Shah Rukh Khan ने पलटवली बाजी; 15 चेंडूत नाबाद 33 धावांची खेळी, तामिळनाडू अजिंक्य

शाहरुख खान, तामिळनाडू, कर्नाटक, सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी20 स्पर्धा, दिल्ली

फोटो स्रोत, NurPhoto

फोटो कॅप्शन, तामिळनाडूचा शाहरुख खान
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

शाहरुख खान चित्रपटांमध्ये काय किमया करतो याची जाणीव चित्रपट रसिकांना आहे. क्रिकेटच्या मैदानावरही शाहरुख खान नावाचा महिमा कर्नाटकच्या खेळाडूंना अनुभवायला मिळायला.

दिल्लीत सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्वे्न्टी20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत शेवटच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता असताना शाहरुख खानने दमदार षटकार लगावत तामिळनाडूला जेतेपद मिळवून दिलं.

दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमवर रंगलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी20 स्पर्धेच्या अंतिम मुकाबल्यात तामिळनाडूला शेवटच्या चेंडूवर 5 धावांची आवश्यकता होती.

एकेरी किंवा दुहेरी धावा अपुऱ्या पडल्या असत्या. चौकाराने सामना सुपर ओव्हरमध्ये गेला असता पण तडाखेबंद फटकेबाजीसाठी प्रसिद्ध शाहरुख खानने षटकार खेचत तामिळनाडूला थरारक विजय मिळवून दिला.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

गेल्या वर्षीही तामिळनाडूनेच या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं होतं. यंदा अंतिम लढतीत 15 चेंडूत नाबाद 33 धावांची खेळी करणाऱ्या शाहरुखने तामिळनाडूच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. 

तामिळनाडूने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तामिळनाडूच्या फिरकीपटूंसमोर कर्नाटकची अवस्था 32/3 अशी झाली. मात्र त्यानंतर अभिनव मनोहरने 37 चेंडूत 46 तर प्रवीण दुबेने 25 चेंडूत 33 धावांची खेळी केली. जगदीश सुचिथने 7 चेंडूत 18 धावा चोपल्या. तामिळनाडूतर्फे साई किशोरने 3 विकेट्स घेतल्या. 

प्रत्युत्तरादाखल खेळताना तामिळनाडूने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. जगदीशनने 41 धावांची खेळी केली. भरवशाचा फलंदाज आणि कर्णधार विजय शंकर 18 धावा करून तंबूत परतला.

7 ते 15 षटकांदरम्यान तामिळनाडूची वाटचाल संथ होती. मात्र शाहरुख खान मैदानात असल्याने तामिळनाडूला विजयाच्या आशा होत्या. 

शेवटच्या षटकात तामिळनाडूला 16 धावांची आवश्यकता होती. प्रतीक जैनच्या पहिल्या चेंडूवर साईकिशोरने मारलेला फटका चौकार गेला. दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. तिसरा चेंडू वाईड देण्यात आला.

तिसऱ्या चेंडूवर शाहरुखने एक धाव घेतली. तामिळनाडूसाठी आव्हान कठीण होतंय असं वाटत होतं. साईने एक धाव घेत शाहरुखला स्ट्राईक दिला. पाचवा चेंडू वाईड देण्यात आला. पाचव्या चेंडूवर शाहरुखने 2 धावा घेतल्या.

शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी षटकार मारायचं आव्हान शाहरुख खानवर होतं. त्याने डीप स्क्वेअर लेग पट्ट्यात षटकार लगावत विजय पक्का केला. शाहरुखने 1 चौकार आणि 3 षटकारांसह 15 चेंडूत 33 धावांची दिमाखदार खेळी केली. 

सय्यद मुश्ताक अली स्पर्धेचे विजेते

2006-07- तामिळनाडू

2007-08- स्पर्धा झाली नाही

2008-09- स्पर्धा झाली नाही

2009-10- महाराष्ट्र

2010-11-बंगाल

2011-12-बडोदा

2012-13- गुजरात

2013-14-बडोदा

2014-15-गुजरात

2015-16-उत्तर प्रदेश

2016-17- पूर्व विभाग

2017-18-दिल्ली

2018-19-कर्नाटक

2019-20-कर्नाटक

2020-21 तामिळनाडू

2021-22 तामिळनाडू

कोण आहे शाहरुख खान?

दणकट बांध्याचा आणि मनमुराद फटकेबाजी करणारा शाहरुख खान डोमेस्टिक क्रिकेटमधलं चर्चित नाव ठरू लागलं आहे.

26वर्षीय शाहरुखने 5 प्रथम श्रेणी सामने खेळलेत. मात्र 50 ट्वेन्टी20 सामन्यांमध्ये त्याच्या नावावर 547 धावा असून त्याचा स्ट्राईकरेट 136.40 असा मजबूत आहे.

पल्लेदार चौकार-षटकारांसाठी शाहरुख ओळखला जातो. हाणामारीच्या षटकात धावसंख्या वाढवणं तसंच धावांचा पाठलाग करताना फिनिशरचं काम करणं ही जबाबदारी शाहरुखकडे दिली जाते.

यंदाच्या वर्षी झालेल्या आयपीएल लिलावात पंजाब किंग्ज संघाने तब्बल 5.25 कोटींची बोली लावून शाहरुखला ताफ्यात समाविष्ट केलं.

पंजाब किंग्ज संघाच्या सहमालकांमध्ये अभिनेत्री प्रीती झिंटाचा समावेश होता. लिलावावेळी प्रीती उपस्थित होती. या शाहरुख खानला अभिनेता शाहरुख खान म्हणजेच कोलकाता नाईट रायडर्सचा संघ विकत घेणार का अशीही चर्चा होती. मात्र प्रत्यक्षात प्रीतीने शाहरुखला अशा पद्धतीने विकत घेतल्याने सोशल मीडियावर मीम्सना उधाण आलं होतं.

यंदाच्या आयपीएल हंगामात शाहरुखला 11 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. 134.21 च्या सरासरीने त्याने 114 धावा केल्या आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)