शीख धर्मियांना लक्ष्य करणाऱ्या फेक पोस्टचा भंडाफोड

- Author, श्रृती मेनन आणि फ्लोरा कार्मायकल
- Role, बीबीसी रिअॅलिटी चेक आणि बीबीसी मॉनिटरिंग
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
समाजमाध्यमांवर शीख असल्याचा दावा करणाऱ्या बनावट प्रोफाइलांचा भंडाफोड करण्यात आला आहे. या प्रोफाइलांवरून समाजात फूट पाडणाऱ्या गोष्टी पसरवल्या जात होत्या.
बीबीसीच्या हाती लागलेल्या आणि बुधवारी प्रकाशित होणार असलेल्या एका नवीन अहवालानुसार, या बनावट प्रोफाइलांच्या जाळ्यातील 80 खाती शोधण्यात आली असून ती बनावट असल्यामुळे आता बंद करण्यात आली आहेत.
हिंदू राष्ट्रवाद व भारत सरकार यांच्या बाजूची कथनं प्रभावशाली पद्धतीने पुढे आणण्यासाठी ट्विटर, फेसबुक व इन्स्टाग्राम, इत्यादी समाजमाध्यमांवरच्या या खात्यांचा वापर केला जात होता.
"शीख स्वातंत्र्य, मानवाधिकार व मूल्यं या संदर्भातील महत्त्वाच्या मुद्द्यांवरचे दृष्टिकोन बदलणं," हे या जाळ्याचं उद्दिष्ट असल्याचं दिसतं, असं प्रस्तुत अहवालाचे लेखक बेंजामिन स्ट्रिक यांनी नमूद केलं आहे.
हे जाळं भारत सरकारशी थेट संबंधित असल्याचा कोणताही पुरावा नाही आणि या संदर्भात प्रतिक्रिया मागण्यासाठी बीबीसीने केलेल्या विनंतीला अजून भारत सरकारकडून प्रतिसाद मिळालेला नाही.
'कठपुतळीसारखी खाती'
या जाळ्यामध्ये ऑटोमेटेड प्रोग्रॅमच्या स्वरूपाची 'बॉट'आधारित खाती वापरण्यात आली नव्हती, तर 'कठपुतळी'सारखी खाती वापरण्यात आली- म्हणजे स्वतंत्र व्यक्ती असल्याचा बहाणा करत खरे लोक ही बनावट खाती नियंत्रित करत होती.

फोटो स्रोत, Benjamin Strick / CIR
या बनावट खात्यांनी शीख नावं वापरली आणि आपण 'अस्सल शीख' असल्याचा दावाही त्यांच्याकडून केला जात होता. विभिन्न राजकीय दृष्टिकोनांचा प्रचार करताना #RealSikh आणि अपप्रचार करताना #FakeSikh असे हॅशटॅग ते वापरत होते.
सेंटर फॉर इन्फर्मेशन रेसिलिअन्स (सीआयआर) या ना-नफा तत्त्वावर कार्यरत असणाऱ्या संस्थेने तयार केलेल्या प्रस्तुत अहवालानुसार, या जाळ्यातील अनेक खात्यांनी विविध समाजमाध्यमांवर एकसारखीच बनावट प्रोफाइल वापरली.
या खात्यांची नावं, प्रोफाइलसाठी वापरलेलं छायाचित्र आणि कव्हरवरील छायाचित्र हा सर्व तपशील एकसारखाच होता, किंबहुना त्यांनी एकसारख्याच पोस्ट प्रकाशित केल्या.
अनेक खात्यांनी पंजाबी चित्रपटसृष्टीतील नायिकांसह विविध प्रसिद्ध व्यक्तींची छायाचित्रं प्रोफाइलवर वापरली.

फोटो स्रोत, Benjamin Strick / CIR
एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचं छायाचित्र प्रोफाइलसाठी वापरल्याने ते खातं आपोआपच बनावट ठरतं असं नाही. परंतु, विशिष्ट संदेश देण्यासाठी नियोजनपूर्वक राबवलेली मोहीम, वारंवार वापरले जाणारे हॅशटॅग, एकसारखीच वैयक्तिक माहिती आणि फॉलोअरांमधील साधर्म्य, या सगळ्यासह प्रोफाइलवरच्या छायाचित्रांचा विचार केल्यावर ही खात्री खरी नसल्याचा पुरावा मिळत होता.
या प्रोफाइलांवर ज्यांची छायाचित्रं वापरली गेली अशा आठ व्यक्तींना प्रतिक्रियेसाठी संपर्क करायचा प्रयत्न बीबीसीने केला. त्यातील एका व्यक्तीने स्वतःच्या व्यवस्थापकाद्वारे उत्तर दिलं.
आपलं छायाचित्र अशा रितीने वापरलं गेल्याची आपल्याला कल्पना नव्हती आणि या विरोधात आपण कारवाई करू, असं संबंधित व्यक्तीने सांगितलं.
दुसऱ्या एका व्यक्तीने व्यवस्थापकाने सांगितलं की, संबंधित व्यक्तीच्या नावाचा व छायाचित्राचा वापर करणारी अशी हजारो बनावट खाती आहेत, त्यामुळे त्या संदर्भात काही करता येणं शक्यच होत नाही.
राजकीय हेतू
तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात वर्षभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कायदे मागे घेणार असल्याची घोषणा केली.

फोटो स्रोत, Twitter
शेतकऱ्यांचं आंदोलन (जे गेल्या वर्षी याच आठवड्यात सुरू झालं) आणि काही दशकं सुरू असलेली खलिस्तानी चळवळ, या दोन चर्चाविषयांवर वरील बनावट खात्यांमधून भर देण्यात आला.
प्रस्तुत अहवालात म्हटल्यानुसार, शीख स्वातंत्र्याची कोणतीही कल्पना अतिरेकी आहे आणि शेतकऱ्यांची निदर्शनं अवैध आहेत, 'खलिस्तानी दहशतवाद्यां'नी हे आंदोलन ताब्यात घेतलं आहे, असा प्रचार करण्याचा या खात्यांचा प्रयत्न होता.
पण तत्पूर्वी भारत सरकारनेसुद्धा असा दावा केला होता की, शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये 'खलिस्तानी घुसले आहेत.'
युनायटेड किंगडम व कॅनडा इथला शीख समुदाया खलिस्तानी चळवळीला पाठबळ पुरवत असल्याचाही प्रचार काही खात्यांनी केला.
ही गोष्ट म्हणजे ठरवून करण्यात आलेली राजकीय खेळी असल्याचं अजूनही आंदोलन सुरू ठेवलेल्या शेतकऱ्यांना वाटतं. "हे अकाऊंट्स सरकारच्या सांगण्यावरून सुरू करण्यात आले आणि या आंदोलनाच्या विरोधी चित्र उभं करण्यासाठी हे करण्यात आलं असं आम्हाला वाटतं," असं भारतीय किसाम युनियनचे नेते जगजीत सिंह दलेवाल यांनी सांगितलं. आंदोलन करत असलेल्या 30 विविध संघटनांपैकी ही एक संघटना आहे.
या खात्यांचे हजारो फॉलोअर होते, आणि या जाळ्यावरून प्रसिद्ध झालेल्या पोस्ट समाजमाध्यमांवरील खऱ्या प्रभावशाली व्यक्तींनी लाइक केल्याचं व रिट्विट केल्याचंही दिसून आलं. तसंच या मजकुराला काही वृत्तविषयक संकेतस्थळांवरूनही उर्द्धृत करण्यात आलं.
परिणाम आणि प्रभाव
विशिष्ट प्रभाव पाडू पाहणाऱ्या अशा अनेक मोहिमांमध्ये संबंधित सूत्रधारांना त्यांनी तयार केलेल्या बनावट खात्यांशी खऱ्या लोकांचा संवाद घडवणं शक्य होत नाही. पण या जाळ्याच्या बाबतीत मात्र काही सार्वजनिक व्यक्तिमत्वांच्या खऱ्याखुऱ्या खात्यांवरून (व्हेरिफाइड अकाउन्ट) संबंधित पोस्टवर प्रतिक्रिया दिल्याचं प्रस्तुत अभ्यासात आढळलं.
या बनावट प्रोफाइलांद्वारे प्रसिद्ध झालेला मजकूर वृत्तविषयक ब्लॉग व इतर भाष्यं करणाऱ्या संकेतस्थळांवरही वापरला गेल्याचं सदर अहवालात नोंदवलं आहे.
प्रभावाचा विस्तार करण्याचा हा प्रयत्न असतो, असं तज्ज्ञ सांगतात. यामध्ये संबंधित जाळ्याचा मजकूर जितका अधिक पसरतो तितका त्याचा परिणामही जास्त होतो.
या जाळ्यातून प्रकाशित झालेल्या मजकुरावर प्रतिक्रिया दिलेल्या काही खऱ्या प्रोफाइलधारकांना बीबीसीने संपर्क साधला.
ट्विटरवर स्वतःचं वर्णन मानवतावादी व सामाजिक कार्यकर्ती असं करणाऱ्या रूबल नागी यांनी एका बनावट खात्याच्या ट्विटवर टाळ्या वाजवणाऱ्या इमोजीचा वापर करून प्रतिक्रिया दिली होती. 'ते खातं बनावट असल्याचं वाईट वाटतं,' असं त्या म्हणाल्या.
स्वतःचं वर्णन भूराजकीय सैनिकी विश्लेषक असं करणारे कर्नल रोहीत देव यांनी अशाच एका खात्याच्या मजकुरावर 'थम्स-अप'ची इमोजी वापरून प्रतिक्रिया दिली होती. या खात्यामागील व्यक्ती आपल्या ओळखीची नसल्याचं देव म्हणाले.
या प्रचारी जाळ्यांद्वारे विशिष्ट दृष्टिकोन असलेल्या व्यक्तींना लक्ष्य केलं जात होतं, असं डिजीटल अधिकार कार्यकर्ते व मीडियानामा या तंत्रज्ञान धोरणविषयक संकेतस्थळाचे संपादक निखील पाहवा म्हणाले.
"ही सुमारे 80 खाती एखाद्या विषयाला ट्रेंडमध्ये आणू शकतीलच असं नाही, पण सातत्याने मजकूर वा प्रतिमा प्रकाशित करून ते एखाद्या विशिष्ट दृष्टिकोनाविरोधात अपप्रचार करू शकतात," असं मत त्यांनी व्यक्त केलं.
"ही अधिक प्रगत पद्धत आहे आणि एखाद्या व्यापक कार्यक्रमाचा हा भाग असल्याचं दिसतं."
या खात्यांवरून प्रसिद्ध झालेला खूपच थोडा आशय पंजाबी भाषेत होता. वास्तविक भारतातील शिखांमधील ही सर्वांत मोठी भाषा आहे. पण या खात्यांवर जवळपास सर्व आशय इंग्रजीत होता.
शेतकऱ्यांच्या आंदोनाबाबत सर्व बाजूंनी राजकीय कृती केल्या जात होत्या, काही लोक आंदोलनाला पाठिंबा मिळवू पाहत होते, तर काही त्या विरोधात अपप्रचार करू पाहत होते, याकडे पाहवा यांनी निर्देश केला.
"राजकीय कथनाचं युद्ध जिंकण्यासाठीचे हे डावपेच आहेत."
बीबीसीने हा अहवाल ट्विटर आणि मेटा (फेसबुक व इन्स्टाग्राम यांची मालक कंपनी) यांना पाठवला आणि त्यांना प्रतिक्रिया देण्याची विनंती केली.
ट्विटरने ही खाती आपल्या नियमांचा भंग करत असल्याचं सांगून बंद केली आणि बनावट खात्यांना व 'मंचाच्या गैरवापरा'ला प्रतिबंध असल्याचं स्पष्ट केलं.
ट्विटरचे प्रवक्ते म्हणाले, "सध्या तरी व्यापक संयोजित जाळं तयार केल्याचा, एकाच व्यक्तीने विविध खाती वापरल्याचा किंवा मंचाचा गैरवापर करण्यासाठी इतर काही डावपेच लढवल्याचा पुरावा नाही."
मेटानेसुद्धा फेसबुक व इन्स्टाग्राम यांवरून ही खाती काढून टाकली. या खात्यांनी 'अविश्वासार्ह वर्तना'संदर्भातील धोरणाचा भंग केल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं.
मेटाचे प्रवक्ते म्हणाले की, ही खाती "त्यांच्यावरील आशयाचा उगम व लोकप्रियता या संदर्भात लोकांची दिशाभूल करत होती आणि आमच्या नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेपासून पळ काढत लोकांना एकगठ्ठा विरोध करण्याकरता बनावट खात्यांचा वापर केला जात होता."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























