पुण्यात गव्यासाठी का ठेवण्यात आली प्रायश्चित सभा?

    • Author, राहुल गायकवाड
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

गेल्या वर्षी 9 डिसेंबरला पुण्यातील कोथरुड भागातील महात्मा सोसायटीच्या परिसरात रानगवा दिसला होता.

सकाळच्या सुमारास या रानगव्याचे दर्शन झाले होते. बघ्यांच्या गर्दीमुळे गवा बिथरला आणि सैरावरा पळू लागला. यात गवा जखमी देखील झाला.

वन विभागाकडून गव्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत होते. सहा तासांच्या प्रयत्नांनंतर गव्याला भुलीचे इंजेक्श्न देऊन पकडण्यात आले. लोकांचा आरडाओरडा आणि बघ्यांच्या गर्दीमुळे गवा बिथरला होता. तो जखमी देखील झाला होता.

अर्धा तास सलग पळाल्यामुळे तो थकला देखील होता. गव्याला पकडल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. गव्याच्या शरीरातील उष्णता कमी झाल्याने तसेच सलग पळाल्याने तो थकला असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

आता एक वर्षानंतर या घटनेचे प्रायाश्चित करण्यासाठी कोथरुडमधील निसर्ग व प्राणी प्रेमी मित्र परिवार आणि चेंज इंडिया फाऊंडेशनकडून प्रायश्चित सभा आयोजित केली आहे. याबाबतचे अनेक फ्लेक्स कोथरुडमध्ये लावण्यात आले आहेत.

कोथरुडमधील डावी भुसारी कॉलनी येथे ही सभा 9 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आली आहे. या सभेचं फेसबुक लाईव्ह देखील करण्यात येणार आहे.

कोथरुडमधील महात्मा सोसयटी हा दाट लोकवस्तीचा परिसर आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास फिरण्यासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांना पहिल्यांदा रानगवा दिसला. त्यानंतर एकच धांदल उडाली.

कोथरुडमध्ये रानगवा आढळल्याची बातमी पसरताच बघ्यांची मोठी गर्दी या भागात झाली. या गर्दीमुळे वनविभागाला रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अनेक अडचणी आल्या. बिथरलेल्या गव्याने घरांचे गेट, वाहने यांना धडक दिली. त्यात तो जखमी झाला. दुपारी 12.15 च्या सुमारास त्याला पडकण्यात यश आले.

ज्यांनी प्रायश्चित सभा आयोजित केली आहे त्या प्राणी प्रेमी सचिन धनकुडे यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क केला.

धनकुडे म्हणाले, ''आपण आपल्या पूर्वजांच्या श्रद्धांजली सभा आयोजित करतो, वर्षश्राद्ध घालतो. तसं हा गवा देखील माझ्या कुटुंबातील एक घटक होता. त्याला आम्ही जनता, प्रशासनाने पळवून पळवून मारला."

धनुकडे सांगतात, "प्राणी जंगलातून शहरात आले तर लोकांनी त्यांना पळवून मारु नये, घरात राहून त्याला त्याच्या अधिवासात जायला मदत करावी ही जनजागृती करण्यासाठी ही प्रायश्चित सभा आयोजित केली आहे.

दरवर्षी पुण्यस्मरण दिन आयोजित करुन जनजागृती करणार आहोत. तसंच प्रशासनाने देखील असा एखादा प्राणी मानवी वस्तीत आला तर लोकांनी कशा प्रकारे वागलं पाहिजे याबाबत नियम करायला हवेत.''

''मी सामाजिक कार्यामध्ये भाग घेतो. परंतु गवा आला तेव्हा मी घरात बसून होतो, बाहेर पडून लोकांची जागृती केली नाही. मी जर बाहेर पडून जागृती केली असती तर थोडा तरी फरक पडला असता. परंतु मी बाहेर पडलो नाही. त्यामुळे मी माझं देखील हे प्रायश्चित करत आहे. फ्लेक्स पाहून अनेकांनी फोन करुन विचारपूस केली. या सभेतून पुन्हा अशी घटना घडणार नाही याबाबत देखील जनजागृती करण्यात येणार आहे,''असं देखील धनकुडे म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)