'गद्दारी केल्यास मी सहन करणार नाही' - नारायण राणे #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Facebook/Narayan Rane
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:
1. 'गद्दारी केल्यास मी सहन करणार नाही' - नारायण राणे
"पक्षात प्रत्येकाला संधी मिळते पण एकाला मिळाल्यास त्याला पाडायचा प्रयत्न करू नका. तुम्ही हक्काने मागा. मी पद नक्की देईन; मात्र गद्दारी केल्यास मी सहन करणार नाही." असा इशारा केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यात नारायण राणे यांनी भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सभा घेतली. सावंतवाडी आणि कुडाळ इथल्या दोन आमदारांसह खासदार आपला नाही याचे शल्य आहे असंही राणे म्हणाले. या तिन्ही जागा मिळवण्यासाठी कामाला लागा असं आवाहन राणे यांनी कार्यकर्त्यांना केलं.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. "आपण मुख्यमंत्री असताना मुंबईत गुंडांची दहशत होती, पाकिस्तानातून हल्ले व्हायचे पण तरीही ती दहशत मी मोडून काढली. आताच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये तेवढी धमक आहे का?" असं राणे म्हणाले.
तालुक्यातील सत्तास्थानं मिळवण्यासाठी कामाला लागा अशी सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना केली. त्यासाठी आवश्यक तेवढी मदत केली जाईल असंही ते म्हणाले. सकाळने हे वृत्त दिलं आहे.
2. 'शरद पवार यांच्याकडे कोणतही खातं नाही, मग त्यांच्याकडे बैठक का?' - गोपीचंद पडळकर
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप कायम असून मुंबईतील आझाद मैदान येथील आंदोलनात भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी सहभाग घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे कोणतही खातं नसताना ते सरकारच्या बैठका का घेतात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

फोटो स्रोत, facebook
पडळकर म्हणाले, "परिवहनमंत्री अनिल परब आणि शरद पवार यांच्यात बैठक झाल्याचं आम्हाला माध्यमांच्या बातम्यांमधून कळालं. पण शरद पवार यांच्याकडे सरकारमधलं कोणतही खातं नसताना त्यांच्याकडे बैठका का घेतल्या जातात?"
"गेल्या 13 दिवसांपासून आम्ही आंदोलन करत आहोत. आमची भूमिका कायम आहे. एसटी महामंडळाचं विलिनीकरण राज्य सरकारमध्ये होऊ शकत नाही तर सरकारकडे काय तोडगा आहे हे त्यांनी सांगावं. सरकार अधांतरी काम करत असून कोणतीही अधिकृत माहिती दिली जात नाही," अशी टीकाही त्यांनी केली.
सरकारने कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आझाद मैदानात यावं असं आवाहन पडळकर यांनी केलं.
अनिल परब आणि शरद पवार यांच्यात नुकतीच एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत बैठक झाली. अनिल परब म्हणाले, आता लगेच काही सांगता येणार नाही. आम्ही काही गोष्टींचा अभ्यास करत आहोत. कर्मचारी आणि प्रवासी दोघांच्या सोयीचा मार्ग काढला जाईल असं आश्वासन परब यांनी दिलं. टिव्ही 9 मराठीने हे वृत्त दिलं.
3. राज्यपालांच्या भेटीनंतर नाना पटोलेंनी घेतली शरद पवारांची भेट, कारण अद्याप अस्पष्ट
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी (22 नोव्हेंबर) रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीनंतर नाना पटोले शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानी पोहचले. यामुळे सध्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. माध्यमांनी नाना पटोले यांना या भेटीबाबत विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले.

फोटो स्रोत, Getty Images
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा तिढा सोडवण्यासाठी नुकतीच राज्य सरकारची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला परिवहनमंत्री अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
शिवाय, विधानपरिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही घडामोडींना वेग आला आहे. भाजपने आपले पाच उमेदवार मैदानात उतरवले आहेत. काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना काँग्रेसने उमेदवारी दिला आणि त्यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्याविरोधात भाजपचे उमेदवार संजय केणेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला.
काँग्रेसकडून सतेज पाटील आणि धुळ्यातून गौरव वाणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
4. 'हा हिंदूंचा अपमान', 'रामायण एक्सप्रेस' रेल्वेतील कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडवरून वादाला सुरूवात
'देखो देश अपना' या मोहिमेअंतर्गत रेल्वेने सुरू केलेल्या 'रामायण एक्सप्रेस' या रेल्वेतील कर्मचाऱ्यांच्या भगव्या ड्रेस कोडवरून वाद झाला आहे. उज्जैनच्या संतानी याबाबत आक्षेप व्यक्त केला आहे.

फोटो स्रोत, ANI
रेल्वेतील वेटर्सच्या ड्रेस कोडचा रंग भगवा असल्याने या संतांनी आक्षेप नोंदवला आहे. तसंच यात बदल केला नाही तर 12 डिसेंबर रोजी 'रामायण एक्सप्रेस' दिल्लीत रोखली जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. वेटर्सच्या कपड्यांचा रंग भगवा असणं हा हिंदूंचा अपमान आहे असं आक्षेप नोंदवलेल्यांचं म्हणणं आहे.
याप्रकरणाची रेल्वे खात्यानं दखल घेतली असून कर्मचाऱ्यांचा भगव्या रंगाचा ड्रेस कोड बदलण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. "रामायण एक्सप्रेसमधील कर्मचाऱ्यांचा ड्रेस कोड आम्ही बदलत आहोत. आता हे कर्मचारी प्रोफेशनल कपड्यांमध्ये दिसतील. असुविधेसाठी आम्ही खेद व्यक्त करतो." असं रेल्वेनं म्हटलं आहे.
उज्जैन आखाडा परिषदेचे माजी महासचिव अवधेश पुरी यांनी याबाबत रेल्वे मंत्रालयाला पत्र लिहिलं होतं. कर्मचाऱ्यांचा गणवेश न बदलल्यास संत मंडळी रुळावर बसून एक्सप्रेस रोखतील असा इशारा त्यांनी आपल्या पत्रातून दिला होता. लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
5. ज्ञानदेव वानखेडेंच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टाने काय म्हटलं?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना आपल्या कुटुंबियांविरोधात वक्तव्य करण्यापासून रोखावं अशा आशयाची याचिका एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केली होती. परंतु त्यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही.

फोटो स्रोत, Getty Images
वानखेडेंविरोधात किंवा त्यांच्याबाबत वक्तव्य करण्यापासून नवाब मलिक यांना रोखण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.
गेल्या महिन्याभरापासून नवाब मलिक पत्रकार परिषद आणि ट्वीटरच्या माध्यमातून समीर वानखेडे मुस्लीम असल्याचा दावा करत आहेत. तसंच मलिकांनी त्यांच्यावर गंभीर आरोप सुद्धा केले आहेत. यापार्श्वभूमीवर ज्ञानदेव वानखेडे यांनी ही याचिका दाखल केली होती.
आपल्या कुटुंबियांची विनाकारण बदनामी केली जात आहे असं वानखेडेंनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. तसंच त्यांनी मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीची याचिकाही दाखल केली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या सुनावणी दरम्यान नवाब मलिक यांनाही काही सूचना केल्या आहेत. मलिक यांनी आपल्याकडे असलेल्या माहितीची पडताळणी करूनच वक्तव्य करावी असंही न्यायालयाने म्हटलं आहे. तसंच त्यांनी दोन आठवड्यांत न्यायालयाकडे आपली बाजू सादर करावी असेही निर्देश देण्यात आले आहेत. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
याप्रकरणाची पुढील सुनावणी आता 20 डिसेंबरला होणार आहे. दरम्यान, नवाब मलिक यांनी न्यायालयाच्या या निर्देशानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'सत्यमेव जयते' असं ट्वीट करत हा लढा असाच सुरू राहिल असंही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)
























