You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गोवा : ममता बॅनर्जींनी फोडला राष्ट्रवादी काँग्रेसचा आमदार, पक्षाला खिंडार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक आमदार फोडला आहे.
गोव्यात असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा एकमेव आमदार आता तृणमूल काँग्रेसमध्ये गेल्यामुळे तिथं पक्षाला खिंडार पडल्याचं दिसून येतं.
चर्चिच बेनेमाओ असं या आमदाराचं नाव असून ते बेनेलिम मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात. पक्षाचा एकमेव आमदार असल्याने त्यांनी पक्षांतर केल्यानंतर त्यांचं सदस्यत्वही कायम राहणार हे विशेष.
येत्या काही महिन्यांमध्ये गोव्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी नुकतेच गोव्याचा दौरा केला होता.
गोवा विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेस चांगलाच जोर लावणार असल्याचे संकेत ममता बॅनर्जी यांनी दिले आहेत.
काही दिवसांपूर्वीच घेतली होती शरद पवार यांची भेट
ममता बॅनर्जी काही दिवसांपूर्वी गोव्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी मुंबईलाही भेट दिली. त्यावेळी महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या होत्या. त्यामध्ये शरद पवारही होते.
"नेतृत्व महत्त्वाचं नाही. कुणाच्या नेतृत्वात एकत्र यायचं, यापेक्षा भाजपविरोधात ताकदीनं उभं राहण्याची गरज आम्हाला वाटते," असं शरद पवार त्यावेळी म्हणाले.
ममता बॅनर्जी यांची सिल्व्हर ओक बंगल्यावर भेट झाल्यानंतर पवार आणि ममता बॅनर्जी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या, फॅसिस्ट शक्तींविरोधात सर्वांनी एकत्र यायला हवं.
ज्यावेळी ममता बॅनर्जींनी यूपीएबद्दल विचारलं असता, त्या म्हणाल्या, "काय आहे यूपीए? आता यूपीए नाहीये."
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत बैठक झाली.
पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ही भेट झाली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, तृणमूलचे नेते अभिषेक बॅनर्जी, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक हेही उपस्थित होते.
या भेटीनंतर सिव्हर ओक बंगल्याबाहेरच ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. या भेटीबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, "पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचं जुनं नातं आहे."
ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षाचा विस्तार राष्ट्रीय पातळीवर करण्याचा विचार मांडला होता. यासाठी त्या देशातील विविध राज्यांचा दौरा करत आहेत. याच पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी महाराष्ट्रात मुंबई दौरा करत असल्याचं म्हटलं जात आहे.
मंगळवारी (30 नोव्हेंबर) ममता बॅनर्जी यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाल्याने दोन्ही नेत्यांची भेट टळली.
ममता बॅनर्जी यांचा हा दौरा राष्ट्रीय राजकारणाच्यादृष्टीनेही महत्त्वाचा मानला जात आहे. तृणमूल कांग्रेस आणि विशेषतः ममता बॅनर्जी ज्या पद्धतीनं देशातील इतर राज्यांमध्ये पाय पसरण्याची घाई करत आहेत, त्यावरून त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा स्पष्टपणे जाणवत आहेत, असं अभ्यासकांचं मत आहे.
ममता बॅनर्जींच्या या दोन्ही भेटी राजकीय वर्तुळात आधीच सुरू असलेल्या तर्क-वितर्कांना बळ देणाऱ्या ठरतायेत.
पश्चिम बंगालमधील एकतर्फी विजयानंतर ममता बॅनर्जी आणि त्यांच्या तृणमूल पक्षाच्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत.
एकीकडे इतर पक्षातल्या दिग्गजांना तृणमूलमध्ये प्रवेश दिला जातोय, तर दुसरीकडे पश्चिम बंगालच्या बाहेर पडत इतर राज्यात स्वबळावर निवडणुकीत उतरण्यासही तृणमूलनं सुरुवात केलीय.
या दोन्ही गोष्टींसाठी गोवा ताजं उदाहरण. काँग्रेसचे नेते आणि गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यालाच पक्षात घेत तिथल्या आगामी निवडणुकीत पूर्ण ताकदीनं तृणमूल उतरताना दिसतेय.
आधी पश्चिम बंगालपुरतं मर्यादित मानल्या गेलेल्या ममता बॅनर्जींनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान होताच, राज्याबाहेरील राजकीय हालचाली वाढवल्या आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.