव्या निर्बंधांनुसार, जे नगसेवक सहलीहून विमानाने आले आहेत, त्यांची RT-PCR चाचणी करण्यात आली आहे. गेले दहा दिवस गोवा, कर्नाटका, गुजरात आणि ओरिसा या राज्यात या नगरसेवकांचा मुक्काम होता, असं भाजपनं स्पष्ट केलं आहे.

आज 10 डिसेंबरला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांच्या शरीराचे तापमान मोजले जाणार आहे.

या संदर्भात बीबीसी मराठीला माहिती देतांना नागपूर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी (निवडणूक) मीनल कळसकर म्हणाल्या, "मतदानाच्या दिवशी सकाळी 8 वाजता पासून ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान केंद्रावर मतदार येऊ शकतील. ज्या मतदारांच्या शरीराचं तापमान हे 98.4 Fahrenheit म्हणजेच शासनानं नेमून दिलेल्या नियमावलीनुसार जास्त आहे त्यांना शेवटच्या तासात बोलावलं जाईल. अशा सर्व मतदारांना पीपीई किट घालून मतदान करावं लागेल."

भाजपने सहलीला पाठवलेल्या बहुतांश नगरसेवकांना विमानानं नागपूरात आणण्यात आलं आहे. तर काहींना नव्या विमान प्रवासाच्या नियमावलीमुळे बसने नागपूरात आणण्यात आलं आहे. नागपूरमध्ये दाखल झाल्यानंतर या सर्वांना पेंच व्याघ्र प्रकल्पातील एका रिसॉर्टमध्ये नेण्यात आलं आहे.

नागपूर निवडणूक

फोटो स्रोत, Praveen mudholkar/bbc

10 डिसेंबर रोजी थेट मतदानालाच या नगरेसवकांना नागपुरात आणण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकेतील 334 मतदार नगरसेवक यांना सहलीला नेण्यात आले होते.

या सहलीत काही नगरसेवक कुटुंबासह गेले होते. नागपूरात परत आल्यानंतर नगरसेवकांच्या कुटुंबातील सदस्यांना घरी पाठवण्यात आले आहे. तर नगरसेवकांची रवानगी भाजपच्या अभ्यासवर्गात करण्यात आली आहे, असं भाजपच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

दोन दिवस हा अभ्यासवर्ग चालणार आहे. आज 10 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतरच हे नगरसेवक घरी जाऊ शकतील, असंही भाजपच्या वतीने सांगण्यात आले आहे.

नागपूर जिल्हा विधान परिषद निवडणुकीसाठीसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, व अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख या तिघांमध्ये लढत होणार आहे.

नागपूर निवडणूक

फोटो स्रोत, Praveen mudholkar/bbc

महाविकास आघाडीचे आधी ठरलेले उमेदवार रवींद्र (छोटू) भोयर हे निवडणूकीपुर्वी भाजपमध्ये होते. दीर्घकाळ भाजपचे नगरसेवक, उपमहापौर आणि स्थाई समिती अध्यक्षपदी भोयर होते. भाजपचे अनेक नगरसेवक भोयर यांचे जुने सहकारी असल्याने भाजपला आपले मतदार महाविकास आघाडीकडे जातील अशी भीती होती. मात्र ऐनवेळी काँग्रेसने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला.

भाजपनं मतं फुटू नये म्हणून नगरसेवकांना सहलीवर पाठवलं असल्याचं भाजपचे महानगरपालिकेतील सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांनी बीबीसी मराठीला सांगितले आहे.

दरम्यान छोटू भोयर यांनी सहली विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या फाईव्ह स्टार सहलीचा खर्च भाजपने केला तो या निवडणूकीतील उमेदवाराचा खर्च म्हणून ग्राह्य धरावा, अशी विनंती भोयर यांनी निवडणूक आयोगाला केली होती.

नव्या निर्बंधांनुसार गृहविलगीकरण आवश्यक नाही?

मुळात भाजपचे परराज्यात गेलेले नगरसेवक 6 डिसेंबर रोजीच राज्यात परतले होते. पुण्यात या नगरसेवकांना आणण्यात आले आणि तीन दिवस पर्यटन करण्यात आले, असे जय महाराष्ट्र वाहिनीचे पत्रकार उदय तिमांडे यांनी सांगितलं.

नागपूर निवडणूक

फोटो स्रोत, Praveen mudholkar/bbc

तिमांडे सांगतात, "कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉनला अटकाव करण्यासाठीच्या केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या नव्या निर्बंधांनुसार खबरदारी म्हणून या नगरसेवकांना 6 डिसेंबरलाच राज्यात आणण्यात आलं. नव्या प्रवास निमयावलीनुसार परराज्यातून राज्यात आलेल्या नागरिकांना सात दिवस गृह विलगीकरणात राहण्याची अट आहे.

"यामुळे 6 डिसेंबरलाच भाजपने आपल्या नगरसेवकांना गोवा, कर्नाटक, गुजरात आणि ओरिसा या राज्यातून पुण्यात आणले. पुण्यात तीन दिवसांच्या अष्टविनायक, शिवनेरी आणि लोणावळा येथील पर्यटनानंतर हे नगरसेवक नागपूरात आले आहेत."

नगरसेवक जर कोरोनाबाधित झाला तर...

या सहलीदरम्यान जर एखाद्या नगरसेवकाला कोरोनाची बाधा झाली तर तो पीपीई किट घालून मतदान करू शकतो असं भाजपनं सांगितलं आहे.

भाजपचे महानगरपालिकेतील सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यासंदर्भात म्हणाले, "निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जर विधान परिषदेतील एखादा मतदार कोरोनाबाधित आढळला तरी तो मतदान करू शकतो. पीपीई किट आणि इतर सुरक्षेचे उपाय करता त्या मतदाराला मतदान करता येते. सध्या तरी सहलीला गेलेल्या सर्व मतदार नगरसेवकांच्या RT-PCR चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्या सर्व चाचण्या या निगेटीव्ह आहेत."

नागपूर निवडणूक

फोटो स्रोत, Praveen mudholkar/bbc

विधान परिषद निवडणूकीसाठी मतदान कोण करणार?

नागपूर जिल्ह्यातील विधान परिषद निवडणूकीतील तीन उमेदवारांना 560 मतदार मतदान करणार आहेत.

  • महानगरपालिका - 155 ( 150 नियुक्त, 5 नामनिर्देशित)
  • जिल्हा परिषद - 58
  • नगरपालिका, नगर पंचायत - 336
  • पंचायत समिती सभापती - 33

562 मतदारांपैकी कुठल्या पक्षाकडे किती मतदार आहेत?

  • भाजप - 314
  • काँग्रेस - 144
  • राष्ट्रवादी - 15
  • शिवसेना - 25
  • बसप - 11
  • विदर्भ माझा - 17
  • शेकाप - ०६
  • पिरीपी - 06
  • भरिएम - 03
  • एमआयएम - 01
  • अपक्ष - 10
  • रासप - 03
  • प्रहार - 01
  • रिक्त - 02

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणूक कशी होते?

नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी या निवडणूकीसाठी पूर्ण तयारी झाली असल्याचं सांगितलं. जिल्ह्यात या निवडणूकीसाठी 15 मतदान केंद्रे असल्याचं त्यांनी सांगितलं.

नागपूर निवडणूक

फोटो स्रोत, Praveen mudholkar/bbc

जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसंदर्भात माहिती देताना नागपूरच्या उपजिल्हाधिकारी मिनल कळसकर म्हणाल्या, "या निवडणूकीच्या मतदानासाठी EVM वापरल्या जात नाहीत. या निवडणूकीसाठी मतदारांना एक मतपत्रिका दिली जाते. या मतपत्रेकेत उमेदवाराच्या नावापुढे पहिले, दुसरे आणि तिसरे प्राध्यान्य या पुढे आपले मत पेनाने नोंदवावे लागते.

"इंग्रजीत अंक 1 आपल्या प्राध्यान्याच्या उमेदवारापुढे लिहावा लागतो. एखाद्या मतदाराने आपले पहिल्या प्राधान्याचे मत दिले आणि त्याला दुसऱ्या आणि तिसऱ्या प्राध्यान्याचे मत नाकारायचे असेल तर ते नाकारू शकतात.

"जांभळ्या स्केचपेनद्वारे हा अंक लिहावा लागतो. जर कुणी ONE किंवा वन असे लिहले तर ते मत रद्द होते. कुठलाही मतदार आपले एकच प्राधान्य मतपत्रिकेत लिहू शकतो. हे मत नोंदवताना काळजीपूर्वक मतपत्रिकेवर लिहावे लागते. या मतपत्रिकेत कुठलीही चूक, खाडाखोड किंवा ओव्हररायटिंग आढळल्यास ते मत सरळ रद्द केलं जातं. मतपत्रिकेवर मतदारानं आपलं नाव, सही किंवा इतर काहीही लिहले तरी ते मत रद्द केले जाते."

निवडणूक कशी होईल?

निवडणूक आयोगाने दिलेल्या दिशा निर्देशानुसार आम्ही विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेत असल्याचं नागपूर जिल्ह्याच्या उपजिल्हाधिकारी, ( निवडणूक) मीनल कळसकर म्हणाल्या.

"एकूण 560 मतदार या निवडणूकीसाठी मतदार आहेत, या सर्वांचे आम्ही मतदान केंद्राच्या बाहेरच थर्मल स्कॅनिंग करणार आहोत. या पैकी 98 Fahrenheit पेक्षा जास्त तापमान ज्या मतदारांचे असेल त्यांना आम्ही शेवटच्या तासात म्हणजेच दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत येण्यास सांगणार आहोत.

"आरोग्य उपसंचालकांनी विशेष प्रशिक्षित आशा वर्कर्सना या मतदानाच्या वेळेस पाठवले आहे. शेवटच्या तासात येणाऱ्या मतदारांना पीपीई किट दिली जाईल. यावेळी आशा वर्कर्स आणि निवडणूक अधिकारी आणि कर्मचारीही पीपीई किट घालून असतील."

नागपूर आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जैस्वाल यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, "98.4 Fahrenheit पेक्षा जास्त शरीराचे तापमान झाले की ताप असू शकतो असे राज्य सरकारची नियमावली आहे. 98.4 Fahrenheit ते 99 Fahrenheit पर्यंत उपचारांची तेवढी आवश्यकता नाही असेही नियमावली सांगते."

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)